गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

विरंगुळा

(मेनकाच्या जून 2012 अंकातून साभार)

                                                    श्री
भाग १

"काय करतीयेस" पलीकडून त्याने विचारलं.
"हं!" तिने निश्वास टाकला. "म्हटलं सकाळपासून कसा फोन आला नाही. बिझी होतास का?"
"बिझी नव्हतो. असाच कुणाचातरी विचार करत होतो."
ती गप्प बसली. "कुणाचा" असं विचारलं तर तो काय बोलणार हे तिला पक्कं माहित होतं.
"कुणाचा असं नाही विचारणार?" त्याने तिकडून विचारलंच.
"नाही. मी तसलं काही विचारणार नाही. आणि तुही असलं फालतू काही विचारायचं बंद कर." तिने रागाने फोन आपटला.

अमेरिकेत आल्यापासून दररोज सकाळी तिला फोन करायचा हे त्याचं ठरलेलं होतं. सुहासची आणि तिची ओळख जुनी असली तरी तो तिचा खास मित्र वगैरे नव्हता. कॉलेजमध्ये असताना तिच्या ग्रुप मध्ये असायचा एवढंच. दिसायलाही बेताचाच. काळा, स्थूल, नीटनेटक्या चेहऱ्याचा. एकदम कुणी प्रेमात पडावं असा नक्कीच नाही. गेल्या वर्षी फेसबुकमूळे नव्याने ओळख वाढली होती. तेव्हा तो भारतातच होता. अमेरिकेत येण्यासाठी त्याचा प्रयत्न चालला होता. ती उत्साहाने तिचे, तिच्या नवर्याचे आणि मुलांचे फोटो फेसबुकवर टाकायची. त्याच्याकडून लगेचच फीड बॅक मिळायचा. हा ड्रेस चांगला दिसतोय, साडीत सुंदर दिसतेयस किंवा अजूनहि काहीच बदल झाला नाही तुझ्यात असे कॉमेंट्स पाठवायचा. कधी कधी तोही त्याच्या मित्रांबरोबर गोव्याला वगैरे गेलेले फोटो टाकायचा. पण त्याने त्याच्या कुटुंबाचे फोटो कधी अपलोड केले नाहीत. तिनेही कधी विचारलं नाही. विचारावं असंही कधी वाटलं नाही.

फेसबुकमुळे तिच्या कॉलेजमधले कितीतरी मित्र मंडळ तिला ऑनलाईन भेटलं होतं. वीस वर्षापूर्वीच्या बऱ्याचशा मित्र मैत्रिणी तर तिला ओळखताही आल्या नव्हत्या, एवढ्या बदलल्या होत्या. बारीक, सडसडीत मुलींच्या आता केस पिकलेल्या, स्थूल बायका झाल्या होत्या. तोंडावर बावरलेले भाव असलेल्या अशक्त मुलांचे, आता ढेरीवाले सभ्य गृहस्थ झाले होते. बदलला नव्हता तो फक्त हाच. म्हणजे त्याला ओळखायला तिला काही अडचण आली नव्हती.

त्याचं अमेरिकेत येण्याचं नक्की झाल्यावर "कधी बोस्टनला आलास कि माझ्या घरी नक्की ये" असं तिने आवर्जून त्याला सांगितलं होतं. त्यात जुन्या मित्राला भेटण्याचा आनंद तर होताच पण ती आणि तिचे आदर्श, सुखी कुटुंब त्याला दाखविण्याचा मोहहि तिला झाला होता.

ती बोलून तर बसली होती पण तो लगेचच येईल असं काही तिला वाटलं नव्हतं. कॅलिफोर्नियात आल्यानंतर पहिला लाँग विकएंड बघून त्याने बोस्टन चे तिकीट बुक केले तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. एअरपोर्टवर त्याला पिकअप करायला तिचं सगळं कुटुंब गेलं होतं. फोटोत त्याच्यात इतका बदल झालेला दिसत नव्हता, पण प्रत्यक्षात तिला त्याला ओळखायला काही सेकंद लागले. त्याचा स्थूलपणा गेला होता. गोलमटोल चेहरा आता आकर्षक दिसत होता. अर्ध्या बाहीच्या टी शर्ट मधून त्याचे पिळदार हात दिसत होते. स्वारी जिम मध्ये जात असणार, तिने ताडले. नवऱ्याशी त्याची ओळख करून देताना तिला संकोचल्यासाखे झाले. पण तिच्या नवऱ्याला त्यात काहीही गैर वाटलेले दिसत नव्हते. बायकोचा जुना कॉलेज मधला मित्र आहे, प्रथमच अमेरिकेत आलाय, तेव्हा त्याला बोस्टन दाखवायचं कामही नवऱ्याने उत्साहाने केलं होतं. तिच्या दोन्ही मुलांनी त्याला काका म्हणून त्याच्याशी जवळीक साधली होती. त्यांच्या पाहुणचाराची परतफेड तोही त्यांना, तिच्या कॉलेज मधल्या गोष्टी सांगून करत होता. मुलांची चांगली करमणूक होत होती आणि तिला याच्या एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात कशा आहेत याचं आश्चर्य वाटत होतं. जाताना त्याने तिच्या १२ वर्षांच्या ओमला मार्केट मध्ये आलेला नवीन ipad-२ घेऊन दिला त्यावर काय बोलावे तिला कळेना. नवर्यानेही टोमणा मारलाच, तुझा मित्र काही तुझ्यासारखा कंजूस दिसत नाही म्हणून!

एकंदर त्याला इम्प्रेस करण्याचा तिचा प्लॅन त्याने उधळून लावला होता. उलट तोच तिच्या घरातल्या सगळ्यांना आणि खुद्द तिलाही इम्प्रेस करून गेला होता. आता परत त्याचा फोन आला कि नक्की त्याला रागवायचे असं तिने मनाशी ठरवले. त्यासाठी तिला जास्त वेळ काही वाट पहावी लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमध्ये पोहचण्याआधीच त्याचा फोन आला. "आता मी गाडी चालवतेय. मला नंतर फोन कर." तिने त्याला थोड्या अधिकारानेच सांगितलं.

ऑफिसमध्ये गेल्यावर थोड्या वेळाने तिने त्याला फोन लावला.

"मग पोहचलास का व्यवस्थित?" तिने विचारलं.
"हो. सात आठ तास लागले पण झोपून गेल्यामुळे एवढ काही वाटले नाही. आणि का गं, तुझ्याकडे ब्ल्यू टूथ नाही का?" त्याने पुढे विचारलं.
"नाही. का?"
"नाही अमेरिकेत सगळ्यांकडे असतो म्हणून म्हटलं! "
"असं काही नाही" जरा रागातच ती म्हणाली. "माझ्याकडे iPhone ही नाही आणि टॅबलेट ही तूच घेऊन दिलीस. आणि बाय द वे, मला तुझ्याशी त्याबद्दल बोलायचे आहे. ओम ला टॅबलेट घेऊन द्यायची तुला काय गरज होती?"
 थोडा वेळ तिकडून तो काहीच बोलला नाही. तिच्या रागाचा स्वर त्याने ओळखला.
"काही नाही, घेऊन द्यावासा वाटला."
"का?"
"सगळ्याच गोष्टींना कारण पाहिजे का?"
"ऑफकोर्स."
"कारण काही नाही. इतक्या वर्षांनी तुला भेटलो आणि तुझ्या मुलाला मला काहीतरी घेऊन द्यावेसे वाटले यात चूक झाली का?" थोड्या वाढत्या आवाजातच त्याने विचारले.
"अर्थातच. ते तू काय घेऊन दिलेस त्यावर अवलंबून आहे. एखादी छोटीशी गोष्ट घेतली असती तर मी काही म्हणाले असते का?"
"बरं बाई. चूक झाली माझी. आता माफ करशील? आणि ते ब्ल्यू टूथ बद्दल ही म्हणालो कारण त्याच्यामुळे तुला कार मध्ये हँड्स फ्री बोलता येईल म्हणून. खरच तो तू घ्यायला पाहिजेस."
"मी कारमध्ये जास्त बोलतच नाही आणि मला नाही वाटत मला त्याची गरज आहे म्हणून." आवाज जरा खाली घेत पण तरीही निर्धारान ती म्हणाली. "बरं चल आता. तुझं ऑफिस अजून सुरु व्हायचं असेल पण माझं ऑलरेडी झालंय." म्हणत तिने फोन ठेऊन दिला.

नंतर दररोज त्याचा फोन येऊ लागला. तो हुशार तर होताच पण त्याची स्मरण शक्तीही खुप चांगली होती. तो कॉलेजमध्ये घडलेल्या सगळ्या घटनांबद्दल अगदी तपशीलवार बोले. इंटर कॉलेजच्या डान्स कॉम्पिटीशन मध्ये तिच्या ग्रुपने पहिला नंबर पटकावला होता. तो त्या डान्स मध्ये नव्हताही, पण त्याचा कोरियोग्राफर कोण होता, तिने कोणता ड्रेस घातला होता हे सगळं त्याला तिच्यापेक्षा जास्त आठवत होतं. का फक्त तिच्या बद्दलच्या घटनांचीच त्याला ठळक आठवण होती कुणास ठाऊक? पण तिने त्याची पर्वा केली नाही. त्यांचे बोलणे सहसा अमेरिकेतले आयुष्य, कॉलेज मधल्या गमती जमती यापुरतेच मर्यादित असे, पण कधीकधी तो तिला समजेल असं सूचक काहीतरी बोलून जाई आणि मग तिचं ओरडणं खाई.

भाग 2

असा एखादा महिना गेला असेल आणि एक दिवस तिच्या नवऱ्याने तिच्या हातात एक पाकीट दिले. पत्र सुहासकडून होते. तिने उघडून पाहिले आणि तिला गोड धक्का बसला. आत मोरपिसाचे चित्र असलेल्या कागदावर एक कविता प्रिंट केली होती. कविता वाचताना तिच्या लक्षात आलं कि ती तिचीच कविता होती. कॉलेजमध्ये असताना कधी तरी केलेली. त्याच्या खाली त्याने त्या कवितेचं विडंबन ही केले होते. आणि पत्राच्या शेवटी "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" असं लिहिलं होतं. तिचा वाढदिवस दोन दिवसांवर आलाय हे तिच्याही लक्षात नव्हतं.

"ओ माय गॉड!" हसत ती उद्गारली
"काय झालं?" बाकीची पत्रे चाळता चाळता तिच्या नवऱ्याने विचारलं.
"हे बघ." तिने कागद त्याच्या हातात दिला. त्याने ती कविता मोठ्याने वाचली. "कुणाची कविता ही?" हसत त्याने विचारले.
"माझीच. मी बहुतेक कॉलेजच्या वार्षिक मासिकात दिली होती एका वर्षी. त्याने कुठून उपलब्ध केली कुणास ठाऊक?" ती अजूनही त्या कागदाकडेच बघत होती. "हाऊ नाईस ऑफ हीम. माझ्याही लक्षात नव्हता माझा बर्थ डे!" ती पुटपुटली.
"चांगलाच मित्र दिसतोय तुझा. कॉलेजमध्ये तुझ्यावर क्रश वगैरे नव्हता ना?" तिचा नवरा गमतीने म्हणाला.
"मला नाही वाटत. दुसऱ्या वर्षात असताना, आमची एक जुनिअर त्याला आवडायची. पण ती होती मुस्लीम म्हणून त्याने विचारायचं कधी धाडस केलं नाही. मला वाटत त्या वयातली मैत्रीच अशी असते. आता आपण करायचं म्हटलं तरी असे मित्र मिळत नाहीत." थोडसे भारावून जाऊन ती म्हणाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्याचा फोन आला. तिला गिफ्ट मिळालं का हा त्याचा पहिला प्रश्न होता.
"हो मिळालं. अँड थँक्स फॉर दॅट. इट वॉज द नाईसेष्ट गिफ्ट आय हॅव रिसीव्हड सो फार." प्रामाणिकपणे तिने सांगितलं.
"मला वाटलंच तुला खूप आवडेल ते. तुला आठवतं आपण एकदा कॉलेजमध्ये तुझा बर्थडे कसा साजरा केलेला?" उत्सुकतेने त्याने विचारलं.
"माझ्या बर्थडे च्या निमित्ताने तुम्ही बियर प्यायली होती. आठवतंय ना! आणि आम्हा मुलींना तुम्हा लोकांना झिंगलेल्या अवस्थेत तुमच्या होस्टेल वर सोडून यावं लागलं होतं. त्यानंतर आमच्या रेक्टरचं आम्हाला किती बोलणं ऐकावं लागलं माहित आहे का तुला?" लटक्या रागाने तिने म्हटले. त्यावर दोघांनाही हसू आले.
"काय दिवस होते ना ते? आता किती गोष्टी बदलल्यात. तू तेव्हा दिसायचीस तशी आता तुझी मुलगी दिसायला लागलीय. खूप गोड आहेत तुझी मुलं. खरं तर अजूनही माझा विश्वास बसत नाही कि तुला एवढी मोठी मुलं आहेत! कॉलेज संपल्यानंतर लगेचच लग्न केलंस का?" बहुतेक कॉलेज ते लग्नापर्यंतचा इतिहास त्याला सांगायचा राहिला होता. मग तिने कॉलेज सोडल्यापासून काय झाले, त्याचा सगळ्याचा पाढा वाचला.
"तेव्हा तू किती कविता करायचीस. तुझ्या लग्नानंतरच्या नवीन कविता पाठव ना?"
"मी कविता करणं कधीच सोडून दिलेय." हसत ती म्हणाली.
"का?" आश्चर्याने त्याने विचारलं.
"एकदा संसाराच्या जाळ्यात अडकलं की कुठची कविता आणि कुठचं काय. तुलाही माहीत असेलच ना? पण तू मला तुझ्याबद्दल काहीच सांगत नाहीस? माझ्याकडून मात्र सगळं काढून घेतोस. माझ्या घरी होतास तेव्हाही तू तो विषय टाळलास" खोटं खोटं रागावून तिने विचारलं.
"माझ्याबद्दल काही सांगण्यासारख नाही आहे तर मी काय सांगू? आणि तुझ्याबद्दल ऐकायलाच मला जास्त मजा वाटते." थोड्या आगाऊपणे तो म्हणाला.
"तुझं लग्न झालंय का ते तरी सांग?"
"नाही झालं. लग्नासाठी तुला शोधत होतो पण तूच गायब झालीस, मग कुणाशी करणार लग्न?" खटयाळपणे तो म्हणाला.
"तुझ्याशी काही बोलण्यातच अर्थ नाही." ती वैतागली.
"आणि मी कधीपासून तुला विचारायचं म्हणतोय, त्या दिवशी तु पटकन बाजूला का झालीस?"
"कधी?"
"तुझ्या घरी, तु टी व्ही बघत असताना, मी तुझ्या खांद्याला धरले तेव्हा?"
तिचे कान तापले. "तुला माहीत आहे मी का बाजूला झाले ते." कशीबशी ती म्हणाली.
"माझ्या तरी मनात काही नव्हते बाबा." तिला चिडवत तो म्हणाला.
तिला तो प्रसंग आठवला. टी व्ही पाहण्यात ती एवढी गर्क होती की सुहासने पाठीमागून येऊन तिच्या खांद्यावर कधी हात ठेवला हेही तिला कळलं नव्हतं. नंतर "एवढं काय पाहतेस?" म्हणत त्याने तिला सहजच जवळ ओढलं होतं. आपली कशीबशी सुटका करून घेत तिने त्याला त्या सिनेमाची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हाही तो कसा मिस्कीलपणे हसत तिच्याकडे पाहत होता, हे तिला आठवलं.
"आता तू तुझ्याबद्दल सगळं सांगितल्या शिवाय मी काहीही बोलणार नाही." इरेला पेटून ती म्हणाली.

त्या दिवशी ती घरी आली तेव्हा तिला खूप विचित्र वाटत होतं. तो प्रसंग घडून बरेच दिवस झाले होते, पण एक मित्र म्हणून आपल्याबद्दल वाटणाऱ्या आपुलकीनेच तो तसं वागला असेल असं समजून, आत्तापर्यंत तिने त्यावर जास्त विचार केला नव्हता. पण आज त्याच्याशी बोलण्यानंतर मात्र तिला वेगळंच काहीतरी वाटू लागलं आणि तिच्या पोटात खड्डा पडला. ऑफिस मधेही दिवसभर ती त्या संभाषणाचाच विचार करत होती. तो नक्कीच फ्लर्ट करत होता आणि तिला त्याचा रागही येत नव्हता. कॉलेजमधल्या सुहासमध्ये आणि या सुहास मध्ये किती फरक झालाय असं तिला वाटलं. एकेकाळचा अबोल, स्वतःतच रमणारा तो आता चांगलाच बोलघेवडा झाला होता, आत्मविश्वासाने झळकत होता. याचं लग्न तरी झालंय का? झालं नसेल तर का केलं नसेल? आणि त्यात एवढं लपवण्यासारखं काय आहे? तिच्या मनात विचार चालले होते. आपल्याबद्दलच्या भावना त्याने कॉलेजमधेही कधी उघड दर्शवल्या नव्हत्या. आणि इथे आल्यापासून त्याच्या मनात काय आहे हे लपवण्याचा औपचारिकपणाही तो पाळत नव्हता. एवढा धीट हा कधी झाला?

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा फोन आला. तिने फोन उचलला पण ती काही बोलली नाही.
"आहेस का?" त्याने विचारले. तिने फोन नुसताच कानाला लावून ठेवला होता.
"बोलणार नाहीस का?" तिकडून विचारलं.
ती गप्प. तोही थोडावेळ काही बोलला नाही.
"हे बघ मी आता फक्त दहा पर्यंत काऊनट करणार आहे. तोपर्यंत तु बोलली नाहीस तर फोन ठेऊन देईन" घोगऱ्या आवाजात तो म्हणाला.
पुढचे दहा सेकंद तो नंबर मोजत होता आणि इकडे तिचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. काहीतरी अगम्य, अनोखं तिच्याबाबतीत घडत होतं.

भाग 3

त्या रात्री तिला खूप वेळ झोप लागली नाही. नवऱ्याला मिठी मारून, विचार करत ती तशीच पडून राहिली. तो अंक मोजत होता तेव्हाची अगतिक शांतता, फोनवरून येणारा त्याच्या श्वासांचा आवाज, पुढे काय होणार आहे, आपण बोलणार आहोत का नाही, याचा विचार करून तिच्या मनाची झालेली घालमेल. सगळं ती पुन्हा पुन्हा आठवत राहिली.

दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला.
"काल काय झालेलं?" उत्तेजित स्वरात त्याने विचारलं.
"कुठे काय? काही नाही." स्वतःला सावरत तिने म्हटलं.
"मग गप्प होतीस." तो पुटपुटला.
"काल मला रात्रभर झोप लागली नाही."
"का? कुणाचा विचार करत होतीस?" हा फिरून परत त्याच विषयावर कसा येतो याचं तिला हसू आलं.
"दुसऱ्या कुणाचा?" ती म्हणाली. तिकडून थोडा वेळ उत्तर आलं नाही.
"माझी स्वप्नंही पाहायला लागलीस का?" अंतराळातून आल्यासारखा त्याचा आवाज आला. ती काही बोलली नाही.
"काय काय पाहतेस स्वप्नात?" त्याने विचारलं.
"ते मी तुला का सांगावं?" तीही थोडी धीट होऊन बोलली.
"तू जर मला सांगितलस तर मीही तुला सांगेन."
"काय?"
"हेच, की मी स्वप्नात काय पाहतो."
"नाही नको. काहीही बोलतोस तु!" म्हणत तिने फोन ठेऊन दिला.

नंतरचे दोन दिवस तिने त्याचा फोन उचलला नाही. त्याने बरेचदा प्रयत्न केला. फोन आला की तिच्या छातीत धडधडायला लागे. दोन तीनदा हात फोनकडे गेलाही पण उचलायचं धाडस झालं नाही.
शेवटी त्याने याहू वर "फोन का उचलत नाहीस?" म्हणून इंस्टंट मेसेज पाठवला,
काहीतरी विचार करून पुढचा फोन तिने उचलला.
"सुहास, आपलं हे असं बोलणं योग्य आहे का?" चाचरत ती म्हणाली.
"असं म्हणजे कसं?" त्याने जरा रागानेच विचारलं.
"I am married!" ती कुजबुजली.
"I know... So what?"
"असं वागून नवऱ्याशी प्रतारणा केल्यासारखं नाही का होत?" त्याच्या बोलण्याचं तिला विशेष वाटलं.
"कोणत्या जमान्यातल्या गोष्टी करतेस तु? असं काय केलंस तु म्हणून तुला तसं वाटावं. तु काहीही वावगं करत नाहीस. "
ती गप्प बसली. तिच्या मनाला पटेना.
"तुला माझ्याशी बोलायला आवडतं ना?"
"हो" आज्ञाधारकपणे ती म्हणाली.
"आपण बोलण्या व्यतिरिक्त काही करू शकतो का एवढ्या लांबून?"
"नाही.."
"मग झालं तर! मलातरी त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही." तो म्हणाला.
"तुला कसं आक्षेपार्ह वाटेल? तू आहेस बॅचलर." त्राग्याने ती म्हणाली
"आणि... तुला कसं माहित मी बॅचलर आहे ते?" तो परत तिची चेष्टा करू लागला.
"Can you just tell me the truth?" ती ओरडली.
"तुला माझी खरी स्टोरी हवीय ना? मी सांगेन, पण एका अटीवर." तो म्हणाला.
"कोणती अट?"
"तुला माझ्याशी बोलावे लागेल."
"ते तर मी बोलतेच आहे."
"असलं नाही.." त्याचा आवाज घोगरा झाला.
"मग कसलं?" कंपित आवाजात तिने विचारलं.
"तुला माहित आहे कसलं ते. मी तुला आई एम वर एक लिंक पाठवतोय, ती उघड." त्याने सांगितलं. तिच्या मशीन वर आई एम वर आलेल्या लिंक वर तिने क्लिक केले. वाचत असताना, भर दिवसा कुणीतरी सर्वांच्या समोर वस्त्रे फेडून टाकल्यासारखा तिचा चेहरा झाला.
"How dare you?" थरथरत ती म्हणाली. काय बोलावे तिला सुचेना.
"अगं अगं! एवढी रागावू नकोस. तुला नाही बोलायचं तर नको बोलूस. मी सहज चेष्टा करत होतो तुझी." अजीजीने तो म्हणाला. तिची अशी काही रिअॅक्शन येईल याची त्याला कल्पना नव्हती. आणि अमेरिकेतली एकुलती एक मैत्रीण त्याला गमवायची नव्हती.
"असली चेष्टा?" तिने रागाने फोन बंद केला. हातातला फोन अजून तिने खालीही ठेवला नव्हता की परत फोनची रिंग वाजली. क्षणात तिने फोन कट केला.

संध्याकाळी घरी येताना गाडीतही ती चरफडत होती. तिच्याशी तो असा कसा वागू शकतो याचंच तिला नवल वाटत होतं. तो जे काही तिला विचारत होतं, तसल्या गोष्टी या जगात अस्तित्वात आहेत, हे ही तिला माहित नव्हतं. फोन सेक्स! कुणाच्या डोक्यातून ही कल्पना निघाली असेल असं तिला वाटलं. आणि असल्या गोष्टी कुणाला माहित असतात? असले थेर करायचेच आहेत तर हा दुसरी कुणी का बघत नाही? आणि आपल्याला असलं काही विचारायचं यानं धाडस तरी कसं केलं? परत ती तडफडली. घरापासून जवळच असणाऱ्या रस्त्यावर तिने बाजूला गाडी लावली. तिच्या मुलीची स्कूल बस यायची वेळ झाली होती. रस्त्याकडेच्या पदपथावर अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत ती स्वत:शीच बोलली, "हाऊ डेअर ही!".
"एक्सक्यूज मी?" शेजारी तिच्यासारखीच, आपल्या मुलाची वाट पाहणाऱ्या एका चाईनीज गृहस्थाने तिच्याकडे वळून पाहिलं.
"सॉरी." ती ओशाळली.
बसमधून तिची मुलगी उतरली. केसांच्या झिपऱ्या गळ्यात आलेल्या, एवढ्या थंडीतही, फक्त पातळ जॅकेट घातलेल्या तिच्या मुलीने "मम्मी" म्हणून तिला मिठी मारली आणि एका क्षणात तिचा राग पळाला. तिच्या निष्पाप चेहऱ्याची पप्पी घेताना, तिला अतिशय शांत वाटलं. लहान असताना माणूस किती निष्पाप असतो, मोठा झाला कि नाही ते विचार त्याच्या मनात येतात.

घरी आल्यानंतर नवऱ्याला याबाबत काही सांगावे का हा तिला प्रश्न पडला. सुहास हा तिचा मित्र, वरून घरी येऊन गेलेला. काही सांगितलं तर तिचा नवरा आयुष्यभर तिला ऐकवत राहील याची तिला खात्री होती. न सांगितलेलंच बरं. बऱ्याच विचारानंतर तिने निर्णय घेतला. पण तिला राहवेना.

त्या रात्री जेवणानंतर डिशवॉशर लावत असताना सहज विचारल्यासारखे, तिने तिच्या नवऱ्याला विचारले, "तू कधी फोन सेक्स बद्दल ऐकलं आहेस कारे?"
"का? आज अचानक काय विचारतेयस?" टी व्ही तून मान काढून, तिच्या नवऱ्याने तिच्याकडे पाहिलं.
"काही नाही असंच. ऑफिस मधली लक्ष्मी आहे ना, ती बोलत होती काहीतरी." भांडी लावताना मग्न आहे असं दाखवत, तोंड लपवून ती म्हणाली.
"काय तुम्ही बायका, ऑफिस मध्ये असल्या विषयावर बोलता तुम्ही?"
"अरे, दुपारी बाहेर लंच ला गेलो तेव्हा बोलत होतो. पण सांग ना?"
"ऐकण्यासारखं त्यात विशेष काय आहे? पेपर मध्ये, क्रेग्ज्सलिस्ट मध्ये तू त्याच्या जाहिराती बघत नाहीस का?"
"नाही बाबा. मी तर कधी नाही पाहिल्या." अविश्वासाच्या आविर्भावाने तिने विचारलं.
"पर्सनल्समध्ये बघ." त्याने परत चेहरा टी व्ही कडे वळवला.
"पण मला हे कळत नाही, फोनवर काय करत असतील ते? I mean, सेक्स म्हटलं की शारीरिक संबध अशीच आत्तापर्यंत माझी कल्पना होती. हे काय नवीनच!"
"नवीन कुठे आहे? पूर्वी काही प्लटॉनिक नाती नव्हती का? हे त्याचंच दुसरं व्हर्जन. पण तुला हे कशाला हवंय आत्ता?" तो वैतागला.
"नाही, मी सहजच विचार करत होते, की अशा नात्याला मग आपण व्यभिचार म्हणू शकतो का?" तिने विचारलं.
"हं." तोही थोडा वेळ विचारात गुंतला. "अवघड प्रश्न आहे. व्यभिचाराची शब्दसंग्रहातली व्याख्या मला माहित नाही, आणि कदाचित ते पाहणाऱ्याच्या दृष्टीकोनावरही अवलंबून असू शकते. पण माझ्यामते तरी ते व्याभिचारातच मोडेल." अपेक्षेने तिच्याकडे पाहात तो म्हणाला.
"माझ्या मतेही." डिशवॉशर चालू करत ती उत्तरली.

भाग 4

दुसरा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून नेहमीसारखी तिने पोळी भाजी बनवली. सगळ्यांचे डबे भरले. मुलीला गडबडीत तयार करून बस मध्ये बसवून आली आणि ऑफिसमध्ये जायला निघणार तेवढ्यात तिच्या नवऱ्याने "संध्याकाळी ओम ला लवकर पिकअप करायला तुला जमेल का?" असं विचारलं. मग लवकर पिकअप कशासाठी करायचं ,किती वाजता करायचं, शाळेतून करायचं का डे केअर मधून, हे विचारण्यात पंधरा मिनिटं गेली. ह्याला रात्री सांगता येत नाही का? ती वैतागली. तिथून एकदाची ती रस्त्याला लागली तर गाडी मुख्य रस्त्याला लागल्या लागल्या समोर ट्रॅफिक दिसलं. पूर्वी ती ट्रफिक मध्ये अडकली की सुहासला फोन लावायची. तेव्हा वेळ कसा निघून जायचा हेही तिला कळत नसे. आता ती नुसतीच बसून होती. रेडीओवरचे सगळे चॅनल्स ऐकून, कुठल्यातरी रॉक चॅनल वर ती स्थगित झाली होती. त्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या मॅनेजरने तिच्याकडे पाहिलं. ती चरफडली.

सकाळची महत्वाची कामे आटोपल्या नंतर तिने घड्याळात पाहिलं. अकरा वाजून गेले होते तरी त्याचा फोन आला नव्हता. बरं झालं, आपण चांगली त्याची खरडपट्टी काढली ते! ती योग्यच वागली होती, याबद्दल तिला शंका नव्हती. पण तरीही फिरून फिरून तिचे डोळे मोबाईल कडे वळत होते. समजा जर त्याने फोन केलाच तर काय बोलायचे याचा ती विचार करत होती. परत फोन करू नकोस असं सांगावं की तसलं अर्वाच्य बोलणार नसशील तर बोलते असं सांगावं. पण आपण त्याच्याशी बोलणार तरी आहोत का? तिला प्रश्न पडला. कालचं त्याचं वागणं तिला अपमानास्पद वाटलं होतंच. पण ते माफ करण्याजोगं आहे का याचा ती आता विचार करू लागली. आणि तिला स्वतःचाच राग आला. का म्हणून आपण त्याच्या फोनची वाट पाहतोय? रागाने तिने फोन ऑफ करून ठेवला.

संध्याकाळी मुलीला घेऊन ती घरी आली तेव्हा नवरा तिची वाटच बघत होता. त्याला पाहून ती प्रसन्नपणे हसली.
"कुठे होतीस? आज ओमला पिक अप करायचं होतं ना तुला?" भसकन तिच्यावर ओरडत त्याने विचारलं.
"ओह माय गॉड. मी विसरलेच" एक क्षणभर तिचं हृदय थांबल्याचा भास तिला झाला.
"तू आणलंस ना त्याला?" गडबडीत तिने विचारलं.
"हो मग काय. माझ्या मोबाईल वर त्यांनी कॅाल केला मग मला मिटिंग, मधेच सोडून यावं लागलं. मी तुला बऱ्याचदा फोन केला, पण तो सारखा व्हॉईस मेल मधे जात होता." वैतागून तो म्हणाला.
"I am so sorry. मी मिटिंग मध्ये जाताना फोन बंद केलेला तो सुरु करायला विसरले बहुतेक." धांदात खोटं बोलत ती म्हणाली. मनातून तिला स्वतःची अतिशय लाज वाटत होती. कसं विसरलो आपण? ती चूटपुटली.

सुहासचा विचार करायचा नाही असं ठरवून ती तिच्या आयुष्यात रुळायचा प्रयत्न करू लागली. नोकरी, घर, मुलं यांच्यात मन रमवायचा प्रयत्न करू लागली. पण शुक्रवार आला आणि पुन्हा तिला त्याची प्रकर्षाने आठवण झाली. शुक्रवारी बहुतेकदा तो दोनदा फोन करत असे. वीक एंड ची भरपाई म्हणून. पण शुक्रवारही आला आणि गेला. त्याने फोन केला नाही. घरी फोन करणे त्याने जवळ जवळ बंदच केले होते. ती त्याच्याशी ऑफिसमध्ये बोलते हे तिने अर्थातच नवऱ्याला सांगितले होते. त्यात लपवण्यासारखे काही आहे, असं आत्तापर्यंत तरी तिला वाटले नव्हते.

तो विकएंड, घडलेल्या घटनांवर ती विचार करत होती. आणि तिला तिच्या वागण्यातच काही तथ्य नाही असं वाटू लागलं. त्याला आपल्या बद्दल नक्कीच आपुलकी वाटते. नाहीतर आपली एवढी जुनी कविता त्याने कशाला जपून ठेवली असती! आणि विडंबन करणं, हे त्याच्यासाठी काही सोपं काम नसावं, तरीही त्याने प्रयत्न केला. आपल्या वाढदिवसासाठी त्याला एवढं सगळं करायची काय गरज होती? राहता राहिली फोनवर घाणेरडं बोलण्याची गोष्ट. तो म्हणाला तशी, कदाचित तो फक्त आपली चेष्टाच करत असेल! आपण कशाला त्याच्या बद्दल एवढा राग धरायचा? उगाचच आपण नाही त्या गोष्टी मनात धरतो असं तिला वाटू लागलं. त्याच्या बरोबर फोनवर बोलणं हा तिच्या आयुष्यात आलेला नवा विरंगुळा होता. आणि पुढे कदाचित धोका असू शकतो, याची अंधुक जाणीव होऊनही तिने त्याच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला.

तिचा फोन आल्यावर तो एकदम खुश झाला. त्याने बाजी जिंकली होती. फोन वर "तसल्या" गोष्टी अजिबात करायच्या नाहीत अशी तिने त्याला तंबी दिली. त्यानेही ती बिनविरोध मानली. मग परत त्यांचे दररोज फोनवर संभाषण होऊ लागले. फोनवर लाडे लाडे बोलणं, रागावणं, रुसणं सुरु झालं. काहीच फरक झाला नव्हता. झाला असलाच तर आजकाल नवऱ्याला सगळंच सागायची गरज तिला वाटत नव्हती. सुहासवर पुढे तर तंबीचाही प्रभाव कमी व्हायला लागला. त्याचे तसे बोलणे हळूहळू पुन्हा सुरु झाले आणि नंतर वाढत गेले. पण तिलाही आता त्याचे काही वाटेनासे झाले. उलट तीही त्याला थोडीफार उत्तरं द्यायला शिकली होती.

एक दिवस ती लंच करून येताना, बाहेरच एका झाडाखाली त्याच्याशी बोलत थांबली होती. वसंत ऋतू सुरु झाला होता. आल्हाददायक हवा सुटली होती.
"किती मस्त हवा सुटली आहे इथं!" हवेत उडणारे केस, मान हलवून अजून उडवत ती म्हणाली.
"मग काय करावसं वाटतंय तुला?" तो सूचकपणे म्हणाला.
"काही नाही. आणि नुसतं वाटून उपयोग काय?"
"का?"
"इतक्या लांबून?" ती उगाचच म्हणाली.
"हं. मग आपण असं करूया. तू आधी डोळे बंद कर."
"केले."
"असं समज की आपण दोघे एका बंद रूम मध्ये आहोत. मध्ये भलं मोठं बेड आहे. कुठेतरी निळसर दिवा जळतोय..." बोलता बोलता तो तिला एका वेगळ्या दुनियेत घेऊन गेला. बंद चौकटीतलं, डीम लाईट मधलं, हळुवार संगीतातलं. तिथे ती कुणाची बायको नव्हती, आई नव्हती, मुलगी नव्हती; फक्त एक स्त्री होती. आपल्या अंतरीच्या कामनांना न झिडकारणारी, शरीरातल्या फुलणाऱ्या अनु रेणूला साद देणारी एक प्रेमिका. त्याचा शब्द न शब्द तिच्या अंगावर रोमांच फुलवत होता. आगीची एक लहर तिच्या अंगभर शिरशिरत होती. आजूबाजूच्या दुनियेची तिला खबर नव्हती. तिच्यासाठी त्याचे ते हळुवार शब्द आणि आर्जवे याने आसमंत भरून गेला होता. त्याचं बोलणं संपलं तेव्हा ती घामाने थबथबली होती. हृदयाची ठकठक अजूनही मोठ्याने ऐकू येत होती. असल्या उत्कट भावना तिने पूर्वी कधीच अनुभवल्या नव्हत्या. लग्नाला चौदा वर्षे होऊनही आपल्याला पूर्वी असं कधीच कसं वाटलं नाही? ऑफिसमध्ये शिरताना ती विचार करत होती.

"झालंय काय आज तुला?" त्या रात्री लाडात लपेटून घेत तिच्या नवऱ्याने तिला विचारले. "I never saw you like this.."
"का तुला आवडलं नाही का?"
"आवडलं? आमची स्वप्नपूर्ती झाली आज." खुशीने तो म्हणाला.


भाग 5

तिचं आणि सुहासचं असलं संभाषण हे दररोजचे रुटीन ठरले. तिचा लाजरेपणा हळूहळू कमी होत गेला आणि ती त्याच्या इतक्याच उत्कटतेने त्यातला आनंद उपभोगू लागली. सुखाचे एक नवीन दालन त्याने तिच्यासाठी उघडे करून दिले होते. आणि सुरुवातीला जरी ते मान्य करायला तिला बराच वेळ लागला तरी आता तिला त्यात विशेष काही वाटेनासे झाले. ह्याच्यामुळे उलट तिचे तिच्या नवऱ्या बरोबरचे संबंध सुधारले होते. इतक्या वर्षांच्या सहवासानंतर आलेला बेचवपणा, अळणीपणा संपला होता आणि एखाद्या नवदाम्पत्याच्या उत्साहाने त्यांच्या काम क्रीडा रंगत होत्या.

पण सुहास म्हणजे अजूनही तिच्यासाठी एक कोडं होतं. त्याचं लग्न झालंय का हा प्रश्न तिने त्याला कितीदा विचारला होता. प्रत्येक वेळी चतुराईने त्याने उत्तर द्यायचं टाळलं होतं. त्याच्या आयुष्यातल्या या गोष्टी तिला चमत्कारिक वाटत होत्या. एवढा तो सिक्रेटीव्ह का आहे तिला कळत नव्हतं. बरं, त्याच्याशी कोणत्याही गंभीर विषयावर बोलायला जावे तर तो त्या विषयाला बगल देऊन कधी चावट बोलणे सुरु करेल, हे तिच्याही लक्षात येत नसे.
"तू व्हर्जिन आहेस का?" एक दिवस तिने विचारले. तो प्रश्न विचारून त्याचं लग्न झालंय का याचा बहुतेक ती अंदाज घेत होती.
तो हसायला लागला. "का?"
"नाही तू बोलतोस तरी सगळं. म्हणून म्हटलं नुसतं बोलायलाच येतं की काही अनुभवही आहे." आगाऊपणे ती म्हणाली.
"माझ्या फक्त बोलण्यानं तुझी ही अवस्था होतेय मग विचार कर मी काही केलं तर काय होईल?" तो म्हणाला. ती काही बोलली नाही.
"तुला भेटायचे आहे का?" थोड्या वेळाने त्याने विचारले. ती दचकली. कितीतरी दिवसांपासून तिच्या मनात तो विचार येत होता. आणि तशी वेळ आली तर आपण काय करावे या मनोराज्यात तिने बराच वेळ घालवला होता. पण प्रत्यक्षात मात्र त्या प्रश्नाने तिच्या पायाखालची जमीन सरकली होती.
"कशाला?" घुटमळत ती म्हणाली.
"वडे खायला. असं काय विचारतेयस?"
"मग तू तरी असले प्रश्न का विचारतोयस, जेव्हा तुला माहित आहे माझी परिस्थिती?" त्राग्याने ती म्हणाली.

ही वेळ कधीतरी येणार हे तिला नक्की माहित होतं. पण त्याचं उत्तर तिलाही माहित नव्हतं. खरंच तिची काही करायची इच्छा होती का? होतीही आणि नव्हतीही. एकीकडे त्यातलं नाविन्य, एक्साइटमेंट, गूढता तिला आकर्षित करत होती तर दुसरीकडे कुटुंबाचे विचार मनात येत होते. एखाद्या स्वप्नासारख्या तरलपणे चाललेल्या प्रवासात आता काही खाचखळगे दिसायला लागले होते. आणि मनाने जरी सोयीनुसार, चाललेल्या कृत्यांचे समर्थन केले असले तरी तिच्या सद्सद्विवेक बुद्धीने ते कितपत समर्थनीय आहे असा तिला जाब विचारायला सुरुवात केली होती. त्यानंतर सुहासने बरेचदा तो प्रश्न तिला विचारला. पण त्यावर तिला कधीच ठोक उत्तर देता आले नाही.

हा हा म्हणता एक वर्ष संपले आणि सुहासची भारतात जायची वेळ आली.

त्याने तिकीट बोस्टन वरून बुक केले होते, आणि पुढच्या फ्लाईट मध्ये चार तासांचा अवधी होता.
"बघ, एअर पोर्ट वर हिल्टन आहे, तिथे आपण थांबू शकतो." आदल्या दिवशीही तो म्हणाला होता.
त्या दिवशी, मैत्रिणीकडे जाते असे सांगून, ती एकटीच एअरपोर्ट वर निघाली.
ती काय करणार याची तिला खात्री नव्हती. जे होईल ते होवो, असंच तिने मनाला बजावलं होतं. उतावीळ हृदयाने ती त्याची वाट पाहत होती. सिक्युरिटी मधून तो बाहेर आल्या आल्या तिने पळत जाऊन त्याला मिठी मारली. त्या मिठीत कसली वासना नव्हती, होता तो फक्त जिव्हाळा! त्यानेही तिला उचलून घेत, स्वतःभोवती एक चक्कर मारली.
"काय गं, नाही नाही म्हणता बरीच बोलायला शिकलीस तु?" तिला चिडवत तो म्हणाला.
"माझं जाऊदे, कॉलेज झाल्यानंतर तु काय काय शिकलास ते मला सांग. असलं कुठे बोलायला शिकलास?" स्टारबक्स मधल्या कॉफीचे घुटके घेत तिने विचारलं. कॉफीवरच्या फेसाने तिच्या वरच्या ओठावर बारीकशी रेघ ओढली होती. हळुवारपणे ती त्याने स्वतःच्या ओठांनी टिपली. त्याचा प्रथमच झालेला तो स्पर्श! ती नखशिखांत थरारली.
हसत ती थोडी बाजूला सरकली.
"बघ म्हटलं ना मी? मी एवढंही जवळ आलेलं तुला सहन होत नाहीये." हसत तो म्हणाला.
"असं काही समजू नकोस. असल्या गोष्टीनी लाजून जायला मी काही कॉलेज मधली अनुनभवी मुलगी नाहीये." ती चिडली. हा समजतो काय स्वतःला?
"मग हिल्टन मध्ये यायला एवढी का घाबरतेस?" त्याने आपलं कार्ड टाकलं.
"जसं तु तुझ्या आयुष्याबद्दल बोलायला घाबरतोस?" तिनेही त्याच्या मर्मावर बोट ठेवले.
त्याच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले. कॉफी चमच्याने ढवळत तो खाली पाहू लागला.
"आता तरी सांग?" हळुवारपणे ती म्हणाली.
"त्यात काही सांगण्यासारखे नाही. लग्न झाले आणि दोन दिवसात घटस्फोटही झाला." खांदे उडवत तो म्हणाला. "Things happen sometimes."
त्याच्या त्या मोघम उत्तराने तिचे समाधान होणार नव्हते. खोदून खोदून तिने त्याला इत्यंभूत माहिती विचारली.
आई वडिलांनी ठरवून दिलेल्या मुलीशी त्याचे लग्न झाले होते. मुलगी अतिशय देखणी, सालस आणि त्याच्या सारखीच आय. टी. मध्ये काम करणारी होती. तो खूप खुश होता. भविष्याची रंगीत स्वप्ने बघत होता. पण लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच, त्याच्या बायकोने, तिच्या प्रियकराबद्दल त्याला माहिती दिली. "घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लाऊन दिले, पण मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही." असं म्हणून रडून रडून तिने त्याचा खांदा ओला केला होता. आपल्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला असताना, त्याने हिमतीने तिच्या घरच्यांचे मन वळवले आणि मोठ्या मनाने तिला घटस्फोट देऊन, तिचे तिच्या प्रियकराशी लग्न लाऊन दिले होते. नंतर त्याच्या घरच्यांनी बऱ्याच मुली बघितल्या, पण घटस्फोटीत मुलाला मनासारखी मुलगी मिळणे जरा अवघडच होते. नंतर त्याचीही लग्न करायची इच्छा उडून गेली आणि मला लग्नच करायचे नाही असे घरच्यांना सांगून, लग्न या प्रकारातूनच त्याने अंग काढून घेतले.
"आणि तुही लगेचच लग्न करून मोकळी झालीस. नाहीतर तुझ्याशीच केलं असतं." तिला गंभीर झालेली बघून तो म्हणाला.
"बघ अजूनही ऑफर खुली आहे. नंतर पस्तावशील." मिस्कीलपणे तो पुढे म्हणाला. वातावरणातला गंभीरपणा घालवण्याचा त्याचा प्रयत्न चाललाय हे तिने ताडले.
"म्हणजे यु आर स्टील अ व्हर्जिन." कसं पकडलं या आवेशात तिने विचारलं.
"तु म्हणजे ना! कोणत्या जमान्यात राहतेस? No, I am not a virgin." आश्वासकपूर्वक तो म्हणाला.
"मग जायचं?"
"कुठे?"
"हिल्टन मध्ये. सिद्धच करून दाखवतो तुला." डोळे मिचकावत तो म्हणाला.
ती काही बोलली नाही. त्याचंही काही चुकीचं नव्हतं. इतक्या दिवसांच्या फोनवरल्या संभाषणाची, त्या समागमाने पूर्ती होणार होती. कल्पनेनं तिचं शरीर उसळून उठलं. का नाही? एकाच दिवसाचा तर प्रश्न आहे? एवढं काय बिघडणार आहे? तिच्या मनातलं वादळ तो वाचत होता. इतक्या दिवसांचं बोलणं, त्यामुळे अपेक्षा वाढलेल्या. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर? आत्तापर्यंत जपलेल्या या आठवणींच काय होईल? अपेक्षाभंगाने नंतर कडवट बनलेल्या त्यांच्या मैत्रीची कल्पना करून,तिचे तोंड कडू झाले.
"त्यापेक्षा आपण जर आत्ताच निरोप घेतला तर?" जड अंत:करणाने ती म्हणाली "कमीत कमी आपण एकत्र घालवलेल्या क्षणांची तरी चांगली आठवण राहील. उगाच कशाला चांगल्या गोष्टीत मिठाचा खडा टाकायचा?" ती समजुतीने म्हणाली. तो नुसता तिच्याकडे पाहत होता.
"माणसाच्या मनाला विरंगुळा हवा असतो. कशासाठी? मनाला समाधान देण्यासाठी, मन व्यस्त ठेवण्यासाठी. समजा, आपण झालेल्या गोष्टीकडे एक विरंगुळा म्हणून बघितले तर काय होईल?तुला कल्पनाही करवणार नाही एवढं माझं आयुष्य तु बदलवून टाकलं आहेस. तुझ्याशी बोलणं, भांडणं, रुसणं हा माझ्यासाठी एक विरंगुळा होता. त्याच्या फक्त आणि फक्त गोड आठवणी माझ्या मनात आहेत. मग त्यात समाधान मानायचे की आणखी काही अपेक्षा करून विरंगुळ्याचं दु:खात रुपांतर करून घ्यायचं? तूच सांग काय करायचं?"
तो उठला. तीही पटकन उठली. दोघांचेही डोळे पाणावले होते. दीर्घ आलिंगनात त्याने तिला ओढून घेतले.
त्याला जायला अजून थोडा वेळ बाकी होता. तो त्यांनी असाच एअर पोर्ट मध्ये हिंडण्यात घालवला. नुकत्याच पंख फुटलेल्या पक्षासारखा वेळही कसा भुरकन निघून गेला. त्याने तिला काही गोष्टी भेट म्हणून दिल्या आणि तिला त्याच्यासाठी आपण काहीच आणले नाही याची रुखरुख वाटून राहिली.
"बाय द वे, तसलं बोलायला कुठे शिकलास, हे अजून तु मला सांगितलंच नाहीस?" सिक्युरिटीच्या लाईन मध्ये तो उभा असताना तिने विचारलं.
तो हसला. गूढपणे.
"ते पुढच्या वेळेसाठी. पण तेव्हा माझं फक्त फोनवर भागणार नाही हं." तो म्हणाला.
लाईन मध्ये तो हळू हळू पुढे सरकत होता, आणि त्याच्याकडे पाहताना, वर्षभरातल्या सगळ्या गप्पा, गोष्टी तिच्या डोळ्या समोरून जात होत्या. तो दिसेनासा झाला तरी, त्या जागेवर ती थिजल्यासारखी उभी होती. त्याची पाठमोरी मूर्ती अजून तिच्या डोळ्यासमोर तरळत होती. 'पुढच्या वेळेसाठी" ती स्वतःशीच पुटपुटली. उत्कंठतेनं!

सोमवार, २ एप्रिल, २०१२

शरीराची किंमत


मरून जावंसं वाटतंय.
शून्यात पाहत मी म्हणाले.
आयुष्याचा कंटाळा आलाय;
शरीराचाही वैताग आलाय.
"हं", थोड्या वेळाने ते हुंकारले.
या शरीराची किंमत तुम्हाला माहित आहे?
नाही, आणि पर्वाही नाही; माझं उद्दाम उत्तर.
हे पायच घ्या:
त्याच्या जोरावर तुम्ही चालता पाळता.
कुणाला पाय विकत घ्यायचे असतील,
तर किती किंमत मोजावी लागेल?
वेडा कि खुळा हा डॉक्टर!
मला जगायची पर्वा नाही,
आणि याला माझ्या पायाची चिंता?
हृदय बिघडलं तर?
बरं होईल. सुटेन मी. माझा निश्वास.
नवीन तर मिळणारच नाही,
पण जुनंच कितीला पडेल?
कितीतरी कोटींना? माझा प्रश्न.
शक्य आहे. ते ही उपलब्ध असेल तर!
आंधळ्याना डोळे मिळाले तर जग कसं दिसेल?
जसं आपले डोळे गेल्यावर आपल्याला दिसेल! विलक्षण!
उपहास.
म्हणून तुम्ही डोळे फोडाल का?
काहीतरीच काय? दुखेल ना!
दुखायची एवढी भीती;
आत्ता तर मरायला निघाला होतात.
दुखणं सहन होत नाही म्हणून तर मरायचं.
कसलं दुखणं?
मनाचं, हृदयाचं.
शस्त्रक्रियेनं बरं न होणारं.
त्या दुखण्याची किमत शरीरापेक्षा मोठी?
कदाचित असेलही...
मन कुठं वसतं?
हृदयात...? कि मेंदूत...? माझा स्वतःलाच प्रश्न.
हृदय तर मांसाचा गोळा;
मेंदूतच असावं: माझा तर्क.
मग आपण हृदय दुखतं असं का म्हणतो?
कुणास ठाऊक.
तर तुमचा मेंदू दुखतोय: त्यांचा निष्कर्ष.
छे! छे! ते बरोबर वाटत नाही.
माझं मनच दुखतंय, मग ते कुठे का असेना.
ठीक आहे.
आता मला हे सांगा:
हे हृदय नसेल तर तुम्ही जगाल का?
नाही.
मेंदू काढून टाकला तर?
काहीतरीच काय...
आणि हे मन मुरगळून टाकलं तर?
हो...कदाचित...
मग या मनाच्या दुखण्याची किमत शरीरापेक्षा मोठी?
कसं शक्य आहे ते!

रुपाली