रविवार, २७ डिसेंबर, २००९

श्री आणि गौरीचे किस्से - भाग ४

पण तिच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नव्हता.
"काय झाले?" बाबांनी त्याला विचारले.
"काही नाही. It was nothing actually." एक हात मानेवर घासत खाली बघत तो म्हणाला. बाबा तरी उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे पहात राहिले.
"मी चेष्टेत मुलींनी ऑफिसमधे काम न करता नुसते हसले तरी चालते असे म्हणालो, त्याचा तिला राग आलाय." एकदाचं त्याने बोलून टाकलं.
"त्याच्यात एव्हढे चिडण्यासारखे काय आहे?" बाबा आईकडे बघत म्हणाले.
"बाबा ताईला याच्यात भरपूर चिढण्यासारखे आहे. ती पक्की फ़ेमिनिस्ट आहे माहीत नाही का?"
"काय जिजू संसाराची चांगली सुरुवात केलीय तुम्ही." परत त्याच्या पाठीवर थाप मारत बबलू म्हणाला. हा मेहूणा सारखा पाठीवर थापा काय मारतोय त्याला कळेना.
"तु गप्प बस रे." आई बबलूवर ओरडली.
"ठिक आहे. होईल ती उद्यापर्यंत नीट." खुर्चीवरून उठत बाबा म्हणाले.
"चला आता. बराच उशीर झालाय." हे वाक्य त्यांच्या बायकोला उद्देशून होतं.
सांगावे की नाही या विचारात श्री घोटाळला. सांगून त्यांना हार्ट अटॅक तर येणार नाही ना!
"गोष्ट याच्याही पुढे गेलीय." हळूच तो म्हणाला.
"काय झाले?" पून्हा बसत बाबा म्हणाले.
"ती घटस्फोट हवाय म्हणतेय." श्रीने बाँम्ब टाकला. म्हणजे त्याला तरी तसं वाटले. तो सावधपणे त्या दोघांकडे बघू लागला.
"खरं की काय!" शांतपणे बाबा म्हणाले.
त्यांची प्रतिक्रिया ऐकून त्याला काय बोलावे ते कळेना. संसार सुरु व्हायच्या आधी त्यांची मुलगी घटस्फोट मागतेय याचं त्यांना काहीच वाटू नये? त्याला आश्चर्य वाटले. बबलू हसायला लागला.
"देउन टाक मग." बाबा जराही विचलीत न होता म्हणाले. हार्ट अटॅक यायची पाळी आता त्याची होती. आपल्या बायकोसारखं तिचं सगळं कुटुंबच विचित्र दिसतंय! आवाक होउन तो बाबांकडे पहायला लागला.
"असा बघू नकोस माझ्याकडे." हसत त्याच्या हातावर थोपटत ते म्हणाले. "खरचं सांगतोय मी."
"उद्याच घटस्फोट घ्यायला जाउया म्हणून सांग तिला, मग बघ काय होतेय ते!" हसत ते म्हणाले.
ओऽऽ आत्ता कुठे त्याला कळले!

                                                क्रमश:

रविवार, ११ ऑक्टोबर, २००९

श्री आणि गौरीचे किस्से - भाग 3

"Surprise!" दारात गौरीचे आई, बाबा आणि तिचा भाऊ बबलू हातात जेवणाचे डब्बे घेऊन उभे होते. त्यांचे अत्यानंदाने उजळलेले चेहरे पाहून त्याने आवंढा गिळला.
"या या" तो मोठ्याने म्हणाला. दारात आई बाबांना बघून गौरी दचकली.  
"आई बाबा, तुम्ही आज कसे" पटकन सोफ्यावरून उठत ती म्हणाली. 
"अगं हे यायला नकोच म्हणत होते. पण मीच म्हटल की काल तुम्हाला यायला एवढा उशीर झालेला, आणि आज ऑफिसमधून येऊन तू कधी स्वयंपाक करणार म्हणून म्हटलं जेवणच घेऊन जावे." नवर्‍याची नजर टाळत तिची आई स्वयंपाकघरात गेली.
"अगं ताई, जेवणाचे नुसते निमीत्त आहे. इथे यायला ती कारणच शोधत होती." बबलूने खुलासा केला.
"आम्ही पिझ्झा मागवणारच होतो." आईच्या मागे जात ती म्हणाली.
"पिझ्झा काय खाताय." म्हणत गौरीच्या आईने डबे उघडायला सुरुवात केली. तिच्या आवडीचे बासुंदी आणि पुरीचे जेवण होते. "पण निघताना फोन तरी करायचास?" त्रासिक आवाजात तिने तक्रार केली. 
"मी तेच म्हणत होतो आईला. तुमच्यात लुडबुड करायला कशाला जायचे म्हणून." बबलूने ओरडून तिला साथ दिली. 
"मग काय जीजू कसा काय झाला हनिमून?" सोफ्यावर श्रीच्या शेजारी बसत त्याच्या पाठीवर थाप मारून त्याने विचारले. 
"छान झाला."
"काय काय केले मग तिथे?" खी खी हसत त्याने विचारले.
"बबलु आता चावटपणा बस झाला तुझा." त्याचे वडील त्याच्यावर ओरडले.
"त्यात चावट्पणा कसला? मी आपला इनोसंटली विचारत होतो." चेहर्‍यावर निरागस भाव आणून तो म्हणाला.
"माहीत आहे मला तुझा इनोसंटपणा."
ताटे वाढली होती, म्हणून ते आत गेले. डायनिंग टेबलवर गौरीच्या शेजारी श्रीचे ताट आईने वाढले होते. तिच्याशेजारी श्री येऊन बसताच गौरी उठली. "बबल्या तू इथे बस रे." म्हणत बबलुला जागा करून देत ती बबलुच्या जागेवर जाऊन बसली. श्री चा चेहरा पडला. सासरच्यांपर्यंत ही गोष्ट जावू नये असं त्याला वाटत होते. पण आता त्याचा नाईलाज होता. बाबांनी काय झाले म्हणून आईकडे बघितले. त्यावर आईने नकारार्थी मान हलवत खांदे उडवले. सगळेजण मग शांतपणाने जेवायला लागले. 
"मग कोण कोणते बिचेस पाहिले तिथे?" शांततेचा भंग करत बाबांनी विचारले.
"सगळे! बिचेस बघण्याशिवाय दुसरे केले काय तिथे!" डब्यातली पुरी आपल्या ताटावर आपटत गौरी म्हणाली. गौरीच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून श्री उत्तरला.
"तीन चांगले बिचेस पाहिले. आणि क्रुजही घेतली एकदा."
"How Romantic! मस्त मजा आली असेल ना!" बासुंदीवर ताव मारत बबलु म्हणाला.  
"मग स्नॉर्क्लिन्ग करायला मिळाले का?" यावर श्रीचा घास घशात अडकला.
"झालं!" हवेत हात उडवत तो म्हणाला.
"काय झालं?"
"स्नॉर्क्लिन्ग करायची खुप हौस होती, पण काही लोकांना बीचवर लोळण्यातून वेळ मिळाला तर ना!" श्रीकडे एकदाही न पहाता, जणू ती दुसर्‍याच कुणाबद्दल तरी बोलतेय अशा अविर्भावाने गौरी म्हणाली.
"ओह!" आत्ता बबलूची ट्युब पेटली.
"मग cruise कोणती घेतली?" विषय बदलण्याच्या हेतूने तो म्हणाला पण गौरी काही तो विषय सोडायला तयार नव्हती.
"आमच्या हॉटेलमधल्या सगळ्यांनी स्नॉर्क्लिन्ग केले. आम्ही सोडून!"
"मला तुला स्नॉर्क्लिन्ग ला न्यायला काही प्रॉब्लेम नव्हता. पण तुला त्यांनी घेतले असते तर ना!"
"का नसते घेतले त्यांनी तिला?" आईने कुतुहलाने विचारले.
"तिला पोहायला कुठे येते?" श्री वैतागून म्हणाला. बबलू लागला हसायला.
"पोहायचं कारण देऊ नकोस. हॉटेलमधली ती बाई गेली, तिलाही थोडं थोडंच पोहायला येत होते."
"पण तुला तेवढेही येत नाही." हसत श्री म्हणाला. बबलूनेही त्याला साथ दिली. तिच्या रागाचा पारा चढला. 
"बरं झालं मी गेले नाही ते. नाहीतर तुझ्यासारख्या sexist माणसाबरोबर जाऊन मला आजन्म पश्चाताप झाला असता." रागाने ताटात हात धूवून, पाय आपटत ती किचनबाहेर गेली. ती गेल्यानंतर ते तिघेही आवाक होऊन श्रीकडे बघायला लागले. काय झाले हिला?
"कधी या पोरीचा पोरकटपणा जाणार कुणास ठाऊक!" हताश स्वरात बाबा म्हणाले.
"जीजु best of luck आमच्या ताईबरोबर!" पून्हा त्याच्या पाठीवर थोपटत बबलू म्हणाला. विचारावे की नाही या विवंचनेत असणार्‍या गौरीच्या आईने शेवटी विचारलेच.
"Sexist म्हणजे काय हो?"

क्रमश:











 


रविवार, २७ सप्टेंबर, २००९

श्री आणि गौरीचे किस्से - भाग २

दरवाजात हातात गुलाबाची फुले घेऊन श्री उभा होता. तिथेच त्याच्या गळ्यात तिने हात टाकले.  
"काय झालं?" त्याने विचारले. 
"काही नाही. तुला यायला इतका वेळ का लागला?" उसन्या रागाने तिने त्याच्या हातातून फुले काढून घेतली. 
"अगं अगदी यायच्या वेळी मॅनेजरने थांबवलं. प्रॉडक्शनमधे काही इश्शु आला होता, थांबावं लागलं." तिच्यापाठी किचनमधे येत तो म्हणाला. कपाटातून एक काचेचं भांडं काढून तिने त्यात पाणी ओतले आणि देठांसहीत ती फुले त्यात ठेऊन दिली.
"मग फोन करायला काय झालेलं?" 
"अजुन उशीर लागला असता तर करणारच होतो."
"म्हणून पुर्ण दिवसभर तु एकदाही फोन नाही केलास?" रागाने तिने विचारले.
"मला फोन करायला तु वेळच कुठे दिलास? तुझाच दर दहा मिनिटाला फोन येत होता!" हसत तो म्हणाला. 
"म्हणजे तुला म्हणायचंय काय?"  
"आणि मला ऑफिसमधेही खुप काम होते." त्याने वाक्य पुर्ण केले.  
"म्हणजे तुला म्हणायचंय काय?" तिने कमरेवर हात ठेवत परत विचारले. "मला ऑफिसमधे काम नव्हते?"
"तुमची काय वेगळी गोष्ट आहे. मुलींनी काम नाही केले तरी चालते. नुसतं बघुन हसला तरी पुरेसे आहे."
"Oh my god! How can you say that? I can't believe you just said that. " किंचाळून हातवारे करत ती म्हणाली. 
"तुझे असे विचार आहेत हे जर मला आधी माहीत असतं तर मी तुझ्याशी कधीच लग्न केलं नसतं." चहा करायला काढलेलं पातेलं तिने परत ठेऊन दिलं. तिला एवढं चिढायला काय झालं त्याला कळेना.
"अगं मी जोक करत होतो. Of course I didn't mean that."
"हा! सगळे असंच म्हणतात नंतर. अनावधानानं मनातले बोलून जातात आणि नंतर सारवासारवी करायला बघतात. I know your kind." तो किचनच्या दारात उभा होता, त्याला हाताने ढकलून ती हॉलमधे आली. 
"What kind? Are you serious?" तो चक्रावून पहातच राहिला.
"You are sexist!" हवेत दोन्ही हात मारत ती म्हणाली. 
"My god! चुकुन माझ्या तोंडातून ते वाक्य गेलं त्याचा एवढा विपर्‍यास करुन घेतेस!" 
"त्यासाठी अरेंज्ड मॅरेजला माझा विरोध होता. म्हटलं कसला नवरा मिळतोय कुणास ठाऊक? म्हणून लव्ह मॅरेज केलं तर तु असा निघालास. पक्कं फसवलस तु मला!" ती आपल्याच नादात बोलत होती. 
"गौरी अगं शांत हो! एवढं चिढायचं काही कारण नाही. तुला माहीत आहे मला तसं म्हणायचं नव्हतं." जवळ येवून त्याने तिच्या खांद्याला धरले. 
"Don't touch me!" बिथरल्यासारखी ती त्याच्यापासुन बाजुला झाली.
"जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर मला घटस्फोट हवाय."
"घटस्फोट! आपलं आत्ता तर लग्न झालंय! आणि कोणत्या कारणासाठी?"
"Sexism हे कारण तुला पुरेसे नाही वाटत?" त्याच्याकडे रागाचा कटाक्श टाकत ती म्हणाली.
" अगं असं काय करतेस? आपण असं करुया. We'll sleep on this. आणि उद्या सकाळी शांतपणे याच्यावर विचार करुया. "
"का? उद्या सकाळी तु बोललेलं बदलणार आहे का? उद्या सकाळी ही माझा निर्णय बदलणार नाही."
"गौरी चाईल्डिशपणा आता सोडला पाहीजे तुला." त्याचा आवाज आता थोडा चढला होता.
"चाईल्डिश आणि मी? आणि स्त्री ला एक शो पीस मानणारा, ती पुरुषांच्या करमणूकीचं साधन आहे असं मानणारा तू चाईल्डिश नाहीस?" तिचा आरोप ऐकून तो आवाक होऊन तिच्याकडे पहातच राहीला. त्याला काय बोलावे हे ही कळेना. सकाळपासून हजारदा फोन करून सतावणारी ही आपलीच बायको का, हा प्रश्न त्याला पडला. 
थोडावेळ दोघेही शांत राहीली. ती फुंदून सोफ्यावर जाऊन बसली. तो अजून किचनच्याच दरवाजात उभा होता. ती लहरी होती हे त्याला माहीत होतं. पण एवढ्या शुल्लक कारणासाठी ती घटस्फोटापर्यंत जाईल ही त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. लग्न म्हणजे बाहुला-बाहुलीचा खेळ वाटतो की काय हिला? ती त्याच्या कॉफीटेबलवर पाय ठेऊन सोफ्यात रुतुन बसली होती. समोर TV वर राजेश खन्नाचं रोमॅटिक गाणं लागलं होतं आणि ती दोघेही त्याकडे पहात निर्विकार्पणे बसली होती. ती बोलल्याशिवाय आता बोलायचे नाही हे त्यानं मनाशी ठरवून टाकले होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. कोण आले असावे आता? तिने कुणाला बोलावलेय की काय? त्याने तिच्याकडे पाहिले. ती ठ्म्म होऊन बसली होती. उठून दरवाजा उघडावा की तसेच बसावे या विचारात तो असतानाच परत एकदा बेल वाजली. "What the heck!" म्हणत तो उठलाच.
क्रमश:





गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

श्री आणि गौरीचे किस्से - भाग १

|| श्री ||

एका हाताने लॅपटॉपची मोठी बॅग पोटाशी घट्ट धरत अणि दुसर्‍या हाताने पर्स संभाळत गौरीने कसातरी दरवाजा उघडला. श्रीनं फ़्लॅट ठिकठाक ठेवला होता. तिचं सामान तिने हनिमुनला जाण्याआधीच शीफ़्ट केले होतं. काल रात्री घरी परतायला त्यांना दोन वाजले होते. प्रवासाच्या बॅगा अजुन हॉलमधेच होत्या. खुशीत तिनं सगळ्या घरातून एक चक्कर मारली. दोघांचा संसार आता खर्‍या अर्थाने सुरु होत आहे याची तिला जाणीव झाली. दोन्ही हातांनी दोन बॅगा उचलून, त्यांना फरफटत ओढत ती बेडरुममधे गेली. श्री घरी यायच्या आत तिला तयार व्हायचे होते. काय घालावे? तिथं पसरलेल्या चार-पाच बॅगामधून एक बॅग उघडून तिने अमेरिकेतून आणलेली नायटी काढली. ती नाईटी घेताना तिच्या मैत्रिणींनी तिची केलेली चेष्टा आठवून तिला खुदकन हसू आलं. श्रीला सरप्राईज ध्यायचा तिचा बेत होता. मोबाईलवर बटनं दाबत तिने त्याला कॉल लावला. 
"हॅलो. मी बोलतेय." नाईटीवरून हात फ़िरवत ती म्हणाली. 
"बोल." 
"घरी कधी येतोयस?" 
"अगं येतो म्हटलं ना? किती वेळा कॉल करशील?" हसत तो म्हणाला. आपली स्वत:ची बायको! त्याला भारी मज्जा वाटली. त्यालाही कधी एकदा घरी जातोय असं झालं होतं. पण आज त्याचे ग्रह तेवढे चांगले दिसत नव्हते. पी. सी. लॉक करुन तो निघणार, तेवढ्यात त्याच्या मॅनेजरने "प्रोडक्शन मधे एक ईशू आलाय तो पाहशील का? " असं विचारले. मॅनेजरला मनातनं शिव्या देत त्यानं कम्पुटर परत सुरु केला.
गौरीनं संध्याकाळसाठी पिझ्झा ऑर्डर करायचं ठरवून, फ़्रेश होऊन तो नाईटी घातला. त्याच्यावरून रोब अडकवून ती त्याची वाट पहात सोफ्यावर बसली. बसताना आपल्या शरीरचे सगळे कर्व्हज आल्या आल्या त्याला दिसतील याची तिने काळजी घेतले होती. काहीतरी चाळा म्हणून तिने TV लावला. कुठलातरी बोरींग प्रोग्रॅम लागला होता. अजुन कसा हा आला नाही? परत एकदा फोन करायची उर्मी दाबून ती तसाच TV बघत बसली. त्याला फोन करायला काय होतेय? दिवसभर मीच फोन करतेय. तिलाही आता राग येऊ लागला होता. तिनं घड्याळात पाहिलं, साडेसात होत आले होते. अजुन श्रीचा पत्ता नव्हता. फोन सुध्धा केला नाही, काही झालं तर नसेल? तिच्या मनात शंका डोकावली. तिनं पटकन त्याचा नंबर डायल करायला सुरुवात केली. "ट्रिग ट्रिग" तेवढ्यात बेल वाजली. पळत जावून तिने दरवाजा उघडला. 

क्रमश:

शनिवार, १९ सप्टेंबर, २००९

आम्ही अमेरिकावासी

               इतकी वर्षे अमेरिकेत रहायल्यानंतर आपण अमेरिकन झाल्याचं तिला वाटलं तर त्यात नवल कसलं! नाहीतरी भाजी खरेदी करण्यासाठी, रस्त्यावर भाजी विकत बसलेल्या लोकांना विसरुन, मोठ्या 'ग्रोसरी स्टोअर्स' मध्ये जायची तिला आत सवय झाली होती; फोडणीसाठी लागणार्या जिर्याला क्युमिन सीड्स म्हणायचं आता तिच्या जिभेवर बसलं होतं. एवढंच काय तर वाहतुकीसाठी  कार सोडून दुसरे वहान असु शकते हे ही ती पूर्णपणे विसरली होती. वडील अतिशय कर्मठ असल्यानं, भारतात तिला कधी जीन्स ही घालायला मिळाली नव्हती; पण इथे 'उन्हाळ्यात तर मी जीन्स मी घालूच शकत नाही. किती उकडंत ना!' असं म्हणत कॉटनची हाफ पॅंट घालण्यापर्यंत तिची मजल गेली होती. जेवताना ताटात भाजी पोळी  वरण भात या सगळ्या गोष्टी आता क्वचितच दिसू लागल्या होत्या. "आमच्या पिलाला अमेरिकन पदार्थच जास्त आवडतात, त्यामुळं आम्हीही तेच जास्त खातो" म्हणत ताटात पास्ता, सॅलेड सारखे पदार्थ पडत होते. दुकानात गेल्यानंतर भरमसाठ खरेदी करुन, त्या गोष्टी "आपल्याला आवडल्या नाहीत" या एकाच सबबीवर परत करणं हे सौभाग्य नसून तो आपला हक्कच आहे असं ती समजू लागली होती. अशा कितीतरी अमेरिकन लकबी तिनं आत्मसात केल्या होत्या. मग तिनं स्वत:ला अमेरिकन म्हणवून घेतलं म्हणून काय बिघडलं!
               सुरुवातीला ज्या गोष्टीसाठी तिला भारताची आठवण यायची त्याच गोष्टीसाठी आजकाल तिला अमेरिका आवडत होती. दोन-तीन वर्षांनी होणारी भारताची फेरी, तिचं भारताबद्दलचं प्रेम वाढवण्याऐवजी कमीच करत होती. कसलं ते पोल्युशन! दंगा, गोंधळ, बेशिस्तपणा आणि त्या उंचच उंच इमारती! तिला तर अगदी गुदमरून जायचं. रस्ता रिकामा असला तरी रिक्षावाल्याचा एक हात सतत हॉर्नवर! का तर म्हणे मधेच कुणी टपकु नये! त्याचंही बरोबरच आहे म्हणा, नाहीतर भारतात रस्त्यावर फक्त माणसंच असतील असं नाही.  गाई गुरांनाही  रस्ता ओलांडायचा असतोच की! पुण्यात तर रस्त्यावर एकाही बाईचं तुम्हाला तोंड बघायला मिळणार नाही! नाही हो, मनाई वगैरे काही नाही. पण रस्त्यावर पोल्युशनच इतकं आहे की त्यांना सगळं तोंड एखाद्या दरोडेखोरासारखं रुमालानं गुंडाळावं लागतं! कुणी परदेशी आला, तर इथे सगळे अतिरेकी  बिनबोभाट रस्त्यावर काय हिंडताहेत असं वाटेल त्याला! त्यामुळं अमेरिकेतलं शिस्तशीर आयुष्य चांगलच मानवलं होतं तिला. मरणाची  धावपळ नाही, बिनकामाचे हॉर्नस नाहीत; आणि दररोज दुप्पट वाढत जाणारी महागाई नाही.
             भारतातल्या महागाईबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे! पाच सहा रुपयाला मिळणार्या वडापावची  किंमत पन्नास साठ रुपये झाली होती. लार्ज (म्हणजे अमेरिकेतला स्मॉल) साईजचा पिझ्झा पाचशे रुपयाला! तिच्या पिलाच्या नाश्त्यासाठी सिरीयल आणायला ती आधुनिक मार्केट मधे गेली, आणि त्याची  किंमत बघुन तिला शॉकच बसला. एवढ्याशा सिरीयल ला २०० रुपये! सिरीयल, पिझ्झा या गोष्टी  इथं अन्न, वस्त्र, निवार्यासारख्या गरजेच्या झाल्या होत्या. त्यांची ती लक्झरी किंमत बघून तिला धक्काच बसला. कपड्यांच्या खरेदीसारखी, बायकांची अत्यंत आवडती गोष्टही  आजकाल डोकेदुखीची झाली होती. अमेरिकेतल्या गोर्या मेमलाही लाजवतील, अशा तोकड्या टी-शर्टच्या किंमती  मात्र लांबलचक होत्या. तिच्या पिलासाठी एखादा चांगला शरारा घेण्यासाठी ती पुण्यात लक्ष्मी रोडवर गेली, तर तो माणूस दोन हजाराखाली  काही दाखवायलाच तयार नाही!  "अहो हजारापर्यंतचे नाहीत का?" असं आवंढा गिळून तिने दुकानदाराला विचारलं;  आणि ज्या वहिनीबरोबर ती शॉपिंगला आली होती, तिच्याकडे वळून ती म्हणाली, "एव्हडे महागडे घेऊन काय करायचं? बघितलं तर दोन-तीनदा घालेल ती तिथे!"
             दुकानातून निघताना त्याच वहिनीनं तिच्या मुलीसाठी  जेव्हा साडेचार हजाराचा घागरा उचलला, तेव्हा तिचं तोंड बघण्यासारखं झालं होतं! भारतात आपल्यापेक्षा जास्त कमवायला लागलेत की काय? तिच्या मनात आलं. पण सेल आणि क्लिअरन्सची सवय झालेल्या तिच्या अमेरिकन मनाला रिटेल किंमत द्यायची सवय कुठे राहिली  होती?

            एकदा तर गंमतच झाली. मराठी नाटकांच्या सीडीज आणायला ती एका दुकानात गेली. तिला हव्या त्या सीडीज मिळाल्याने खुश होउन, बिलाकडे न बघता तिनं त्या खरेदी करुन टाकल्या. आणि दुकानाच्या बाहेर पाऊल टाकताच तिच्या लक्षात आलं, की तिच्या बोसच्या डीव्हीडी  प्लेअरवर या सीडीज चालणार ही नाहीत कदाचीत! ती पटकन दुकानात शिरली, आणि त्यांना तिनं तो प्रॉब्लम सांगितला.
"मला डीव्हीडीज दाखवा बघू" ती म्हणाली. त्यांनी  तिच्यासमोर चार-पाच डीव्हीडीज टाकल्या.
"एव्हढ्याच!"
"बाई, हे सीडीजचं दुकान आहे, डीव्हीडीचं नाही" पुढचा माणूस उर्मट्पणे म्हणाला. तिला त्यातली  एकही पसंद पडली  नाही. नकारार्थी  मान हलवुन, "मला ह्या सीडीज रिटर्न करायच्या आहेत" असं तिनं त्यांना सांगितले.
"आम्ही एकदा विकलेला माल परत घेत नाही" चेहर्यावरची रेषाही  न हलवता त्यानं दुकानाबाहेर लावलेल्या पाटीकडे हात केला. पाटीवर दुकानाच्या भल्यामोठ्या नावाखाली बारीक अक्षरात ते वाक्य लिहलं होतं.
"अहो, मी आत्ता दोन सेकंदापूर्वीच घेतल्यात ह्या. याला मी  हातही नाही लावला. आणि तुम्हाला त्या माघारी  घ्यायला काय प्रोब्लेम आहे?" तिला ते कळेना.
"आमचा नियम आहे मॅडम" तो पून्हा निर्विकार चेहर्यानं म्हणाला.
"पण माझ्याकडे बोसचा डीव्हीडी आहे आणि त्याच्यावर या नाही चालणार. मला या अमेरिकेला घेऊन जायच्यात" अमेरिकेचं नाव ऐकुन तरी तो नरम येईल म्हणून तिनं मुद्दाम सांगितलं.
"तुम्ही अमेरिकेला घेऊन जा, नाहीतर फ़ॉरेनला घेऊन जा, सगळ्या  डीव्हीडी  प्लेअर वर या चालणार म्हणजे चालणार." अमेरिका फ़ॉरेनमधे नसून, जणू पलीकडच्या गल्लीतच असल्यासारखी तो म्हणाला.
"तुम्हाला काही माहीताय का बोसच्या डीव्हीडी प्लेअरबद्दल? तो भारतात मिळतही नाही. मला माहीताय या नाही चालणार त्या!" ती वैतागून म्हणाली. त्यानं खांदे उडवले. तिला संताप आला. दिवसाढवळ्या ग्राहकांना लुबाडायचं चाललयं! अमेरिकेत वॉलमार्ट मधे 'वापरलेल्या' गोष्टीही  तिने किती  ताठ मानेने रिटर्न केल्या होत्या!
"हा तर सरळसरळ अन्याय आहे! तुमच्या मॅनेजरला बोलवा बघु." तिनं मागणी केली. दुकानात काम करणारी दोन मुलं यावर खुऽऽ करुन हसली. त्या माणसालाही  काय बोलावं ते कळेना. त्याच्या आख्ख्या कारकिर्दीत हा प्रश्न बहुतेक त्याला पहिल्यांदा विचारला गेला असावा.
"मीच मॅनेजर आहे" तो म्हणाला.
"मग मला मालकांना भेटायचंय." या गोष्टीचा आज निकाल लावायचाच असं तिनं ठरवलेलं.
"तो ही मीच." तो  निर्ल्लजपणे म्हणाला. परत ती दोन मुलं हसली.
घरी येऊन तणतणत तिनं ही गोष्ट घरच्यांना सांगितली. पण त्यांनी तिलाच वेड्यात काढलं. "विकलेल्या गोष्टी  परत घ्यायला लागल्यावर त्याचं दिवाळंच निघायचं!" तिच्या भावानं दुकानदाराची बाजु घेऊन तिची टर उडवली. "पण आमच्या अमेरिकेत तर.." हे तिचं वाक्य अर्ध्यावरच सोडत, आश्चर्यानं त्या लोकांकडे ती पहात राहीली. जर यांनाच काही वाटत नाही , तर दुकानदार कशाला त्याचे नियम बदलेल? अमेरिकेत या गोष्टी किती सहज, सोप्या वाटतात!
             त्यामुळं प्रत्येक वेळी भारताची फेरी झाल्यानंतर आपण पक्के अमेरिकन होत चालल्याची तिची जास्तीत जास्त खात्री पटत चालली होती. तिच्या नवर्याच्या मते ती जरा जास्तच अमेरिकन बनत चालली होती. जिथे गरज नव्हती  तिथेही ती  अमेरिकन पद्धतीनं विचार करत होती. त्याचं उदहरणच द्यायचं झालं तर;  एक दिवस तिची चार वर्षांची मुलगी, जिला लाडाने ते 'पिलु' म्हणत, मॉंटेसरीतुन येताना एक स्पॅनेश बार्बी घेऊन आली.
"कुणी दिली ही बाहुली तुला?" तिनं पिलाला विचारलं.
"गॅब्रियलनं." ती लाजत म्हणाली.
"and he said, I am his girlfriend."  हाताला झाका देत लाजत डोळ्यांच्या कोपर्यातून इकडेतिकडे बघत तिनं सांगितलं. ही दोघेही नवराबायको हसायला लागली. इकडे पिलू सोफ्यावर  "I am a girlfriend. I am a girlfriend."  म्हणून नाचत होतं.
"नक्की गर्लफ़्रेंड म्हणजे काय गं?" पोरीच्या मनात नक्की काय आहे हे काढण्यासाठी तिनं विचारलं.
"म्हणजे...you know he is my boyfriend and I am his girlfriend." चार वर्षांच्या मुलीच्या बुद्धीनं तिनं उत्तर दिलं.
"ठीक आहे. उद्या शाळेत गेल्यावर मी  रिटर्न करुन टाकेन.' हसत ती नवर्याला म्हणाली.
"No. I don't want to return it. He gave it to me. It's my present." पिलानं इवलासा चेहरा केला.
"ठिक आहे ठेऊयात मग." तिचा नवरा म्हणाला.
"असं कसं ठेऊयात?" अचानक गंभीर होत तिनं विचारलं. "आपण ठेऊन घेतल्यानंतर, त्या गोष्टीला मान्यता दिल्यासारखं होईल. पून्हा कधीतरी  ते पार्टीसाठी, गॅब्रियलच्या गर्लफ्रेंडला घेऊन जायला आले, तर तु काय करशील?"
"इतक्या लहान वयात तसं काही असेल इथे?" शंकीत नजरेनं नवर्यानं विचारलं.
"आपल्याला काय माहीत? असेलही कदाचित."
"नक्की काय झालं पिला सांगशील?" तिनं परत पिलाला विचारलं.
“he said I like you and you are my girlfriend”  नाचत ती म्हणाली.
"सगळ्यांसमोर?"
"No. Nobody was there. They were inside the classroom"
"उद्या शाळेत गेल्यावर तिच्या टिचरला विचारतेच." तिचं डोकंच फिरलं. पोरीला सरळ सरळ एकट्या मुलाबरोबर बाहेर सोडतायत म्हणजे! लहान असली म्हणून काय झालं!
              दुसर्या दिवशी  शाळेत गेल्यानंतर तिला कळलं की ते प्रपोजल वगैरे काही नव्हते. खेळण्यांच्या दुकानात गॅब्रियलनं वडिलांकडून हट्ट करून ती बाहुली पिलासाठी खरेदी केली होती. शाळेत गॅब्रियलला पिलु बरीच मदत करत असतं म्हणे! त्याच्या वडिलांनीही  कौतुकाने ती घेऊन दिली. आणि इतर मुलांसमोर देऊन रडारडी नको म्हणून शिक्षिकेने त्यांना कॉरिडॉर मधे पाठवलं होतं. तिथे काय झाले ते कुणालाच माहीत नव्हतं. "तु उगाच बाऊ करतेस." म्हणत नवर्याने तो जोक सगळ्यांना सांगितला होता. पण त्याला काय माहित, आपलं पिलु कधी ना कधी डेटिंग करायला लागणार आहे, या विचाराने त्या रात्री तिला झोप लागली नव्हती.
            तशी  ती  स्वत:ला अमेरिकन मानत असल्याने, डेटिंगला तिचा उघड उघड विरोध नव्हता. "ड्रगच्या आहारी जाण्यापेक्षा एखाद्या मुलाबरोबर पिक्चरला गेली  तर काय वाईट आहे" असं ती मैत्रिणींसमोर अगदी  अमेरिकनांसारखं बोलायचीही. नाहीतरी खरे अमेरिकन्स आपला मुलगा सोळा वर्षांचा झाला तरी त्याला गर्लफ्रेंड नाही  हे आनंदाने न घेता, काही प्रोब्लेम तर नाही  पोरात, असाच विचार करतात. पण तिच्या मनात मात्र, "आईवडिलांच्या डोळ्यापुढे कुणा मुलाचा हात धरुन जायची  हिंम्मतच कशी होते या सोळा-सतरा वर्षांच्या कार्ट्यांची?" असंच काहीतरी चाललेलं असायचं.
              एकदा तिच्या गोर्या सहकार्याने त्याच्या सहा वर्षाच्या गर्लफ़्रेंड बरोबर ब्रेकप झाल्यावर, दोन महिन्यात दुसर्या मुलीबरोबर डेटिंग सुरु केलं हे ऐकून "सहा वर्षाचा संबंध तुटल्यावर, सहा महिनेही डेटिंग सुरु करायला तुला वाट बघता नाही आली?" (मनात - लाज वाटत नाही?) असं सगळ्यांसमोर खडसावून विचारून, तिनं  त्याला कावराबावरा करून टाकला होता. आणि त्याच सहकार्याला, त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडची ओळख करून देताना, भेटल्यानंतर तिच्या ओठांचं चुंबन घेऊन 'हाय हनी' आणि निघताना परत तिच्या ओठांचं चुंबन घेऊन 'बाय हनी. आय लव्ह यु' म्हणताना  तिने पाहीले होते. एवढं सगळ्या लोकांच्यात चुंबन घेऊन दर्शवलेलं प्रेम, दोन महिन्यात आटलं कसं तिला प्रश्न पडला. पण मग ती अपेक्षेनं  तिच्या दुसर्या सहकार्याकडे बघायची. त्याची बायको  त्याची हायस्कूल स्वीटहार्ट होती, आणि दहा वर्षाच्या लग्नानंतर आणि दोन मुलांनंतरही त्याचं लग्न टिकून होतं. ते दर वर्षी आठवडाभर कुठेतरी फिरायला जायचे. लग्नाची  अनिव्हर्सरी, बायकोचा बर्थडे साजरा करायला तो नेहमी  रजा टाकायचा.  ऑफिसमधे नेहमी त्याच्या तोंडात त्याच्या बायकोचं आणि मुलांचं नाव असायचं. कधी कधी त्यांच्याबाबतीत तो जास्तच माहीती  पुरवतो  असं तिला वाटायचं. पण एकंदरीत हे अगदी  आदर्श अमेरिकन जोडपं! असं तिला वाटायचं. पण त्यानेही  एकदा तिचा भ्रमनिरास केला. त्याचं काय झालं, एकदा रेस्टॉरंट्मधे ते दुपारी  जेवायला गेले होते. तिचा आदर्श सहकारी, ' त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आलाय, तेव्हा बायकोला काहीतरी घेतलं पाहिजे' असं बोलत होता.
“अरे शेजारीच व्हिक्टोरिया सिक्रेटचं दुकान आहे, तिथे जाऊन काहीतरी  बघ.”  आणखी एका सहकार्याने हसत सुचवलं.
“हो, पण माझ्या बायकोला ते बसायला पाहिजे ना?”  तिच्या आदर्श सहकार्याने जोक केला. नंतर तिच्याकडे पाहुन म्हणतो कसा,
“नाहीतर आपण बीनाला ट्राय करायला लावू या”
what the heck!
तिचा चेहरा पाहून कुणी हसायचं धाडस केलं नाही.
“yaa sure! if she is as petite as me!” असं ताडकन बोलून ती तिथून उठली.
घरी येऊन तिनं नवर्याला हा किस्सा सांगितला, तर हसुन म्हणतो  कसा, "सहज चेष्टेत बोलला असेल, एवढं मनाला लावून नाही  घ्यायचं." अरे मनाला लावुन कसं नाही  घ्यायचं? मी  बाई आहे म्हणून काहीही बोलायचं म्हणजे? अमेरिकेत कुठल्यातरी  शहरात, एका बाईने म्हणे "smash shack" टाकलं होतं. Smash shack म्हणजे "तोडफ़ोडीचं दुकान". तुम्ही  त्या दुकानात जायचं आणि तुम्हाला जे काही तोडु वाटतय ते विकत घ्यायचं. सिरॅमिक प्लेट्स, वाईन ग्लासेस, काचेचे जग. थोडक्यात काचेचं काहीही.  नंतर संरक्षक हेल्मेट घालून तोडफोडीसाठी खास तयार केलेल्या रुममधे जायचं; आणि तिथे भिंतीवर आपटुन तोडायचं जे काही तोडायचय ते. तुम्हाला हव्या तश्या काचेच्या गोष्टी मिळतील तिथे फोडायला. फोडण्याआधी ज्याच्या नावानं तुम्हाला त्या फोडायच्या आहेत त्याचं नावही  लिहू शकता तुम्ही त्या प्लेटवर! भन्नाट कल्पना आहे नाही?  फक्त अमेरिकन लोकांनाच असल्या कल्पना सुचु शकतात. आत्ता जर तिला त्या रुममधे जायला मिळालं  तर तिने शंभरावर प्लेट्स सहज तोडल्या असत्या!
                मग  तिच्या नवर्यानं  तिला त्याच्या लेडी मॅनेजरच्या किस्स्याची  आठवण करून दिली. तिनं म्हणे भर मिटींगमधे "माझ्या पार्श्वभागावर एक टॅट्यू आहे" असं जाहीर केलं होतं. शी! असलं कसं बोलू शकतात ते पब्लिकमधे!  आणि तिला अजून मीटिंगमधे फटाक्यासारख्या उडणार्या 'फ..' शब्दाचीही नीट  सवय झाली नव्हती! भारतात कुणी असं  काही  बोललं तर काय कहर उडेल असं तिला वाटलं.
              दुसर्या  दिवशीही  ऑफ़िसला जाताना ती मनातनं धुसफ़ुसत होती. त्याचवेळी रेडिओवर एक सनसनाट बातमी लागली होती. कुणा जज्जने, त्याच्या ड्रायक्लिनरला म्हणे ६५ मिलियन डॉलर्सला 'सु' केले होते(आता हा 'सु' म्हणजे लहान बाळाची 'सु' नसून 'खटला' या अर्थाने घ्यायचा बरं!). कारण काय म्हणे, तर कोटाबरोबर तो त्याची पँट द्यायला विसरला होता. आता बिना पँटीचा तो जज्ज कोट घालणार कसा!  कुठेतरी गहाळ झालेली पँट एकदाची शोधून आणून त्याने जज्जसाहेबांना दिली. पण जज्जसाहेबांच्या मते ती त्याची पँटच नव्हती. मग केलं 'सु' त्याला. अकराशे-बाराशे डॉलरच्या पँटसाठी, पासष्ट मिलियन डॉलरचा फ़ाईन! अहो, मग त्याने दुकानाबाहेर 'सॅटिसफॅक्शन गॅरंटिड' चा बोर्ड लावायचा कशाला? सॅटिसफॅक्शन नाही  ते नाही आणि वर मनस्ताप किती झाला त्या जज्जला! त्याच्याकडे त्या सुटाशिवाय आणखी पन्नास-साठ सुट होते; पण त्याला तोच सुट घालायचा होता हे त्या उद्दाम ड्रायक्लिनरला कळलं कसं नव्हतं?
सगळेच न्युज चॅनल त्या बातमीवर तुटून पडले होते.  “Is it a joke?”  ती गाडी चालवताना विचार करत होती. अमेरिकेत बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मग करण्याचं स्वातंत्र्य का असु नये? नाहीतरी कुणीही दहा-पंधरा वर्षांचा मुलगा बंदुक खरेदी करुन, शाळेतल्या निरपराध मुलांना मारतोच आहे ना? पण अमेरिकन लोक पूर्वांपार बंदुक वापरत आली आहेत. त्यांची  ही महान संस्कृती ते बदलणार कशी? आजकालची  मुलंच अशी बेबंद होत चाललीत त्याला ते तरी काय करणार?
              त्या दिवशी ऑफिसमधे गेल्यागेल्या ती  त्या सहकार्याकडे गेली. आणि त्याला रेडिओवरचा किस्सा सांगून, काल तो जे काही बोलला त्याच्यासाठी  'I can sue you. right?' अशी शांत आवाजात विचारणा केली. त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. एखादी बाजी मारल्यासारखी  ती त्याच्या क्युबिकल मधून बाहेर पडली. खरी अमेरिकन झाल्याचा आनंद तिच्या चेहर्यावर पसरला होता!
आणि एकदाची ती  वेळ आली होती.
                    अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला जेव्हा ती 'ओथ सेरिमनी' ला चालली होती, तेव्हा तिचा आनंद ओसंडून वहात होता. आता थोड्याच वेळात ती कायद्याने अमेरिकन होणार होती. तिथे आलेल्या शेकडो लोकांच्या चेहर्यावर आशेचे भाव बघून तिलाही समाधान वाटत होते. तिने शपथ घेतली, ' I hearby declare, on oath, that I absolutely and entirely renounce and adjure...' त्या वाक्यांचा अर्थ जाणवून  तिच्या पोटात गोळा आला. अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला, भारताचं नागरिकत्व सोडायची काय गरज आहे? नंतर अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरू झालं होतं. तिचे ओठ हलत होते, पण त्यात 'जन गन मन..' म्हणतानाची भावना नव्हती. दोन्ही  डोळ्यातून धारा लागल्या होत्या. शाळेत 'भारत माझा देश आहे' म्हणताना तिला कुठे माहित होतं की एकदिवस ती त्या देशाला सोडणार आहे! कुणी जन्म दिलेल्या आईला सोडू शकतं? आणि 'वन्दे मातरम' चे नारे देऊन लाखो लोकांच्या प्राणाहुतीने स्वतंत्र झालेल्या तिच्या देशाला तिने असेच सोडून दिले होते!
               समारंभानंतर बाकीचे लोक आनंदाने बेहोश होउन एकमेकांचे फोटो काढत होते. तिचं शरीर हुंदक्यांनी गदगदत होते आणि अश्रूंनी चिंब झालेला आपला चेहरा, तिनं नवर्याच्या कुशीत लपवला होता.

                                                                                        || समाप्त ||

मंगळवार, १५ सप्टेंबर, २००९

भुतांच्या गोष्टी

               आयुष्यात बरे, वाईट, कडु-गोड, आंबट-तुरट असे नाना  प्रकारचे अनुभव प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. त्याबरोबरच काही कडु-गोड, आंबट-तुरट लोकही भेटतात.  काही लोकं आपल्या लक्षात राहतात तर काही प्रसंग!  अशीच एक  व्यक्ती माझ्या स्मरणात राहिलेली.
              त्यावर्षी  कराडच्या गव्हर्नमेंट कॉलेज मधून फ़ायनलची परीक्षा देऊन सुट्टीत मी घरी आलो होतो.  उन्हाळा आपला दर  वर्षीच्या उन्हाळ्यासारखाच जात होता.  माझ्या चुलत मामांचा  सुधीर आमच्याकडे राहायला आला होता.  त्यामुळं मलाही एक बिनपगारी नोकर मिळाला होता आणि तोही इंजिनियर दादाच्या कृपाछत्राखाली बर्‍याच नवीन आणि अजब गोष्टी शिकत होता. सकाळी खिडकीतून उन्हं  माझ्या गादीवर येईपर्यंत मी उठत नव्हते. आईही आपली पोराला तिथं बराच अभ्यास असतोय हो म्हणून मला वाटेल तितका वेळ झोपून देत होती, त्यानंतर भरपूर जेवण आणि नंतर चौकात किशाच्या पानपट्टीवर वेळ घालवायचा. दिवस कसे मजेत चालले होते. मध्ये अधे परीक्षेच्या रिझल्टची आठवण व्हायची आणि छाती धडधडायला लागायची.  पण याव्यतिरिक्त ग़ावातली कोणती मुलगी कोणत्या कॉलेजला जाते, कुणाचं कुणाबरोबर लफ़डं आहे याचं चर्वण करण्यात वेळ कसा जात होता तेही समजत नव्हतं. आणि माझ्यासाठी अजुन एक गोड कारण होते. गावातल्या कुलकर्णी मास्तरांची गोरीपान मुग्धा, मागच्या आठवड्यात रस्त्यावर दोनदा थांबून माझ्याशी बोलली होती, त्या एका वेगळ्याच धुंदीत मी होतो.
            त्यादिवशीही तिची वाट पहात मी टपरीवर पडून होतो. गप्पांत वेळ कसा गेला कळलाच नाही. आणि जेव्हा मी घड्याळात पाहिलं तेव्हा ४ वाजत आले होते. आयला!  आज मला सुधर्‍याला सोडायला  माळेवाडीला जायचं होतं, आणि लगेच परतायचे होते. उद्या माझ्या मित्राच्या बहिणीचं वर्‍हाड गावातनं सकाळी सात वाजता निघणार होतं, त्यामुळं तिथं मुक्कामही करता येणार नव्हता.
भानावर आल्यावर, टाचणीने पृष्ठभागावर टोचल्यासारखा, मी घरी पळत सुटलो.
"चल चल सुधर्‍या, झालं का तुझं?"
पटापट पिशवीत त्याचे कपडे कोंबून मी त्याला ढकलतच घराबाहेर काढला.
"बाबा, गाडीची चावी कुठाय?" उंबर्‍यातनं मी बाबांना हाक दिली. 
'अरे मोटरसायकल नेऊ नकोस, मध्येच बंद पडते ती आजकाल'  आतून बाबांचा आवाज आला. छ्छ्या गाडी असताना एस. टी. ने प्रवास करायचा म्हणजे! काहीतरीच काय!
  'एस. टी. नं घेऊन जा त्याला' बाहेर येत आई म्हणाली. तेवढ्यात समोरच्या टेबलावर मला चावी दिसली, ती घेऊन आईनं अजून अडविण्याआधीच मी गाडीला कीक मारली.
            माळेवाडी आमच्या गावापासून दीड तासावर होतं. गेल्यावर मामींनी चुळ भरायला पाणी दिलं, चहा ठेवला. चहा पिऊन निघावं असा माझा बेत होता. तेवढ्यात मामा आले. आमचे मामा म्हणजे अजब वल्ली आहेत. मिलिटरीतून रिटायर झाल्यावर, गावी शेती करायला येऊन राहिले. घरात आल्या आल्या मला बघून त्यांचा चेहरा खुलला. त्यांना माझं खूप कौतुक! दहावी-बारावीला एवढे मार्क्स पाडुन इंजिनियरींगला अडमिशन मिळवल्याबद्दल! त्यामुळं आमच्या नावाचा सुधर्‍यासमोर सारखा शंख असे.  माझ्या शेजारी बसलेल्या सुधर्‍याच्या पाठीवर मोठ्यानं थाप टाकून त्यांनी विचारलं,
"काय शिकलास का मग अरूणकडून?"   मी फ़क्ककन हसलो. तो माझ्याकडुन काय काय शिकला, हे जर त्यानं सांगितलं, तर कदाचित मला इथं यायची कायमची  बंदी होईल. सुधीरन हसून वेळ घालवली. पोरगं हुशार आहे!
"बघु पुढच्यावर्षी दहावीत काय दिवे लावतोय." त्याला टोला पडलाच.
थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी मामांना म्हणालो.
"मामा, मला आता निघायला पाहिजे. उद्या सकाळी लवकर निघायचंय"
 "छे! छे! आता कुठ जातोयस? इथंच रहा आज. कोंबडी-बिबंडी कापूया... काय म्हणतोस मग?" मिस्किलपणे हसत उभं राहत ते म्हणाले.
"नाही मामा मला खरचं जायला पाहिजे" मी  उठलो.
"उद्या सकाळी सात वाजता मला एका लग्नाला निघायचंय. माझ्या मित्राच्या बहिणीचं वर्‍हाड गावातनं निघणार आहे." यावर मामांनी दहा मिनिटे भाषण दिले. पाहुण्यारावळ्यांकडे कसे आले गेले पाहिजे, त्यामुळे आपुलकी कशी वाढते वगैरे वगैरे. तरी माझा जायचा ठाम निर्धार बघुन वैतागुन ते म्हणाले,
"ठिक आहे जायच असेल तर जा. पण थोडा उशीरा गेलास तर काही बिघडणार नाही. जेवल्याशिवाय काही जाऊ नकोस." असे म्हणून ते बाहेर निघून गेले.
सुधर्‍याला मी खूण केली 'कुठं?' म्हणून, तर त्याने एका हातावर सुर्‍यासारखा दुसरा हात घासून सांकेतिक भाषेत उत्तर दिलं. त्याच अर्थ कळायला मला जास्त वेळ काही लागला नाही. पाचच मिनिटात मामा तंगडीला धरून कोंबडी घेऊन घरात आले. कोंबडीसारखी मान टाकून, मी ही  मग विरोध करायचा बंद केला. मामांनी कोंबडी साफ करून आत मामींकडे दिली आणि  मानेनं खूण करून मला आत बोलवलं. मी ही देवाला चढवायला निघालेल्या बोकडासारखा त्यांच्या पाठी गेलो. आत कपाटातनं व्हिस्कीची बाटली काढून डोळे मिचकावून त्यांनी मला विचारलं,
"पितोस का?"
चार लोकांसमोर माझी पॅंट खाली ओढल्यासारखा मी बावरलो.
"छे! छे! " मी मुंडी हलवली, माझी परीक्षा घेतायत की काय?
"खोटं बोलू नकोस." बाटलीचं टोपण उघडत मिस्किलपणे हसत ते म्हणाले.
" खरंच नाही मामा. मी खरंच व्हिस्की कधी नाही पिली." मी काकुळतीला आलो.आणि ते खरंही होतं. व्हिस्की कुणाच्या बापाला परवडणार आहे? कॉलेजमध्ये २-३ दा बीयर घेतली असेल तेवढीच.
 "मग काय पिलीस?"  आयला ! माझं मन वाचता येतं की काय त्यांना?
"बीयर?"
 "हो पण एकदाच." मी ठोकून दिलं.
  तेवढ्यात सुधीर आत डोकावला, त्याला पहाताच "हितं काय काम आहे तुझं" म्हणत ते त्याच्यावर खेकसले. त्याच्या पाठी मी ही सटकलो.
  जेवण तयार व्हायला आठ वाजलेच. तोपर्यंत मामा चांगलेच तालात आले होते.
 "मग कसा आलास येताना?" त्यांनी विचारलं.
 "बारामती मार्गे" मी म्हणालो.
 "आता अंधारात मला जाव लागेल" थोड्यावेळानं मी तक्रार केली.
 "मग कशाला जातोस. रहा इथं"
 पून्हा चर्चा पूर्वपदावर गेल्यानं मी काही बोललो नाही.
 "अंधारात गाडी चालवणं खूप खतरनाक असतं हं! लोकांना खूप वाईट अनुभव आलेत या भागात." त्यांनी सुरूवात केली.
 "कसले अनुभव?" अनवधानाने मी विचारलं.
 "थांब तुला मी एक किस्सा सांगतो."  स्वत:च्या मांडीवर जोरानं थाप मारत ते म्हणाले.
 "मी आणि तो आपला बाळू गवंडी, अरे आपल्या आज्याचा बाप? " माझ्या मांडीला स्पर्श करत ते म्हणाले.
 "मला नाही माहीत" मी खांदे उडवले. आता ह्यांचा अज्या मला कसा माहित असेल?
 "अरे त्यानंच तर हे घर बांधलंय. गावात पहिली स्लॅबची इमारत आहे आपली!" छाती ठोकून ते म्हणाले.
 "तुला माहीत असेल की?" सुधीरकडे वळून ते म्हणाले. "अरे तो नाही का, स्टॅंडवर दारू पिऊन पडलेला असतो  दररोज?"
 "हो माहिताय मला तो. कसलं पेदाड आहे ते! त्याला दोनदा अज्यान गटारातनं काढला." चिरंजिवांनी  री ओढली.
"हा-हा" बोटानं दोनदा नाही ची खुण  करत पुढे झुकत ते म्हणाले.
"त्याच्या पिण्यावर जाऊ नकोस आता, माणूस लय चांगला होता" गवयाच्या गाण्यावर दाद देताना हवेत हात फिरवावा, तसा हात फिरवून ते आता माझ्याकडे वळले.
"नाही.. मी खोटं नाही सांगत, अगदी खरं आहे. कुणालाही विचार हवं तर" आता मला काय करायचय त्या बाळू गवंड्याशी? तो पूर्वजन्मी प्रत्यक्ष देवाचा अवतार असला तरी मला काय देणं घेणं!
  "अगदी देवासारखा होता" मामांनी सुरू केलं. आयला परत मनातलं ओळखलं!
  "पण त्याच्या बापानं मरताना सगळा जमिनजुमला धाकट्याच्या नावानं केला, तेव्हापासून असंच फिरत असतंय"
  "पक्क वाया गेलयं" मामांच्या तोंडात आता गावची भाषा यायला लागली.
  त्यांची गाडी पूर्ववत रुळावर आणावी म्हणून मी विचारलं. "मग तुमच्या किस्स्याचं पुढं काय झालं?"
  "आरे हो ! तुला किस्सा सांगत होतो ना?"
  "तर मी आणि बाळू गवंडी. बर का? असंच एकदा बारामतीला पिक्चर बघायला गेलो, सायकलवरनं गेलो होतो  आपलं! " मी हुंकार भरला "पिक्चर संपला बारा-साडे बाराच्या दरम्यान बर का? आणि आम्ही आपले निघालोय माळेवाडीला परत"
  "तो रस्त्यात पुल लागतो बघ?" त्यांनी पून्हा मला विचारलं.
  मी पुन्हा हुंकारलो, मुंडी हलवली.
 "किती पाणी होतं रे त्या ओढ्यात आत्ता येताना?" गाडी परत रुळावरुन घसरली होती.
 "होतं  थोडफार. जास्त काही नव्हतं" अगम्य भाषेत मी उत्तर दिलं.
 "बरोब्बर!" पण त्यांना उत्तर कळलेलं दिसत होते.
 "तर त्यादिवशीही तेवढच पाणी असेल नसेल, आम्ही  जाताना पाणी पुलाखाली होतं बरं का?"
 "बरं" मी म्हणालो.
"आणि येताना आम्ही पुल ओलांडतोय." इथं ते थांबले. प्रसंगाचे वर्णन कमी पडलं त्यांच्या लक्षात आलं. माझ्या मांडीवर बोटं टेकवून ते म्हणाले.
  "किर्र अंधार होता, रस्त्यावर कुणी सुद्धा नव्हतं, आम्ही आपलं निवांत चाललोय. आता दोघजण होतो म्हणून कसली  भीती. बरोबर?
"बरोबर" मी म्हणालो.
"तर रात्रीच्या साडेबारा वाजता पुलावर आलो  आम्ही. पुल ओलांडतोय तर अचानक हे ऽ ऽ धबधब्यासारखं पाणी आलं वरुन! बाळू लागला ओरडायला.."
"तो सायकल चालवत होता, मी पाठीमागे बसलोवतो, बरं का?" मध्येच माझ्याकडे पहात त्यांनी खुलासा केला.
"हं हं" मी समजल्यासारखी  मुंडी हलवली, पुढे सांगा काय झाले? माझी उत्सुकता वाढली होती.
"तर हा हा म्हणता ओढा पाण्यानं भरुन गेला, पाणी पुलावरुन वाहायला लागलं! इकडं बाळ्या बोंबलतच होता. आणि आता ऐक काय झालं हां.."
त्यांनी मला बजावलं. तबलजी समेवर येताच तबल्यावर जशी थाप ठोकतो, त्या स्टाईलमधे  ते म्हणाले.
"जसा आम्ही पुल ओलांडला, तसं पाणी झपदिशी खाली गेलं!"इथे ते माझी प्रतिक्रिया आजमावण्यासाठी क्षणभर थांबले.
"आणि हे अगदी खराय बरं का! प्रत्यक्ष्य डोळ्यांनी पाहिलेलं!"
"बापरे!" मी उद्गारलो."आता या पुलावरुन जाताना मला भीती वाटेल!" मी आपलं असंच म्हणालो.
"अरे हे काहीच नाही. मला अजुन भीतीदायक अनुभव आलेत." मला गारद केल्याच्या आनंदात ते म्हणाले.
"तुला अजुन एक किस्सा सांगतो" माझ्या खांद्याला दाबत ते म्हणाले.
  "घे अजुन घे ना" त्यांनी पातेल्याकडे हात केला. मामींनी चपळाईनं पुढं होऊन पळीभर रस्सा माझ्या वाटीत ओतला.
  "तर त्याचं असं झालेलं..." मामांनी सुरुवात केली.
  "मी आणि आपल्या जनुमामाचा सदा आम्ही दोघं  बारामतीवरुन येत होतो"
  "तुला जनुमामाचा सदा महिती असेलच ना?"
  "नाही" त्यांच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला मी ओळखतो असा बहुतेक मामांचा समज झालेला दिसत होता.
  "अरे आपली गजाताई आहे ना. तिचा नवरा, आणि जनुमामा साडू साडूच ना!"
  आता कोण गजाताई? ते दोघे साडू साडूचं का, पण सख्खे भाऊ जरी असते; नव्हे जुळे भाऊ जरी असते तरी मला काही घेणं देणं नव्हतं.
  "ओ ' तो ' सदा होय!" मी मोठ्यानं 'आ' वासत म्हणालो.
  "हां आत्ता तुझ्या लक्षात आलं" मामांनी खुशीनं माझ्या पाठीवर बोटे उठवली.
   "तर मी आणि सदा,  आणि या गोष्टी अगदी डोळ्यादेखत घडलेल्या बरं का! अगदी खर्‍या!" त्यांनी ते थापा मारत नाहीत याचा परत एकदा खुलासा केला. मी कोंबडीवर ताव मारत मुंडी हलवली.
   "आम्ही दोघं आपापल्या सायकलीवर बसून आपलं चाललोवतो  गप्पा मारत. आणि थोडं पुढं गेल्यावर, म्हणजे आपली मनुष्यवस्ती संपल्यावर बरं का! रस्त्यावर एक महिला उभी असलेली दिसली. आता दिवसाची वेळ असती तर आम्ही कशाला बघतोय? बरोबर?"
  "बरोबर" मी दुजोरा दिला.
  "पण रात्रीची वेळ. आणि मनुष्यवस्तीपासून इतक्या लांब ही बाई काय करतेय आम्हाला कळेना!"
  “आता-“  माझ्या मांडीला परत एकदा बोटांनी टोचत ते म्हणाले.
 "मी बराच गोष्टी ऐकल्या होत्या. त्या भागात पिशाच्च बघितलेली कितीतरी माणसं माझ्या माहितीतली होती. म्हणून मी आपलं सदाला म्हणालं -सदा तिच्याकडं बघू सुद्धा नकोस बरं का. सरळ पुढं जा.-  आपलं त्याला सावध करायला."
  "आणि ती बाईपण अश्शी गोरीपान.. एकदम देखणी! तिचे केस हे ऽ ऽ जमिनिवर लोळत होते."
  त्यांनी ताटापुढल्या जमिनिवर हात केला. आम्ही सगळ्यांनी त्या दिशेनं बघितलं, चुकून तिचे केस दिसताहेत का म्हणून!
  "ती वेडी पारी गावात फिरत असते, तिच्याएवढे?" मोठाल्या डोळ्यांनी  सुधीरनं विचारलं.
  "छ्या!" हवेत जोरानं हात फिरवत मामा म्हणाले.
  "पारीचे केस काहीच नाहीत. हिचे लय लांब होते."
  मामांची गोष्ट तिच्या केसांच्या गुंतवळ्यातनं काही बाहेर निघायला तयार नव्हती.
  "आणि हिरवी साडी नेसलेली, कपाळावर भलं मोठं कुंकु!"
 आता हे तिच्याकडे बघत किती वेळ उभं राहिलेले निरीक्षण करत?
  "आता एकली बाई बघुन सदा थांबला. मग मी ही आपला थांबलो"
  अर्थातच! मी मनात म्हटलं, बाई, मग ती भूत जरी असली तरी तिला हे सोडणार नाहीत.
  "आम्ही थांबल्यावर ती म्हणाली - माझी शेवटची एसटी चुकलीय, म्हणून मी चालत निघालीय. मला माळेगावला सोडाल का म्हणून. बरोबर? आता मी काही बोललो नाही. मनात भीती होती ना? पण सदा हो म्हणाला"
  "मग ती सदाच्या सायकलवर मागं बसली. मी आपला त्या दोघांच्या मागं मागं येत होतो. कासराभर अंतर गेलो असू नसु आम्ही आणि माझं सहज लक्ष गेलं, तर मला काय दिसावं?" मामांनी विचारलं.
 "काय?" मी  आणि सुधीर एकदमच म्हणालो.
"तिचे पाय हेऽ ऽ लांब झालेवते आणि जमिनीवर फरफटत होते." ते सांगताना त्यांनी डोळे हेऽ ऽ मोठे केले. आमचेही डोळे विस्फारले गेले.
  "मला असा दरदरून घाम सुटला. मी आपला सायकल जोरान मारायला लागलो. आणि ओरडून सदाला म्हणालो - सदाऽ ऽ तुझ्यापाठी काय बसलयं बघ? सदाही घाबरला पण त्याला सायकल थांबवायलाच येईना. मी आपला तिथंन पोबारा केला."
  धन्य आमचे मामा! मी मनात म्हटलं. स्वर्गातनं शिवाजी तळमळले असतील एका मराठ्याची ही दशा बघून!
  "बरं मग काय झालं पुढे  या सदाचं?" तो मेला तर नसेल ना या चिंतेन मी विचारलं.
  "तो काय असाच सायकल फिरवत बसलेला रात्रभर. ओढ्यातनं, दगडातनं, डोंगरावरनं फिरतोय, फिरतोय, फिरतोय.." आता माझ्यासमोर सगळं फिरायला लागलं.
  "आणि दिवस उजाडल्यावर माळावर बेशूद्ध  होऊन पडला. तेव्हापासून जरा वेड्यासारखंच करत असतंय" त्यांनी त्याच्या सद्यस्थितीची कल्पना दिली.
आत्तापर्यंत  आमची जेवणं उरकून पान खाऊन झालं होतं. आता यांची अजुन एखादी गोष्ट चालू व्हायच्या आधी निघावं, म्हणून मी उठलो.
  "आत्ता कुठं जातोय एवढ्या उशीरा? राहा इथं." पून्हा आग्रह झाला.
  "नाही मामा, मला जायलाच पाहिजे. उद्या पहाटे निघायचंय"
  "थांब मी तुला अजुन एक गोष्ट सांगतो" मामांची गाडी आज काही थांबायला तयार नव्हती.
  "नको मामा खूप उशीर होईल." मी काकुळतीला येऊन म्हणालो.
  "थांब रे. ही छोटीच आहे." त्यांनी माझ्या खांद्याला धरुन खाली बसवलं.
  "त्याचं असं झालं बघ..." मामांनी सुरुवात केली.
   "बारामतीला जाताना रस्त्यावर बघ ते बोलाईमातेचं देऊळ आहे, त्या देवळात मी आणि आमची म्हातारी पोर्णिमेला चालत गेलो होतो. म्हातारी म्हणजे तुझी आजी बरं का?"
  "हो  महिताय" मी घाई केली.
  जगातल्या बहुतेक सगळ्या भुतांनी माळेवाडी  ते बारामती एवढ्याच रस्त्यावर मुक्काम ठेकलेला दिसत होता. आणि त्यातली निम्मी तरी भुतं आमच्या मामांना भेटलेली  दिसत होती. आता एवढ्या रात्री मी एकटा, त्याच रस्त्यावर जाणार आहे म्हणून तरी मामांनी या गोष्टी बंद कराव्यात? पण मग ते आमचे मामा कसले!
  "तर येताना रात्र झाली होती, एका मैलाच्या धोंड्यावर आम्हाला एक स्त्री बसलेली दिसली. आम्ही लांबुन बघितली तिला, वाटलं असतील तिच्याबरोबरचे आसपास! आम्ही तिच्याजवळ गेल्यावर तिनं आमच्या म्हातारीला मिश्री मागितली बरं का? म्हातारीनं माझ्या पाठीला काही बोलू नको म्हणून चिमटा काढला. असा जोराचा चिमटा काढला! त्यावेळी मी लहान होतो. माझा काही  भूत-पिशाच्यावर विश्वास नव्हता. त्यामुळं आमची  आई असं काय करतेय मला कळेना.
आम्ही मग तसंच पुढं चालत गेलो. तिच्याकडं लक्ष न देता, शंभर एक फुटावर गेलो असू. बरं का? तेवढ्यात ती बाई अचानक आमच्यासमोर आली, आणि किंकाळ्या फोडून अद्रुश्य झाली."
  "प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर बरं का? अगदी डोळ्यादेखत घडलेल्या गोष्टी आहेत या!" छातीवर हात ठेवून मामांनी शपथ घेतली. बहुतेक तसं हजारदा म्हणून ते आपल्याच मनाला त्याची ग्वाही देत असावेत!
  "मामा, एवढ्या भुताच्या गोष्टी सांगून तुम्ही मला चांगलीच भिती घातलीय." उठत मी म्हणालो.
  "म्हणून तर म्हणतोय, ठोक मुक्काम इथचं"
  "पुढच्या वेळी नक्कीच" म्हणत मी बुटाचे बंध बांधायला सुरूवात केली. जाताना दोघांच्या पाया पडलो आणि गाडी सुरू केली.
  "ठिक जा बरं का अरुण" म्हणत मामींनी मला टाटा केला.
  गाडी सुरू करुन फुट दोन फुट मी जातोय, तेवढ्यात मागून मामा ओरडले.
  "त्या टेकडीवरल्या शंकराच्या देवळापासून जरा जपून जा बरं का! रात्री भुतं नाचतात तिथं!"
  "मी आवंढा गिळला."

                 छे! कसली भुतं आणि कसचं काय! मामा आपले असेच काहीतरी रचून सांगत होते. रस्त्यावर आल्यावर मी मनाला बजावले. आता मी माळेवाडी ओलांडले होते.पावणेदहाचा सुमार असावा. कराडमधे पावणेदहा म्हणजे काहीच नव्हते. रात्री बारा वाजता पिक्चर बघून आम्ही चालत होस्टेल वर यायचो, पण कधी भिती नाही वाटली.पण इथली गोष्ट वेगळीच होती. नऊ वाजता शेवटची गाडी माळेवाडीला येत असे. नंतर रस्त्यावर स्मशानशांतता पसरत असे.
               किर्र अंधारात खडबडत्या डांबरी रस्त्यावर माझी गाडी चालली होती.  रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. दूरवर कुठेतरी कुत्रं केकाटत होते. रात्रीच्या गुढ वातावरणात आणखीन कसले चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते. माझी सगळी इंद्रिये कशी तीक्ष्ण झाली होती. कसलाही आवाज, कसलंही दृश्य आता माझ्या तावडीतनं निसटणं शक्य नव्हतं. रस्त्याच्या दोन्ही बाजुला काळी धुसर झाडं भुतासारखी उभी होती. मी मनात देवाचा धावा करत धीटपणे गाडी मारत होतो. स्पीडोमीटर नव्वदच्या वर चाललेला दिसत होता. पण मला कधी एकदा बारामतीत पोहचतोय असं झालं होतं.
                 आणि अचानक माझ्या पाठीवर कुणीतरी स्पर्श केला. पाठीतनं सणकन भीतीची एक लहर चमकून गेली. पाठीमागं बघायचंही धाडस मला होईना. आठवतील तेवढ्या सगळ्या देवांची नावं घेत मी गाडी तशीच सुसाट पळवली. थोड्या वेळानं गाडी माळरानाला लागल्यावर, मी हळूच अंग हलवून, मागं कुणी बसलं नाहीना याची खात्री करून घेतली. पाठीला झालेला तो खडबडीत स्पर्श अजून मला जाणवत होता.
                  मी रस्त्यावर पुढ-मागे पाहिलं, दुरपर्यंत जिवंतपणाचं कसलचं चिन्ह दिसत नव्हतं.  पुढ भकास माळरान पसरलं होतं. वर धुसर आकाशात एकही चांदणी दिसत नव्हती. आज अमावस्या तर नाही? मनात पून्हा भीती डोकावली. आयला! या मामांनाही काही उद्योग नाही. आजच भुतांच्या गोष्टी सांगायच्या सुचलं त्यांना! मी मामांना मनातचं शिव्या देत होतो. आता बारामती जवळच आलेली, बस्स ती टेकडी ओलांडली की झालं! माझ्या मनात जरा बळ आल. पण ही शंकराची टेकडी तर नाही? या विचारानं पून्हा माझ अंग शिरशिरलं. देवाचा एखादा श्लोक आठवायचा प्रयत्न केला, तर काहीच आठवेना. बाबा शिकवताना लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, असं आता वाटायला लागलं. पण रामनामाचा जप मी चालूच ठेवला. पण त्यादिवशी आमचे ग्रह काही बरोबर दिसतं नव्हते, की मी रामाचा जप करतोय म्हणून शंकराला राग आला कुणास ठाऊक! टेकडीच्या जवळ आल्यावर आमची गाडी फट्-फट्  असा आवाज करायला लागली. आयला! ही मला धोका देतीय की काय! भीतीनं त्या थंडीत मला घाम सुटला. बेंबीच्या देठापासून 'राम राम राम' म्हणून मी ओरडायला सुरूवात केली. 'बस्स् आजचा प्रसंग जाऊ दे, मग मी तुझ्यासाठी काहीही करेन. दररोज प्रार्थना करेन...' मी देवाच्या नावानं टाहो फोडला.
                   पण मामांच्या कोंबडीनं जसे गचके खात प्राण सोडले तशी आमची ही गाडी गचके खात थांबली. आणि बरोबर टेकडीच्या पायथ्याला! आयला बाबाचं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती! मी गाडीवरून खाली उतरून टायर चेक केले. दोन्ही टायर टमटमीत भरलेले होते. आजुबाजुला नजर टाकली. सामसुम. आख्ख्या पृथ्वीवर मी एकटाच जिवंत प्राणी असावा असं वाटण्याइतपत शांतता. वारा मात्र जोरात वहात होता. त्याचा सु-सु आवाज रात्रीच्या शांततेत अजूनच मोठ्यानं ऐकू येत होता. मी टेकडीवर पाहिलं. काळोखात टेकडीचा आकार, आणि त्याला वर आलेलं टेंगुळ तेवढं दिसलं. अंधारच एवढा होता की मला शंकरानं तिसरा डोळा दिला असता तरी काही दिसलं नसतं. पण टेंगुळच मंदिर असावं याची मला खात्री होती. आज तिथं भुतांनी नाच करु नये म्हणजे मिळवली.
                काय करावं कळत नव्हतं. कार्बोरेटर तर ओव्हरफ्लो झाला नाही? कार्बोरेटर उघडायला स्क्रुड्रायव्हर, पाना शोधायला लागलो. अंधारात काहीच दिसत नव्हतं आणि बाबांनी ती कुठं ठेवली माहीतही नव्हतं. तशीच गाडी चाचपायला लागलो. शेवटी पान्याची पिशवी डिकीत सापडली. मनातनं आता शंकराचा धावा सुरू केला. उगाच त्याला नाराज नको करायला! नाहीतर तो तांडवनृत्य करायला लागायचा! तशा अंधारात कार्बोरेटर खोलायचा म्हणजे जिकीरीचं काम होतं. मी बसून हातानं गाडी चाचपत होतो, तेवढ्यात माझं लक्ष रस्त्यावर गेलं. दुरवरून एक पांढर टिंब माझ्या दिशेनं येत होत. थोडं जवळ आल्यावर लक्षात आलं तीही मोटरसायकल होती. मी हुश्श्य केलं, आता तिच्याच उजेडात गाडी दुरूस्त करावी म्हणूनं मी उभा राहिलो. त्या दिवशी नशीबाने मी ही पांढराच टी शर्ट घातला होता. आता ती मोटारसायकल मला अगदी स्पष्ट दिसायला लागली. आणि अचानक ती थांबली. आयला! याचीही गाडी बंद पडली की काय? मी हात हलवला. अंधारात याला मी दिसतोय तरी का? एक मिनीटभर ती तिथचं थांबली. आता माझा पेशन्स संपायला लागला. हात हलवत त्याच्यादिशेनं मी पळत सुटलो. त्या माणसाला काय वाटलं कुणास ठाऊक, गाडी वळवून एखादं भुत मागं लागल्यासारखा त्यानं पोबारा केला. आयला! मला भुत समजला की काय? मी अगदी रडायच्या बेताला आलो...
                  हताशपणे मी माझ्या गाडीकडं यायला लागलो. हळूच टेकडीवर नजर टाकली आणि मला काय दिसावं? टेकडीवर आता एक मशाल जळत होती! मला दरदरून घाम सुटला. बहुतेक बारा वाजलेले दिसत होते. पळत माझ्या गाडीकडे येत, थरथरल्या हातानं मी कार्बोरेटर शोधायला लागलो.  त्यानंतर मला तो कसा सापडला, त्यातले एक्स्ट्रा पेट्रोल मी कसं टाकून दिलं, हे मला काही कळल नाही. एक नजर वरच्या मशालीवर ठेऊन, घामानं थबथबलेल्या अवस्थेत मी जे काय करायचंय ते केलं. आणि गाडीला कीक मारली. आणि 'फट्-फट्' असा आवाज करत गाडी एकदाची चालु झाली. मनातनं शंकराचे लाख आभार मानून मी ती पळवली. एकदाही मागं वळून पाहिलं नाही.
                 त्या रात्री, बारामतीतल्या एका मित्राकडेच मी मुक्काम ठोकला. गेलं ते लग्न चुलीत....
                या गोष्टीला आता वीस-बावीस वर्षे होऊन गेली. त्यानंतर त्या रस्त्यानं मी किती वेळा आलो गेलो. जिथं माझ्या पाठीला स्पर्श झाला, तिथं कितीतरी झाडाच्या पारंब्या रस्त्यावर आल्या होत्या. आणि ती घटना घडल्यानंतर, दोन-तीन आठवड्यांनी सावकाराच्या घरातले चोरीचे दागिने त्या मंदिरात सापडले होते. आता या सगळ्याची जरी लिंक जुळत असली, तरी मी ती जुळवायचा कधीच प्रयत्न केला नाही. कारण तो अनुभव इतका जिवंत होता, की माझ्या सद्सद्विवेकबुद्धीनं सगळ्या तर्कांना गाडून टाकलं. माझ्यासाठी, माझी ती खास "भुताची गोष्टच" होती.


--------------------- समाप्त  ---------------------------------

अर्धविराम

        जिन्यावरुन पळत वर येत, तिनं दरवाजा उघडला. आई, समोर  फ़रशीवर भाजी निवडत बसल्या होत्या. चप्पल कशीतरी कोपर्‍यात  सरकावून ती बाथरुमकडे पळाली. तोंड दाबून धरलेली  ओकारीची उबळ भडकन बाहेर पडली. पोट धरुन तिनं उलटी  थांबवण्याचा प्रयत्न केला; पण ओयक ओयक करत ती उलटी करतच  राहिली. एकदा सगळ पोट रिकामं झाल्यावर तिला बरं  वाटलं. सिंकमध्ये तोडं धुवुन, तिनं आरशात पाहिलं. तिचे दोन्ही  डोळे पाण्यानं डबडबले होते. काही क्षण ती तशीच उभी  राहिली. स्वत:कडे पहात: दरवाजाला टेकून. आत येताना दरवाजा  बंद करायचाही ती विसरली होती. आई, मामांनी ऐकलं असेल  का? तोंडावर भरपूर पाणी मारुन नंतर टॉवेलनं पुसत  ती बाहेर आली.
        “पित्त झालंय का गं?” सासुबाईनी विचारलं.
        “हं बहुतेक” म्हणत ती स्वयंपाक घरात गेली. गॅसवर  चहा ठेवला. हे तिंच नेहमीचच रुटीन होतं.
चहा पिल्यानंतर सासू-सासरे बाहेर पडत. बिल्डिंगच्या  समोर गजाननाचं मदिंर होतं; तिथं सासूबाई त्यांच्या समवयस्क बायकांमध्ये जाऊन बसत. सासरे नेमानं पोवई  नाक्यापर्यंत चालत जात. त्यांच्या रिटार्यड मित्रांचा ग्रुप  बरेचदा 'साई हार्डवेअर' च्या कट्ट्यावर बसलेला असे. तिथं  त्यांचा तास-दीड तास सहज निघून जाई. आत्ताही ते टी. व्ही. वरच्या  बातम्या बघत चहाचीच वाट बघत होते.
       चहामध्ये साखर टाकताना तिचा हात कापत होता. ग़ेल्या  २-४ दिवसांपासूनच तिला त्याची चाहूल लागली होती. त्याचं ओझं मनावर घेऊन ती तेव्हापासून वावरत होती. पण आता  तिची खात्री झाली होती. आणि त्या ओझ्यानं दडपून  जाण्याऐवजी तिला एकदम मोकळं मोकळं वाटत होतं. जसं काही  पहिल्यांदा जेव्हा ती पोहायला शिकली, तेव्हा विहिरीतील  काळभिन्न पाणी बघून, तिच्या पोटात गोळा आला होता; पण पाण्यात  पडल्यावर, तिला माहित होतं की  आता हातपाय मारल्याशिवाय गत्यंतर नाही. संकटाची चाहुल लागल्यावर, ते येईपर्यंतच मनाची चलबिचल होते. एकदा का ते आलं की त्याचा सामना करण्यावाचून गत्यंतर नसतं: तिलाही ते कळुन चुकलं होतं.
        आणि कदाचित याचीच ती वाट पहात होती इतकी वर्षे! 
        चहा पिऊन झाल्यावर ते दोघंही बाहेर गेले. दरवाजा  बंद करुन ती बेडरुममध्ये गेली. काहीच सुचत नव्हतं  तिला. विमनस्क अवस्थेत ती तशीच बेडवर बसून राहिली.  समोरच्या आरशात तिचं प्रतिबिबं दिसत होतं. खरंच आपला  रंग उजळलाय का आजकाल? बॅंकेतल्या तिच्या मैत्रिणीनं  दिलेला शेरा तिला आठवला. तसाही आपला रंग सावळा  कधीच नव्हता. लग्नानंतर थोड्या अशक्त झाल्यामुळं दिसत असु  कदाचित. कसल्याशा कडवट आठवणीनं तिनं आवंढा  गिळला; चेहरयावर कठोर भाव पसरले. आपण असा काय गुन्हा केला होता म्हणून आपल्या नशिबी  हे भोग आले? चांगला संसार  करायचा, मुलाबाळांना वाढवायचं एवढ्याच तर आपल्या  अपेक्षा होत्या!
 --------------------------------------------
        पहिल्या रात्री 'तुम्ही बेडवर झोपा. मी खाली झोपतो' हे  सांगणारा तिचा नवरा तिला आठवला आणि हातात दुधाचा  पेला घेतलेली  हतबुद्ध अवस्थेत दोन पावलं मागं सरकलेली;  आपलं काही  चुकलं का या विचारानं बावरलेली ती नवी नवरी तिला  आठवली. एक,दोन  नाही दहा वर्षे झाली या गोष्टीला.
पहिली तीन एक वर्षे तिनं कुणालाच काही थांगपत्ता  लागून दिला नव्हता:  एक ना एक दिवस तरी तो तिच्याकडं येईल  या अपेक्षेनं. पण त्याच्यात काही बदल व्हायची चिन्हं दिसत नव्हती. व्रत केल्यासारखा तो खोलीत यायचा आणि मुसकटून भिंतीकडे तोंड करून झोपायचा. याला कसल्या इच्छा कशा होत नाहीत? तिला वाटे. तिच्या लग्न झालेल्या मैत्रिणींकडून ऐकलेल्या गोष्टी  तिला काही वेगळंच सांगत होत्या; आणि इथे काही वेगळाच प्रकार दिसत होता. हा पूर्ण पुरुष तरी आहे ना? या विचारानंही ती दचकत होती. पण तरीही, स्वभावानंच सहणशील असल्यामुळं की काय, किंवा सामाजिक रुढींच्या बंधनामुळे ही असेल; पण कसेतरी ती त्यातूनही आनंदात दिवस काढायचे प्रयत्न करत होती.
        आणि त्यातच त्यानं पुण्याला बदली करुन घेतली. प्रमोशन मिळालय, नाकारायचं कसं म्हणत; आई, तात्यांनीही  त्याला जाऊ दिलं. आठवड्या-दोन आठवड्यातून तो घरी येऊ लागला. आला की सगळ्यांशी चांगला वागे. तिच्याशीही. तसा तो तिच्याशी वाईट कधीच वागला नव्हता. कसेही वागण्यासाठी समोरच्याचं अस्तित्व तरी स्विकारायला हवं  ना! त्याच्यासाठी जशीकाही ती  अल्झायमरच्या पेशंटच्या भासातली काल्पनिक व्यक्ती होती! त्यानंतर मात्र तिचा धीर सुटला आणि एक दिवस माहेरी गेलेली असताना; तिनं आईला हे सगळ सांगितलं. हे ऐकल्यानंतर तिच्या आई-वडिलांच्या मनस्थितिची कल्पनाच न केलेली बरी! कितीतरी वेळा त्या नवराबायकोंनी : “आता फ़ॅमिली प्लॅनिंग राहू द्या; आम्हाला नातवंडाशी कधी खेळायला मिळेल ते सांगा?' असा तिच्याजवळ हट्ट केला होता. आणि प्रत्येकवेळी एवढे भयंकर सत्य लपवून तिनं हसून तो प्रश्न टोलावला होता. तिच्या घरच्यांकडून तरी या विषयावर काही तोडगा निघेल म्हणून; दोघांनी विचारविनिमय करून तिच्या सासूसासर्‍याच्या कानावर ही गोष्ट घातली  होती.
 --------------------------------------------
        त्या रविवारी तो घरी आला तेव्हा घरात तणावाचं वातावरण होतं. ती स्वयंपाक घरातली आवराआवर करताना बाहेर कान लावून बसली होती.  तिघंही शांतपणे टी.  व्ही.  पहात बसले होते. तात्यांना कशी सुरुवात करावी हे कळत नव्हतं. तर आईंना भीती वाटत होती की काही बोललं तर पोरगं डोक्यात राख तर घालून घेणार नाही! त्याची तशी ख्यातीही होती. तो लहान असताना; शाळा चुकवून, त्याच्या मित्राच्या भावाच्या लग्नाला गेला; म्हणून तात्यांनी त्याला वेतानं फ़ोडला होता. त्यानंतर चार दिवस तो घरातून बेपत्ता होता. तात्यांनी सगळीकडे धावाधाव केली होती; पोलीसात तक्रार सुद्धा नोंदविली होती. नंतर नाथाच्या डोंगराखाली रस्त्यावर खडीकाम करणार्‍या लोकांना तो दिसला होता. ४ दिवस डोंगरावरच्या टिचभर  मंदिरात रहात होता आणि मंदिरातल्या प्रसादावर पोट भरत होता! त्याच्या संतापी  व्रुत्तिची तेव्हापासून त्यांनी  धास्ती घेतली होती.
           बातम्या संपून जाहिराती सुरू झाल्या आणि एकदम हसत तात्यांनी सुरूवात केली.
“मग काय सर्व्हीस वगैरे ठीक चाललीय ना?”
“हं ठीक चाललीय.” टी. व्ही. वरून नजर न हलवता तो म्हणाला.
“नव्हे हे काय चाललय?” आईंनी थरथरत्या आवाजात विचारलं.
“काय, काय चाललय?” आईकडे पहात बेफ़िकीरीने तो म्हणाला.
“लग्नाला तीन वर्षे झाली. काय मुलं बाळं होऊन द्यायचा विचार आहे की नाही?” प्रश्न एकून त्याचा चेहरा काळाठिक्कर पडला, आत्ता त्याच्या सगळं लक्षात आलं. काही न बोलता घुम्यासारखा तो तसाच बसून राहिला.
“चांगल्या मुलीचं मातेर करु नकोस” धीर धरून आई पुढे म्हणाली; तसा तो उठला आणि कोपर्‍यातल्या बुटात पाय घालून, खाली वाकून लेस बांधू लागला.
"याच्यासाठी लग्न केलं का आम्ही तुझं?" - तात्यांचा आवाज त्याच्या कानावर पडला.
"कुणाला लग्न करायची हौस होती!" - फ़टकार्‍यानं तो म्हणाला.
"मग लग्न कशाला केलेस?"
"हे आत्ता विचारताय? लग्न लावून देण्याआधी नाही विचारलंत?"
रागाने दार आदळून तो चालता झाला.
 --------------------------------------------
          त्यानंतर दोन वर्षे घरी काही फिरकला नाही, पुण्यात बहिणीकडे येणं जाणं होत. तिच्याकडूनच यांना कळलं की मुलगी पसंत नव्हती त्याला. का? मग लग़्न का केल वगैरे कारणं विचारायची काही सोय नव्हती.
         सुरुवातीला तिला रात्र रात्र झोप यायची नाही. त्याचं तिकडे अफेयर तर चालू नसेल? काही वाईट नाद तर लागले नसतील! पण वर्षे गेली आणि तिला कळून चुकलं की तसं काही होणार नाही. तोही जर एकटा राहू शकतो तर आपणही राहू असं मनाला बजावत तिनं तेही आयुष्य स्विकारलं; तिनंच नव्हे तर सगळ्यांनीच स्विकारलं. तो घरी येऊ जाऊ लागला. बेडरूम मध्ये तिच्याबरोबर आई झोपू लागल्या. तो आला की हॉलमध्ये तात्यांबरोबर झोपत असे. बाहेरच्या लोकांसाठी तो आठवड्या-पंधरावड्याला येतो हे माहित असणं पुरेसं होतं. तो येऊन गेल्यानंतर, शेजारच्या बायकांनी  केलेल्या मस्करीला ती ह्रदयातील सल लपवून हसून उत्तरं द्यायला शिकली होती.
          महिन्या-दोन नहिन्यातून तिचे वडील येऊन जात. तिच्या नवर्‍याची आणि त्यांची भेट, लग्नानंतर एक-दोनदा झाली असेल तेवढीच. त्यांनाही त्याला भेटायची इच्छा होत नसे. तो घरी नाही पाहूनच ते येत. ते येत, तिच्या सासू-सासर्‍यांशी गप्पा मारत. तिचं कसं चाललंय याचं निरीक्षण करत आणि व्यथित मनानं परत जात. कधी ना कधीतरी तिची गाडी  रूळाला लागेल याच आशेवर ते होते.
         त्यानंतर कधीतरी तिला बॅंकेत जॉब लागला. ग्रॅज़्युएट तर ती होतीच आणि घरात बसून डोक्यात नाही ते विचार येण्यापेक्षा बाहेर जाऊन जरा चार लोकांत मिसळेल म्हणून तात्यांनीच, त्यांच्या मित्राच्या ओळखीनं तिला तो जॉब मिळवून दिला होता.
        आणि तिथेच तो तिला भेटला.
        बॅंकेच्या पिकनिकला दोनदा तिनं नाही म्हंटल्यावर तिच्याजवळ येऊन त्यानं विचारलं होतं,
“पाटीलबाई तुम्ही येताय ना पिकनिकला?”
“नाही हो काम आहे जरा” डेस्क आवरता आवरता ती म्हणाली होती.
“हे काही नाही. कसले काम आहे? बॅंकेतले सगळे कर्मचारी येत आहेत. तुम्हीच एकट्या नाही म्हणताय. मागच्या वर्षीही तुम्ही नाही आलात. आमची कंपनीही एवढी काही वाईट नाही! “  तो थोड्याशा मिश्किल आवाजात म्हणाला होता.
“तसं नाही हो...” तिला काय बोलावं तेच कळलं नव्हतं.
         ती मुळातच अबोल होती, आणि कुणी अशी थोडीशी जवळीक दाखवायचा प्रयत्न केला तर ती भांबावूनच जात असे. पण सुनीलची गोष्टच वेगळी होती. इतका मसकर्‍या होता तो! आणि ऑफिसमध्ये सर्वांना मदत करण्यास तत्पर, त्यामुळं त्याला नाही  म्हणायचं तिला काही जमलं नव्हतं. आणि त्या वर्षीच्या पिकनिकला ती गेली होती.
          त्यानंतर तिच्या बॅंकेत मैत्रिणीही झाल्या. पण तिनं त्यांना काही अंतरावरच ठेवलं. कुणाच्याही जास्त जवळ जायची तिला भीतीच वाटत असे. न जाणो आपल्या अंतरीचं  शल्य त्यांना कळ्लं तर! पण वर्षे निघून गेली आणि ती सुनिलशी मनमोकळेपणानं बोलू लागली. सुनील कधी कधी त्याच्या मुलांना बॅंकेत घेऊन येत असे. त्याचा मुलगा सहा वर्षाचा आणि मुलगी तीन वर्षांची होती. ती दोघे बॅंकेत आली की  तिचा वेळ कसा आनंदात निघून जाई. त्यांच्याबरोबर तिही लहान मुलं होऊन जाई. सुनीलला तिच्या स्वभावातल्या बदलाचं खूप आश्चर्य वाटे. त्याच्या मुलांकडचा तिचा ओढा बघून त्यानं तिला खुपदा घरीही  बोलावलं. 'मिस्टरांनाही बरोबर घेऊन ये' असंही बजावलं. पण  प्रत्येक वेळी काहीतरी कारण देऊन तिनं ते आमंत्रण नाकारलं होतं.
            नंतर सुनीललाही, इथं काहीतरी पाणी मुरतंय याचा मागमूस  लागला होता. आणि नंतर त्यानं कधी तो हट्ट केला नव्हता.
 --------------------------------------------
          दिवस सरत होते, ऋतु बदलत होते. त्या दोघांच्या नात्यामधे कसलेसे निराळे बंध निर्माण होत होते. इतकी वर्षे सुप्तावस्थेत असलेल्या तिच्या भावना उसळून वर येत होत्या. कधी न अनुभवलेल्या आनंदाने वारंवार तिचं ह्रदय भरुन येत होतं. बॅंकेतून घरी आल्यावरही, त्याच्याच मनोराज्यात ती गुंगुन जात होती. सकाळी घराबाहेर पडताना तीनदा आरशात वळून स्वत:ला पहात होती.
सुनीलच्या लक्षात तिच्यातले हे बदल येत होते. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीसारखे तिचे अविर्भाव पाहून; त्याचंही मन ताळ्यावर राहत नव्हतं. सहेतुक स्पर्श होत होते. नजरा टाळल्या जात होत्या. हे आपल्याला काय होतंय हे तिला कळत नव्हतं. आपण याच्या प्रेमात तर नाही पडत आहोत? हा प्रश्न तिला वांरवार सतावत होता. तिच्या मनात द्वंद्व सुरू होतं. पण मनावर कितीही ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या मनाचं  पाखरू पुन्हा पुन्हा त्याच्याच मिठीत जाऊन विसावत होतं. पुरूषाची मिठी, ते आसुसलेलं चुंबन यांबाबत तिनं फक्त  कादंबर्‍यातच वाचलं होत. पण आता हे सगळं तिला हवं होतं. कधी कधी तो तिला स्कुटरवरून तिच्या घराजवळच्या बसस्टॉप पर्यंत सोडत असे, तेव्हा त्याच्या पाठीचा होणारा स्पर्श, तो वास तिला बेभान करत असे.
              ती ओढ, ते आकर्षण एवढं अफाट होतं की त्याच्यासाठी तिनं सात समुद्रही ओलांडले असते. म्हणून जेव्हा त्यानं तिला हॉटेलमध्ये बोलावलं, तेव्हा एखाद्या तुफानासारखी धावत ती गेली होती, त्यात आश्चर्य कसलं!
 --------------------------------------------
              बेडवर बसल्या बसल्या हे सारं तिला आठवत होतं. अजून आई,तात्या परतले नव्हते. गॅस बंद करून ती बाल्कनीत गेली. आकाश ढगांनी अंधारून आलं होतं. जोराचा वारा सुटला होता. रस्त्यावरचा पालापाचोळा हवेत वर गिरक्या घेत होता. विजा कडाडत होत्या. वार्‍यावर तिचे केस,पदर उडत होते. तिला हलकं वाटत होतं. इतक्या वर्षाचं ह्रदयावरचं दडपण वार्‍यांवर जसं काही उडून जात होतं. तिनं दोन्ही हात हवेत पसरले. आपणही त्या पालापाचोळ्यासारखं उडून जावं असं तिला वाटलं. तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाचे मोठ-मोठाले थेंब तिच्या डोळ्यांतील ओघळणारे अश्रू धूवून टाकू लागले.
             “अगं पावसात अशी भिजतेस काय?”  मागून आईच्या ओरडण्यानं ती भानावर आली. कसल्याशा धुंदीत आत येत, हॉलच्या दरवाजात उभी राहून तीन गोप्यस्फोट केला: "आई मी प्रेग्नंट आहे." टॉवेलनं केस पुसणार्‍या आईंचा हात झटका बसल्यासारखा थांबला. त्यांच्या 'आ' वासलेल्या तोंडाकडे जास्त वेळ न पहाता ती बाथरूममधे शिरली.
"कुणाचं आहे?" बाथरुमच्या बंद दरवाजाला लागून थोड्या वेळानंतर आईंनी विचारले.
त्यांच्या प्रश्नाचंही तिला नवल वाटलं.
"तुमच्या मुलाचं नाही." निर्विकारपणे तिने उत्तर दिले.
             दुसर्‍या दिबशी सकाळी आठच्या ठोक्याला, दारात तिचे आई-बाबा हजर होते. आई समोर दिसताक्षणी तिच्या मनाचा बांध सुटला; बेडरुममध्ये दोघी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडत बसल्या. "काय चुकलं आई माझे? मला कसल्या सुखाचा अधिकार नाही का?" - रडण्याचा भर ओसरल्यावर तिने आईला विचारले.
              जुन्या पिढीतली तिची आई; या प्रश्नावर तिच्याकडे उत्तर नव्हते. किंबहूना असले काही होऊ शकते, याची तिने स्वप्नातही कल्पना केली नसेल! तिच्या पापभिरु मनासाठी हा जबरदस्त धक्का होता. हुंदके देऊन रडणार्‍या आपल्या मुलीचे ती  धड सांत्वनही करु शकत नव्हती. काय सांत्वन करायचे अशा मुलीचे! लग्न झाल्यावर, कसाही असेना, पती हाच परमेश्वर, असे मानणारी बाई ती! मोठ्या विचित्र अवस्थेत सापडली होती.
             "आयुष्यात सगळ्या गोष्टी प्रत्येकाला मिळतातच असं नाही सुमा." - त्यातूनही ती शब्द जोडत होती."जे आहे त्यातच समाधान मानलं पाहिजे. आता तुझ्या या करणीनं, उद्या काही वाईट झाले तर? उमाच्या लग्नाचं चाललंय...गावात हे कळलं तर किती छी थू होईल. आणि तुझ्या भविष्याचं काय?... भावनेच्या भरात खूप मोठी चूक केलीस तु सुमा..."
           हातात तोंड लपवून रडणार्‍या आईकडे ती सुन्नपणे पहात राहिली.
           स्वयपांकघरात सासूबाईंची एकट्यांचीच खुडबुड चाललेली पाहून ती आत गेली. ती येताच फणकार्‍याने झटकन किचनमधून त्या बाहेर पडल्या. हॉलमध्ये तात्या आणि तिचे बाबाही सुतकी चेहेरे करून बसले होते. आल्यापासून बाबा तिच्याशी बोलले नव्हते. किंबहूना तिच्याकडे पहाण्याचेही ते टाळत होते. नाष्ट्यानंतर ते दोघेही बाहेर पडले. रस्त्याला लागल्यानंतरही बराच वेळ ते दोघे शांतपणे चालत होते.
"काय करायच आता?"अचानक तिच्या वडीलांनी विचारलं.
"काय करायचे कळत नाही. वाटलं कधीतरी पोराचं डोकं ताळ्यावर येईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. पण भलतंच काही होऊन बसलं."
चालत चालत ते मंदिरापर्यंत आले. एका पायरीकडे,  बसण्यासाठी हात करत, खालच्या आवाजात तात्या म्हणाले 'डॉक्टरांकडे जाऊन मोकळी करावी तिला, असं वाटतय'.  हतबुद्ध झालेले तिचे वडील तसेच जाग्यावर खिळून राहिले. त्यांचा घसा भरून आला. कसलं नशीब ही पोरगी घेऊन आली! चांगला नवरा मिळाला असता तर आत्तापर्यंत दोन-तीन नातवंडे मांडीवर खेळती. पण त्यांनाही दुसरा मार्ग दिसत नव्हता. एवढा धिप्पाड माणूस पण दहा वर्षांनी थकल्यासारखा पायरीवर टेकला.
“घ्या; काहीही निर्णय तुम्ही घरातले लोकं मिळून घ्या. पण तिला जर काही कमी जास्त झालं, जर तिनं स्वत:ला काही करून घेतलं, तर मी तुम्हाला जबाबदार धरीन. आणि तुमच्या त्या मुलाला काही सुखानं जगुन देणार नाही एवढंच लक्षात ठेवा.”  डबडबलेल्या डोळ्यांनी  त्यांनी  तात्यांना तंबी दिली.
                   जेवणाच्या वेळेपर्यंत तिचा नवराही आला होता. कसेबसे चार घास खाऊन हॉलमध्ये त्यांची बैठक बसली. सासुबाईही त्यांच्याबरोबर बसल्या. तात्या बोलायला सुरुवात करणार, तोच तिचा नवर्‍याने, "मला काही बोलायचंय तात्या" म्हणून बोलायला सुरुवात केली. त्याला आता घटस्फोट हवा होता. त्याचे बोलणे संपताच तिचे वडिल संतापाने थरथरत उभे राहिले."लग्न करून आणलीत आणि कधी नांदवली नाहीत. गेली दहा वर्षे पोरगीनं अस्से दिवस काढलेत आणि आता तुमची हिम्मतच कशी होते घटस्फोट मागायची.?" ते म्हणाले. ती भिंतीला टेकून आत बसली होती. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या.
"घटस्फोट या घराण्याला शोभत नाही. मी जिंवत असेपर्यंत ता घरात घटस्फोट कदापि होऊ देणार नाही. माझ्या पश्च्यात तुम्ही काहीही करा."  तात्यांचा कडाडणारा आवाज तिने ऐकला. कुठून एवढं बळ संचारलं तिच्या अंगात पण; झंझावातासारखी ती हॉलमध्ये आली.
"आणि तुमच्या पश्च्यात काय, तात्या?" तिने तात्यांना प्रश्न विचारला. तिच्या या धाडसाने सगळेच अचिंबित झाले.
"तुम्हा लोकांना घटस्फोट नकोय, कारण तुमच्या घराण्याला बट्टा लागेल. माझ्यापेक्शा तुम्हाला तुमच्या समाजाची जास्त काळजी!”
“ माझ्याकडून चुक झाली मला कबूल आहे. पण त्याला जबाबदार फक़्त मीच आहे का? गेली कित्येक वर्षे विवाहीत असून मी कुमारिकेसारखी राहतेय. तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था असेल याचा तुम्ही विचार केलात का? यांची लग्नाची इच्छा नव्हती तर तुम्ही यांच लग्न का लावून दिलेत? यांना मी पसंत नव्हते तर हे लग्नाला का उभे राहिले? आणि या सगळ्यामध्ये बळी माझाच गेला ना?"
"आम्हाला हे कबूल आहे प.."
"थांबा तात्या मला बोलू द्यात." सासर्‍यांना अडवत ती म्हणाली.
"गेले दहा वर्षे माझ्या मनाची, माझ्या जीवाची जी तगमग झाली. ती दूर करायला कुणी मदत केली? उलट तुम्ही सगळे गांधीजींच्या माकडासारखे डोळे,कान बंद करुन बसलात: कधीतरी सगळे सरळ होईल म्हणून. पण कधी? हे तुम्ही तुमच्या चिरंजीवांना खडसावून कधी विचारलंत, तात्या?"
"मी ही माणूस आहे, मलाही भावना आहेत; हा विचार तुम्हा लोकांना कधी स्पर्श करुन गेला नाही? आणि आता कधी नव्हे तो मला आशेचा एक किरण दिसतोय; तो ही विझवायला निघाला आहात. मला आई व्हावंस वाटत नाही का? आणि दुसरं मुलं होईल याची शाश्वती काय? नंतर कशाच्या आधारावर मी माझं आयुष्य काढणार आहे?”  तिनं उत्तराच्या अपेक्षनं सगळ्यांकडं पाहिलं. पण कुणाकडेच उत्तर नव्हतं.
“मला हे मुल हवंय. आणि या घरात राहून जर ते शक्य होणार नसेल; तर मी घराबाहेर पडायला तयार आहे.” शेवटी निर्धाराने ती म्हणाली.

   तिच्या बोलण्यातला निश्चय ऐकून सगळेजण आवाक् होऊन तिच्याकडे पहात राहिले!
 --------------------------------------------

मोरपीस

        नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली तिकीटं मी बुक केली.त्या दिवशी घरी परतताना माझा आनंद गगनात मावत नव्हता. तीन वर्षांनी मी भारतात निघाले होते. या तीन वर्षातली पहिली दीड वर्षे कशी पटकन निघून गेली होती. जास्त हुरहुर न वाटता. पण नंतरच्या दीड वर्षातला प्रत्येक दिवस न दिवस मी अगदी रेटला होता. मागच्या सहा महिन्यात तर मी घरातल्यांचा एवढा जोसरा काढला होता की अगदी दररोज घरी फोन होत होता. शेवटी 'या फोनवर जेवढे पैसे घालवतेयस त्यावर भारताच्या २-३ ट्रिप्स सहज झाल्या असत्या' असं म्हणत माझ्या नवरयानं भारताला जायचं एकदाचं मनावर घेतलं.
         भारतात जायच्या नुसत्या कल्पनेनंही माझ्यात भलताच उत्साह संचारला होता. आणि त्यात ते 'फॉल' चे दिवस होते. हा नयनरम्य,रहस्यमय फॉल मला नेहमीच वेडा करत आला आहे. अगदी पहिल्यांदा मी त्याला पाहीलं तेव्हापासुन! मग ऑफिसला जाताना हायवे घेण्याऐवजी मी लोकल रोड्स घ्यायला सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही कडेनं ती रंगीबेरंगी झाडे पहात जाण्याचा माझा रोजचा क्रम झाला. कधी दिवस स्वच्छ असला तर सगळं कसं एकदम शांत वाटे. माझी गाडी पिवळ्याधमक फुलांचं उंचच उंच कुंपण केलेल्या रस्त्यावरुन अलगद जाई. मधूनच ती चित्रातली चिमुकली घरं डोकावत. श्वास थोडावेळ आतच अडकला जाई. तर कधी वारा जोरात वहात असेल, तर मी खिडक्या उघड्या ठेवी. भणाणणारी हवा आत शिरे. एकदम माझ्या गावातल्या शेतावर गेल्याचा भास होई. कधी ती रंगीत पानं हवेवर फेर धरुन नाचत आणि मी उघड्या खिडकीतुन हात लांबवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करी. पुन्हा ती हवा मी मोठ्यानं श्वास भरुन घेई आणि मनात चुकचुके..एवढं सगळं छान आणि कसलाच वास कसा नाही? एवढ्या प्रकारची फुलं, त्यांचा सुगंध हवेत भरत कसा नाही ? त्यावेळी भारताची मला तीव्रतेनं आठवण होई. पाऊसानंतर मातीचा तो मदमस्त करणारा सुगंध! या कशाचीच त्याला सर येणार नाही असं वाटे. त्या माझ्या आवडत्या फॉल चे मी भरपुर फोटो काढून घेतले होते,बरोबर माझ्या सुबक घराचेही. भारतात जाण्याची माझी पुर्ण तयारी झाली होती.
        भरलेल्या ह्र्दयाने आम्ही विमानतळावर उतरलो. उतरल्या उतरल्या माझ्या नाकाला कसलातरी वास झोंबला. या वासाची मी अपेक्षा केली नव्हती.उगाचंच प्रत्येक श्वासागणिक किती विषाणू पोटात जात आहेत याची मला काळजी लागली. आणि स्वत:चाच राग आला.मुंबईहुन पुण्याकडे येताना, रस्ताच्या दोन्ही बाजुच्या गगनचुंबी इमारती बघुन माझी छाती दडपून गेली.पुण्यात मी माझ्या बहिणीच्या फ़्लट वर उतरले होते.त्या सोसायटीत काय नव्हतं? क्लब हाउस,स्विमिंग पुल,डे-केअर..इथं आपण ज्याला लक्झरी म्हणतो, ते तिथं आता नॉर्मल झालंय. तिच्या फ़्लटवर बाथरुम्सही वेस्टर्न स्टाईलचे होते. बिना टिशूपेपरचे ते कमोड वापरायचं कसं हा प्रश्न मला पडला. फ़्लटचं भाडं ऐकुन तर मला चक्कर यायचीच राहिली होती. तिथे प्रत्येकच गोष्टीतली महागाई पाहून मला अचंबा वाटला. गुढग्यापर्यंतचा स्टायलीश स्कर्ट आणि ट्रेंडी(हा शब्द तुम्हाला तिथं सगळ्या दुकानात ऐकायला मिळेल) टॉप घातलेल्या माझ्या बहिणीने साध्या रिक्षासाठी पाचशे रुपयची नोट काढुन दिली तेव्हा मी आश्चर्याने पहातच राहिले. शॉपिंगला गेलो तर सगळे वेस्टर्न कपडेच विकायला!
        ' अगं मला जरा ट्रडीशनल कपड्यांच्या दुकानात घेउन चल बाई ! ' मला तिला सांगावं लागलं. दुकानात गेल्यानंतर मी मराठीत विचारलेल्या प्रश्नांना इंग्लीशमधे उत्तरं मिळाली. आणि मी नक्की कुठे आहे हेच मला कळेना.
        प्रदुषण, बेशिस्त वाहनचालकं, अमर्याद गोंगाट आणि अस्वछता यांच्या आवरणाखाली तिथं एक नवीन अमेरीकन संस्कृतीच उदयाला येते आहे असं मला वाटलं. यासाठी मी इथे आले नव्हते. माझ्या मनाला खुपच हूरहूर वाटून राहिली. येताना दोन दिवसांसाठी म्हणून गावी गेले.गावं तसंच होतं. घरासमोरचं तुळशीवृंदावन, भोवतालची जाईची, गुलाबाची फुलं. मन कसं प्रसन्न झालं. सकाळी रेडिओवर अभंग ऐकताना मी अंगणात सडा घातला, आणि मातीचा 'तो' वास दरवळला. श्वास भरभरून मी तो वास घेतला पण मनाचं समाधान काही होईना. मी ज्या भारताच्या ओढीनं आले होते तो शेवटी मला सापडला होता.
        निघताना माझ्या वडिलांनी, आमच्या शेतावर सापडलेली मोरपीसं मला दिली.
        भारत भेट आटोपून, डलसच्या विमानतळावर आम्ही उतरलो. बर्फ नुकताच पडून गेलेला दिसत होता. स्वच्छ रस्त्याकडेची बर्फानं वेढलेली ती झाडं आणि घरं पाहून मन आनंदानं उचंबळलं होतं. वाटलं आपल्या घरी आलो.
        आणि माझी मीच दचकले. हे कधीपासुन 'आपलं' वाटायला लागलं मला! भारतात राहून अमेरीकनांसारखं राहण्यापेक्षा, अमेरीकेत राहून भारतीयांसारखं राहणं मला पटलं असावं. पण मग माझं काय? हे घर की ते घर ?
        वडिलांनी दिलेलं मोरपिस गालाशी धरत मी विचार करत राहिले.

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २००९

फर्स्ट ब्लॉग

"हे ते आणि सगळे" हा मराठी ब्लॉग मी सुरु करते आहे. याच्यामधे नावाप्रमाणेच हे, ते आणि सगळंच असणार आहे. कथा,कविता, लेख,विचार, गप्पा आणि वाट्टेल ते! लिहण्याची हौस तरी आहे. बघुया कसंकसं जमते ते!