मंगळवार, १५ सप्टेंबर, २००९

मोरपीस

        नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली तिकीटं मी बुक केली.त्या दिवशी घरी परतताना माझा आनंद गगनात मावत नव्हता. तीन वर्षांनी मी भारतात निघाले होते. या तीन वर्षातली पहिली दीड वर्षे कशी पटकन निघून गेली होती. जास्त हुरहुर न वाटता. पण नंतरच्या दीड वर्षातला प्रत्येक दिवस न दिवस मी अगदी रेटला होता. मागच्या सहा महिन्यात तर मी घरातल्यांचा एवढा जोसरा काढला होता की अगदी दररोज घरी फोन होत होता. शेवटी 'या फोनवर जेवढे पैसे घालवतेयस त्यावर भारताच्या २-३ ट्रिप्स सहज झाल्या असत्या' असं म्हणत माझ्या नवरयानं भारताला जायचं एकदाचं मनावर घेतलं.
         भारतात जायच्या नुसत्या कल्पनेनंही माझ्यात भलताच उत्साह संचारला होता. आणि त्यात ते 'फॉल' चे दिवस होते. हा नयनरम्य,रहस्यमय फॉल मला नेहमीच वेडा करत आला आहे. अगदी पहिल्यांदा मी त्याला पाहीलं तेव्हापासुन! मग ऑफिसला जाताना हायवे घेण्याऐवजी मी लोकल रोड्स घ्यायला सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही कडेनं ती रंगीबेरंगी झाडे पहात जाण्याचा माझा रोजचा क्रम झाला. कधी दिवस स्वच्छ असला तर सगळं कसं एकदम शांत वाटे. माझी गाडी पिवळ्याधमक फुलांचं उंचच उंच कुंपण केलेल्या रस्त्यावरुन अलगद जाई. मधूनच ती चित्रातली चिमुकली घरं डोकावत. श्वास थोडावेळ आतच अडकला जाई. तर कधी वारा जोरात वहात असेल, तर मी खिडक्या उघड्या ठेवी. भणाणणारी हवा आत शिरे. एकदम माझ्या गावातल्या शेतावर गेल्याचा भास होई. कधी ती रंगीत पानं हवेवर फेर धरुन नाचत आणि मी उघड्या खिडकीतुन हात लांबवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करी. पुन्हा ती हवा मी मोठ्यानं श्वास भरुन घेई आणि मनात चुकचुके..एवढं सगळं छान आणि कसलाच वास कसा नाही? एवढ्या प्रकारची फुलं, त्यांचा सुगंध हवेत भरत कसा नाही ? त्यावेळी भारताची मला तीव्रतेनं आठवण होई. पाऊसानंतर मातीचा तो मदमस्त करणारा सुगंध! या कशाचीच त्याला सर येणार नाही असं वाटे. त्या माझ्या आवडत्या फॉल चे मी भरपुर फोटो काढून घेतले होते,बरोबर माझ्या सुबक घराचेही. भारतात जाण्याची माझी पुर्ण तयारी झाली होती.
        भरलेल्या ह्र्दयाने आम्ही विमानतळावर उतरलो. उतरल्या उतरल्या माझ्या नाकाला कसलातरी वास झोंबला. या वासाची मी अपेक्षा केली नव्हती.उगाचंच प्रत्येक श्वासागणिक किती विषाणू पोटात जात आहेत याची मला काळजी लागली. आणि स्वत:चाच राग आला.मुंबईहुन पुण्याकडे येताना, रस्ताच्या दोन्ही बाजुच्या गगनचुंबी इमारती बघुन माझी छाती दडपून गेली.पुण्यात मी माझ्या बहिणीच्या फ़्लट वर उतरले होते.त्या सोसायटीत काय नव्हतं? क्लब हाउस,स्विमिंग पुल,डे-केअर..इथं आपण ज्याला लक्झरी म्हणतो, ते तिथं आता नॉर्मल झालंय. तिच्या फ़्लटवर बाथरुम्सही वेस्टर्न स्टाईलचे होते. बिना टिशूपेपरचे ते कमोड वापरायचं कसं हा प्रश्न मला पडला. फ़्लटचं भाडं ऐकुन तर मला चक्कर यायचीच राहिली होती. तिथे प्रत्येकच गोष्टीतली महागाई पाहून मला अचंबा वाटला. गुढग्यापर्यंतचा स्टायलीश स्कर्ट आणि ट्रेंडी(हा शब्द तुम्हाला तिथं सगळ्या दुकानात ऐकायला मिळेल) टॉप घातलेल्या माझ्या बहिणीने साध्या रिक्षासाठी पाचशे रुपयची नोट काढुन दिली तेव्हा मी आश्चर्याने पहातच राहिले. शॉपिंगला गेलो तर सगळे वेस्टर्न कपडेच विकायला!
        ' अगं मला जरा ट्रडीशनल कपड्यांच्या दुकानात घेउन चल बाई ! ' मला तिला सांगावं लागलं. दुकानात गेल्यानंतर मी मराठीत विचारलेल्या प्रश्नांना इंग्लीशमधे उत्तरं मिळाली. आणि मी नक्की कुठे आहे हेच मला कळेना.
        प्रदुषण, बेशिस्त वाहनचालकं, अमर्याद गोंगाट आणि अस्वछता यांच्या आवरणाखाली तिथं एक नवीन अमेरीकन संस्कृतीच उदयाला येते आहे असं मला वाटलं. यासाठी मी इथे आले नव्हते. माझ्या मनाला खुपच हूरहूर वाटून राहिली. येताना दोन दिवसांसाठी म्हणून गावी गेले.गावं तसंच होतं. घरासमोरचं तुळशीवृंदावन, भोवतालची जाईची, गुलाबाची फुलं. मन कसं प्रसन्न झालं. सकाळी रेडिओवर अभंग ऐकताना मी अंगणात सडा घातला, आणि मातीचा 'तो' वास दरवळला. श्वास भरभरून मी तो वास घेतला पण मनाचं समाधान काही होईना. मी ज्या भारताच्या ओढीनं आले होते तो शेवटी मला सापडला होता.
        निघताना माझ्या वडिलांनी, आमच्या शेतावर सापडलेली मोरपीसं मला दिली.
        भारत भेट आटोपून, डलसच्या विमानतळावर आम्ही उतरलो. बर्फ नुकताच पडून गेलेला दिसत होता. स्वच्छ रस्त्याकडेची बर्फानं वेढलेली ती झाडं आणि घरं पाहून मन आनंदानं उचंबळलं होतं. वाटलं आपल्या घरी आलो.
        आणि माझी मीच दचकले. हे कधीपासुन 'आपलं' वाटायला लागलं मला! भारतात राहून अमेरीकनांसारखं राहण्यापेक्षा, अमेरीकेत राहून भारतीयांसारखं राहणं मला पटलं असावं. पण मग माझं काय? हे घर की ते घर ?
        वडिलांनी दिलेलं मोरपिस गालाशी धरत मी विचार करत राहिले.

२ टिप्पण्या: