आयुष्यात बरे, वाईट, कडु-गोड, आंबट-तुरट असे नाना प्रकारचे अनुभव प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. त्याबरोबरच काही कडु-गोड, आंबट-तुरट लोकही भेटतात. काही लोकं आपल्या लक्षात राहतात तर काही प्रसंग! अशीच एक व्यक्ती माझ्या स्मरणात राहिलेली.
त्यावर्षी कराडच्या गव्हर्नमेंट कॉलेज मधून फ़ायनलची परीक्षा देऊन सुट्टीत मी घरी आलो होतो. उन्हाळा आपला दर वर्षीच्या उन्हाळ्यासारखाच जात होता. माझ्या चुलत मामांचा सुधीर आमच्याकडे राहायला आला होता. त्यामुळं मलाही एक बिनपगारी नोकर मिळाला होता आणि तोही इंजिनियर दादाच्या कृपाछत्राखाली बर्याच नवीन आणि अजब गोष्टी शिकत होता. सकाळी खिडकीतून उन्हं माझ्या गादीवर येईपर्यंत मी उठत नव्हते. आईही आपली पोराला तिथं बराच अभ्यास असतोय हो म्हणून मला वाटेल तितका वेळ झोपून देत होती, त्यानंतर भरपूर जेवण आणि नंतर चौकात किशाच्या पानपट्टीवर वेळ घालवायचा. दिवस कसे मजेत चालले होते. मध्ये अधे परीक्षेच्या रिझल्टची आठवण व्हायची आणि छाती धडधडायला लागायची. पण याव्यतिरिक्त ग़ावातली कोणती मुलगी कोणत्या कॉलेजला जाते, कुणाचं कुणाबरोबर लफ़डं आहे याचं चर्वण करण्यात वेळ कसा जात होता तेही समजत नव्हतं. आणि माझ्यासाठी अजुन एक गोड कारण होते. गावातल्या कुलकर्णी मास्तरांची गोरीपान मुग्धा, मागच्या आठवड्यात रस्त्यावर दोनदा थांबून माझ्याशी बोलली होती, त्या एका वेगळ्याच धुंदीत मी होतो.
त्यादिवशीही तिची वाट पहात मी टपरीवर पडून होतो. गप्पांत वेळ कसा गेला कळलाच नाही. आणि जेव्हा मी घड्याळात पाहिलं तेव्हा ४ वाजत आले होते. आयला! आज मला सुधर्याला सोडायला माळेवाडीला जायचं होतं, आणि लगेच परतायचे होते. उद्या माझ्या मित्राच्या बहिणीचं वर्हाड गावातनं सकाळी सात वाजता निघणार होतं, त्यामुळं तिथं मुक्कामही करता येणार नव्हता.
भानावर आल्यावर, टाचणीने पृष्ठभागावर टोचल्यासारखा, मी घरी पळत सुटलो.
"चल चल सुधर्या, झालं का तुझं?"
पटापट पिशवीत त्याचे कपडे कोंबून मी त्याला ढकलतच घराबाहेर काढला.
"बाबा, गाडीची चावी कुठाय?" उंबर्यातनं मी बाबांना हाक दिली.
'अरे मोटरसायकल नेऊ नकोस, मध्येच बंद पडते ती आजकाल' आतून बाबांचा आवाज आला. छ्छ्या गाडी असताना एस. टी. ने प्रवास करायचा म्हणजे! काहीतरीच काय!
'एस. टी. नं घेऊन जा त्याला' बाहेर येत आई म्हणाली. तेवढ्यात समोरच्या टेबलावर मला चावी दिसली, ती घेऊन आईनं अजून अडविण्याआधीच मी गाडीला कीक मारली.
माळेवाडी आमच्या गावापासून दीड तासावर होतं. गेल्यावर मामींनी चुळ भरायला पाणी दिलं, चहा ठेवला. चहा पिऊन निघावं असा माझा बेत होता. तेवढ्यात मामा आले. आमचे मामा म्हणजे अजब वल्ली आहेत. मिलिटरीतून रिटायर झाल्यावर, गावी शेती करायला येऊन राहिले. घरात आल्या आल्या मला बघून त्यांचा चेहरा खुलला. त्यांना माझं खूप कौतुक! दहावी-बारावीला एवढे मार्क्स पाडुन इंजिनियरींगला अडमिशन मिळवल्याबद्दल! त्यामुळं आमच्या नावाचा सुधर्यासमोर सारखा शंख असे. माझ्या शेजारी बसलेल्या सुधर्याच्या पाठीवर मोठ्यानं थाप टाकून त्यांनी विचारलं,
"काय शिकलास का मग अरूणकडून?" मी फ़क्ककन हसलो. तो माझ्याकडुन काय काय शिकला, हे जर त्यानं सांगितलं, तर कदाचित मला इथं यायची कायमची बंदी होईल. सुधीरन हसून वेळ घालवली. पोरगं हुशार आहे!
"बघु पुढच्यावर्षी दहावीत काय दिवे लावतोय." त्याला टोला पडलाच.
थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी मामांना म्हणालो.
"मामा, मला आता निघायला पाहिजे. उद्या सकाळी लवकर निघायचंय"
"छे! छे! आता कुठ जातोयस? इथंच रहा आज. कोंबडी-बिबंडी कापूया... काय म्हणतोस मग?" मिस्किलपणे हसत उभं राहत ते म्हणाले.
"नाही मामा मला खरचं जायला पाहिजे" मी उठलो.
"उद्या सकाळी सात वाजता मला एका लग्नाला निघायचंय. माझ्या मित्राच्या बहिणीचं वर्हाड गावातनं निघणार आहे." यावर मामांनी दहा मिनिटे भाषण दिले. पाहुण्यारावळ्यांकडे कसे आले गेले पाहिजे, त्यामुळे आपुलकी कशी वाढते वगैरे वगैरे. तरी माझा जायचा ठाम निर्धार बघुन वैतागुन ते म्हणाले,
"ठिक आहे जायच असेल तर जा. पण थोडा उशीरा गेलास तर काही बिघडणार नाही. जेवल्याशिवाय काही जाऊ नकोस." असे म्हणून ते बाहेर निघून गेले.
सुधर्याला मी खूण केली 'कुठं?' म्हणून, तर त्याने एका हातावर सुर्यासारखा दुसरा हात घासून सांकेतिक भाषेत उत्तर दिलं. त्याच अर्थ कळायला मला जास्त वेळ काही लागला नाही. पाचच मिनिटात मामा तंगडीला धरून कोंबडी घेऊन घरात आले. कोंबडीसारखी मान टाकून, मी ही मग विरोध करायचा बंद केला. मामांनी कोंबडी साफ करून आत मामींकडे दिली आणि मानेनं खूण करून मला आत बोलवलं. मी ही देवाला चढवायला निघालेल्या बोकडासारखा त्यांच्या पाठी गेलो. आत कपाटातनं व्हिस्कीची बाटली काढून डोळे मिचकावून त्यांनी मला विचारलं,
"पितोस का?"
चार लोकांसमोर माझी पॅंट खाली ओढल्यासारखा मी बावरलो.
"छे! छे! " मी मुंडी हलवली, माझी परीक्षा घेतायत की काय?
"खोटं बोलू नकोस." बाटलीचं टोपण उघडत मिस्किलपणे हसत ते म्हणाले.
" खरंच नाही मामा. मी खरंच व्हिस्की कधी नाही पिली." मी काकुळतीला आलो.आणि ते खरंही होतं. व्हिस्की कुणाच्या बापाला परवडणार आहे? कॉलेजमध्ये २-३ दा बीयर घेतली असेल तेवढीच.
"मग काय पिलीस?" आयला ! माझं मन वाचता येतं की काय त्यांना?
"बीयर?"
"हो पण एकदाच." मी ठोकून दिलं.
तेवढ्यात सुधीर आत डोकावला, त्याला पहाताच "हितं काय काम आहे तुझं" म्हणत ते त्याच्यावर खेकसले. त्याच्या पाठी मी ही सटकलो.
जेवण तयार व्हायला आठ वाजलेच. तोपर्यंत मामा चांगलेच तालात आले होते.
"मग कसा आलास येताना?" त्यांनी विचारलं.
"बारामती मार्गे" मी म्हणालो.
"आता अंधारात मला जाव लागेल" थोड्यावेळानं मी तक्रार केली.
"मग कशाला जातोस. रहा इथं"
पून्हा चर्चा पूर्वपदावर गेल्यानं मी काही बोललो नाही.
"अंधारात गाडी चालवणं खूप खतरनाक असतं हं! लोकांना खूप वाईट अनुभव आलेत या भागात." त्यांनी सुरूवात केली.
"कसले अनुभव?" अनवधानाने मी विचारलं.
"थांब तुला मी एक किस्सा सांगतो." स्वत:च्या मांडीवर जोरानं थाप मारत ते म्हणाले.
"मी आणि तो आपला बाळू गवंडी, अरे आपल्या आज्याचा बाप? " माझ्या मांडीला स्पर्श करत ते म्हणाले.
"मला नाही माहीत" मी खांदे उडवले. आता ह्यांचा अज्या मला कसा माहित असेल?
"अरे त्यानंच तर हे घर बांधलंय. गावात पहिली स्लॅबची इमारत आहे आपली!" छाती ठोकून ते म्हणाले.
"तुला माहीत असेल की?" सुधीरकडे वळून ते म्हणाले. "अरे तो नाही का, स्टॅंडवर दारू पिऊन पडलेला असतो दररोज?"
"हो माहिताय मला तो. कसलं पेदाड आहे ते! त्याला दोनदा अज्यान गटारातनं काढला." चिरंजिवांनी री ओढली.
"हा-हा" बोटानं दोनदा नाही ची खुण करत पुढे झुकत ते म्हणाले.
"त्याच्या पिण्यावर जाऊ नकोस आता, माणूस लय चांगला होता" गवयाच्या गाण्यावर दाद देताना हवेत हात फिरवावा, तसा हात फिरवून ते आता माझ्याकडे वळले.
"नाही.. मी खोटं नाही सांगत, अगदी खरं आहे. कुणालाही विचार हवं तर" आता मला काय करायचय त्या बाळू गवंड्याशी? तो पूर्वजन्मी प्रत्यक्ष देवाचा अवतार असला तरी मला काय देणं घेणं!
"अगदी देवासारखा होता" मामांनी सुरू केलं. आयला परत मनातलं ओळखलं!
"पण त्याच्या बापानं मरताना सगळा जमिनजुमला धाकट्याच्या नावानं केला, तेव्हापासून असंच फिरत असतंय"
"पक्क वाया गेलयं" मामांच्या तोंडात आता गावची भाषा यायला लागली.
त्यांची गाडी पूर्ववत रुळावर आणावी म्हणून मी विचारलं. "मग तुमच्या किस्स्याचं पुढं काय झालं?"
"आरे हो ! तुला किस्सा सांगत होतो ना?"
"तर मी आणि बाळू गवंडी. बर का? असंच एकदा बारामतीला पिक्चर बघायला गेलो, सायकलवरनं गेलो होतो आपलं! " मी हुंकार भरला "पिक्चर संपला बारा-साडे बाराच्या दरम्यान बर का? आणि आम्ही आपले निघालोय माळेवाडीला परत"
"तो रस्त्यात पुल लागतो बघ?" त्यांनी पून्हा मला विचारलं.
मी पुन्हा हुंकारलो, मुंडी हलवली.
"किती पाणी होतं रे त्या ओढ्यात आत्ता येताना?" गाडी परत रुळावरुन घसरली होती.
"होतं थोडफार. जास्त काही नव्हतं" अगम्य भाषेत मी उत्तर दिलं.
"बरोब्बर!" पण त्यांना उत्तर कळलेलं दिसत होते.
"तर त्यादिवशीही तेवढच पाणी असेल नसेल, आम्ही जाताना पाणी पुलाखाली होतं बरं का?"
"बरं" मी म्हणालो.
"आणि येताना आम्ही पुल ओलांडतोय." इथं ते थांबले. प्रसंगाचे वर्णन कमी पडलं त्यांच्या लक्षात आलं. माझ्या मांडीवर बोटं टेकवून ते म्हणाले.
"किर्र अंधार होता, रस्त्यावर कुणी सुद्धा नव्हतं, आम्ही आपलं निवांत चाललोय. आता दोघजण होतो म्हणून कसली भीती. बरोबर?
"बरोबर" मी म्हणालो.
"तर रात्रीच्या साडेबारा वाजता पुलावर आलो आम्ही. पुल ओलांडतोय तर अचानक हे ऽ ऽ धबधब्यासारखं पाणी आलं वरुन! बाळू लागला ओरडायला.."
"तो सायकल चालवत होता, मी पाठीमागे बसलोवतो, बरं का?" मध्येच माझ्याकडे पहात त्यांनी खुलासा केला.
"हं हं" मी समजल्यासारखी मुंडी हलवली, पुढे सांगा काय झाले? माझी उत्सुकता वाढली होती.
"तर हा हा म्हणता ओढा पाण्यानं भरुन गेला, पाणी पुलावरुन वाहायला लागलं! इकडं बाळ्या बोंबलतच होता. आणि आता ऐक काय झालं हां.."
त्यांनी मला बजावलं. तबलजी समेवर येताच तबल्यावर जशी थाप ठोकतो, त्या स्टाईलमधे ते म्हणाले.
"जसा आम्ही पुल ओलांडला, तसं पाणी झपदिशी खाली गेलं!"इथे ते माझी प्रतिक्रिया आजमावण्यासाठी क्षणभर थांबले.
"आणि हे अगदी खराय बरं का! प्रत्यक्ष्य डोळ्यांनी पाहिलेलं!"
"बापरे!" मी उद्गारलो."आता या पुलावरुन जाताना मला भीती वाटेल!" मी आपलं असंच म्हणालो.
"अरे हे काहीच नाही. मला अजुन भीतीदायक अनुभव आलेत." मला गारद केल्याच्या आनंदात ते म्हणाले.
"तुला अजुन एक किस्सा सांगतो" माझ्या खांद्याला दाबत ते म्हणाले.
"घे अजुन घे ना" त्यांनी पातेल्याकडे हात केला. मामींनी चपळाईनं पुढं होऊन पळीभर रस्सा माझ्या वाटीत ओतला.
"तर त्याचं असं झालेलं..." मामांनी सुरुवात केली.
"मी आणि आपल्या जनुमामाचा सदा आम्ही दोघं बारामतीवरुन येत होतो"
"तुला जनुमामाचा सदा महिती असेलच ना?"
"नाही" त्यांच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला मी ओळखतो असा बहुतेक मामांचा समज झालेला दिसत होता.
"अरे आपली गजाताई आहे ना. तिचा नवरा, आणि जनुमामा साडू साडूच ना!"
आता कोण गजाताई? ते दोघे साडू साडूचं का, पण सख्खे भाऊ जरी असते; नव्हे जुळे भाऊ जरी असते तरी मला काही घेणं देणं नव्हतं.
"ओ ' तो ' सदा होय!" मी मोठ्यानं 'आ' वासत म्हणालो.
"हां आत्ता तुझ्या लक्षात आलं" मामांनी खुशीनं माझ्या पाठीवर बोटे उठवली.
"तर मी आणि सदा, आणि या गोष्टी अगदी डोळ्यादेखत घडलेल्या बरं का! अगदी खर्या!" त्यांनी ते थापा मारत नाहीत याचा परत एकदा खुलासा केला. मी कोंबडीवर ताव मारत मुंडी हलवली.
"आम्ही दोघं आपापल्या सायकलीवर बसून आपलं चाललोवतो गप्पा मारत. आणि थोडं पुढं गेल्यावर, म्हणजे आपली मनुष्यवस्ती संपल्यावर बरं का! रस्त्यावर एक महिला उभी असलेली दिसली. आता दिवसाची वेळ असती तर आम्ही कशाला बघतोय? बरोबर?"
"बरोबर" मी दुजोरा दिला.
"पण रात्रीची वेळ. आणि मनुष्यवस्तीपासून इतक्या लांब ही बाई काय करतेय आम्हाला कळेना!"
“आता-“ माझ्या मांडीला परत एकदा बोटांनी टोचत ते म्हणाले.
"मी बराच गोष्टी ऐकल्या होत्या. त्या भागात पिशाच्च बघितलेली कितीतरी माणसं माझ्या माहितीतली होती. म्हणून मी आपलं सदाला म्हणालं -सदा तिच्याकडं बघू सुद्धा नकोस बरं का. सरळ पुढं जा.- आपलं त्याला सावध करायला."
"आणि ती बाईपण अश्शी गोरीपान.. एकदम देखणी! तिचे केस हे ऽ ऽ जमिनिवर लोळत होते."
त्यांनी ताटापुढल्या जमिनिवर हात केला. आम्ही सगळ्यांनी त्या दिशेनं बघितलं, चुकून तिचे केस दिसताहेत का म्हणून!
"ती वेडी पारी गावात फिरत असते, तिच्याएवढे?" मोठाल्या डोळ्यांनी सुधीरनं विचारलं.
"छ्या!" हवेत जोरानं हात फिरवत मामा म्हणाले.
"पारीचे केस काहीच नाहीत. हिचे लय लांब होते."
मामांची गोष्ट तिच्या केसांच्या गुंतवळ्यातनं काही बाहेर निघायला तयार नव्हती.
"आणि हिरवी साडी नेसलेली, कपाळावर भलं मोठं कुंकु!"
आता हे तिच्याकडे बघत किती वेळ उभं राहिलेले निरीक्षण करत?
"आता एकली बाई बघुन सदा थांबला. मग मी ही आपला थांबलो"
अर्थातच! मी मनात म्हटलं, बाई, मग ती भूत जरी असली तरी तिला हे सोडणार नाहीत.
"आम्ही थांबल्यावर ती म्हणाली - माझी शेवटची एसटी चुकलीय, म्हणून मी चालत निघालीय. मला माळेगावला सोडाल का म्हणून. बरोबर? आता मी काही बोललो नाही. मनात भीती होती ना? पण सदा हो म्हणाला"
"मग ती सदाच्या सायकलवर मागं बसली. मी आपला त्या दोघांच्या मागं मागं येत होतो. कासराभर अंतर गेलो असू नसु आम्ही आणि माझं सहज लक्ष गेलं, तर मला काय दिसावं?" मामांनी विचारलं.
"काय?" मी आणि सुधीर एकदमच म्हणालो.
"तिचे पाय हेऽ ऽ लांब झालेवते आणि जमिनीवर फरफटत होते." ते सांगताना त्यांनी डोळे हेऽ ऽ मोठे केले. आमचेही डोळे विस्फारले गेले.
"मला असा दरदरून घाम सुटला. मी आपला सायकल जोरान मारायला लागलो. आणि ओरडून सदाला म्हणालो - सदाऽ ऽ तुझ्यापाठी काय बसलयं बघ? सदाही घाबरला पण त्याला सायकल थांबवायलाच येईना. मी आपला तिथंन पोबारा केला."
धन्य आमचे मामा! मी मनात म्हटलं. स्वर्गातनं शिवाजी तळमळले असतील एका मराठ्याची ही दशा बघून!
"बरं मग काय झालं पुढे या सदाचं?" तो मेला तर नसेल ना या चिंतेन मी विचारलं.
"तो काय असाच सायकल फिरवत बसलेला रात्रभर. ओढ्यातनं, दगडातनं, डोंगरावरनं फिरतोय, फिरतोय, फिरतोय.." आता माझ्यासमोर सगळं फिरायला लागलं.
"आणि दिवस उजाडल्यावर माळावर बेशूद्ध होऊन पडला. तेव्हापासून जरा वेड्यासारखंच करत असतंय" त्यांनी त्याच्या सद्यस्थितीची कल्पना दिली.
आत्तापर्यंत आमची जेवणं उरकून पान खाऊन झालं होतं. आता यांची अजुन एखादी गोष्ट चालू व्हायच्या आधी निघावं, म्हणून मी उठलो.
"आत्ता कुठं जातोय एवढ्या उशीरा? राहा इथं." पून्हा आग्रह झाला.
"नाही मामा, मला जायलाच पाहिजे. उद्या पहाटे निघायचंय"
"थांब मी तुला अजुन एक गोष्ट सांगतो" मामांची गाडी आज काही थांबायला तयार नव्हती.
"नको मामा खूप उशीर होईल." मी काकुळतीला येऊन म्हणालो.
"थांब रे. ही छोटीच आहे." त्यांनी माझ्या खांद्याला धरुन खाली बसवलं.
"त्याचं असं झालं बघ..." मामांनी सुरुवात केली.
"बारामतीला जाताना रस्त्यावर बघ ते बोलाईमातेचं देऊळ आहे, त्या देवळात मी आणि आमची म्हातारी पोर्णिमेला चालत गेलो होतो. म्हातारी म्हणजे तुझी आजी बरं का?"
"हो महिताय" मी घाई केली.
जगातल्या बहुतेक सगळ्या भुतांनी माळेवाडी ते बारामती एवढ्याच रस्त्यावर मुक्काम ठेकलेला दिसत होता. आणि त्यातली निम्मी तरी भुतं आमच्या मामांना भेटलेली दिसत होती. आता एवढ्या रात्री मी एकटा, त्याच रस्त्यावर जाणार आहे म्हणून तरी मामांनी या गोष्टी बंद कराव्यात? पण मग ते आमचे मामा कसले!
"तर येताना रात्र झाली होती, एका मैलाच्या धोंड्यावर आम्हाला एक स्त्री बसलेली दिसली. आम्ही लांबुन बघितली तिला, वाटलं असतील तिच्याबरोबरचे आसपास! आम्ही तिच्याजवळ गेल्यावर तिनं आमच्या म्हातारीला मिश्री मागितली बरं का? म्हातारीनं माझ्या पाठीला काही बोलू नको म्हणून चिमटा काढला. असा जोराचा चिमटा काढला! त्यावेळी मी लहान होतो. माझा काही भूत-पिशाच्यावर विश्वास नव्हता. त्यामुळं आमची आई असं काय करतेय मला कळेना.
आम्ही मग तसंच पुढं चालत गेलो. तिच्याकडं लक्ष न देता, शंभर एक फुटावर गेलो असू. बरं का? तेवढ्यात ती बाई अचानक आमच्यासमोर आली, आणि किंकाळ्या फोडून अद्रुश्य झाली."
"प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर बरं का? अगदी डोळ्यादेखत घडलेल्या गोष्टी आहेत या!" छातीवर हात ठेवून मामांनी शपथ घेतली. बहुतेक तसं हजारदा म्हणून ते आपल्याच मनाला त्याची ग्वाही देत असावेत!
"मामा, एवढ्या भुताच्या गोष्टी सांगून तुम्ही मला चांगलीच भिती घातलीय." उठत मी म्हणालो.
"म्हणून तर म्हणतोय, ठोक मुक्काम इथचं"
"पुढच्या वेळी नक्कीच" म्हणत मी बुटाचे बंध बांधायला सुरूवात केली. जाताना दोघांच्या पाया पडलो आणि गाडी सुरू केली.
"ठिक जा बरं का अरुण" म्हणत मामींनी मला टाटा केला.
गाडी सुरू करुन फुट दोन फुट मी जातोय, तेवढ्यात मागून मामा ओरडले.
"त्या टेकडीवरल्या शंकराच्या देवळापासून जरा जपून जा बरं का! रात्री भुतं नाचतात तिथं!"
"मी आवंढा गिळला."
छे! कसली भुतं आणि कसचं काय! मामा आपले असेच काहीतरी रचून सांगत होते. रस्त्यावर आल्यावर मी मनाला बजावले. आता मी माळेवाडी ओलांडले होते.पावणेदहाचा सुमार असावा. कराडमधे पावणेदहा म्हणजे काहीच नव्हते. रात्री बारा वाजता पिक्चर बघून आम्ही चालत होस्टेल वर यायचो, पण कधी भिती नाही वाटली.पण इथली गोष्ट वेगळीच होती. नऊ वाजता शेवटची गाडी माळेवाडीला येत असे. नंतर रस्त्यावर स्मशानशांतता पसरत असे.
किर्र अंधारात खडबडत्या डांबरी रस्त्यावर माझी गाडी चालली होती. रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. दूरवर कुठेतरी कुत्रं केकाटत होते. रात्रीच्या गुढ वातावरणात आणखीन कसले चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते. माझी सगळी इंद्रिये कशी तीक्ष्ण झाली होती. कसलाही आवाज, कसलंही दृश्य आता माझ्या तावडीतनं निसटणं शक्य नव्हतं. रस्त्याच्या दोन्ही बाजुला काळी धुसर झाडं भुतासारखी उभी होती. मी मनात देवाचा धावा करत धीटपणे गाडी मारत होतो. स्पीडोमीटर नव्वदच्या वर चाललेला दिसत होता. पण मला कधी एकदा बारामतीत पोहचतोय असं झालं होतं.
आणि अचानक माझ्या पाठीवर कुणीतरी स्पर्श केला. पाठीतनं सणकन भीतीची एक लहर चमकून गेली. पाठीमागं बघायचंही धाडस मला होईना. आठवतील तेवढ्या सगळ्या देवांची नावं घेत मी गाडी तशीच सुसाट पळवली. थोड्या वेळानं गाडी माळरानाला लागल्यावर, मी हळूच अंग हलवून, मागं कुणी बसलं नाहीना याची खात्री करून घेतली. पाठीला झालेला तो खडबडीत स्पर्श अजून मला जाणवत होता.
मी रस्त्यावर पुढ-मागे पाहिलं, दुरपर्यंत जिवंतपणाचं कसलचं चिन्ह दिसत नव्हतं. पुढ भकास माळरान पसरलं होतं. वर धुसर आकाशात एकही चांदणी दिसत नव्हती. आज अमावस्या तर नाही? मनात पून्हा भीती डोकावली. आयला! या मामांनाही काही उद्योग नाही. आजच भुतांच्या गोष्टी सांगायच्या सुचलं त्यांना! मी मामांना मनातचं शिव्या देत होतो. आता बारामती जवळच आलेली, बस्स ती टेकडी ओलांडली की झालं! माझ्या मनात जरा बळ आल. पण ही शंकराची टेकडी तर नाही? या विचारानं पून्हा माझ अंग शिरशिरलं. देवाचा एखादा श्लोक आठवायचा प्रयत्न केला, तर काहीच आठवेना. बाबा शिकवताना लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, असं आता वाटायला लागलं. पण रामनामाचा जप मी चालूच ठेवला. पण त्यादिवशी आमचे ग्रह काही बरोबर दिसतं नव्हते, की मी रामाचा जप करतोय म्हणून शंकराला राग आला कुणास ठाऊक! टेकडीच्या जवळ आल्यावर आमची गाडी फट्-फट् असा आवाज करायला लागली. आयला! ही मला धोका देतीय की काय! भीतीनं त्या थंडीत मला घाम सुटला. बेंबीच्या देठापासून 'राम राम राम' म्हणून मी ओरडायला सुरूवात केली. 'बस्स् आजचा प्रसंग जाऊ दे, मग मी तुझ्यासाठी काहीही करेन. दररोज प्रार्थना करेन...' मी देवाच्या नावानं टाहो फोडला.
पण मामांच्या कोंबडीनं जसे गचके खात प्राण सोडले तशी आमची ही गाडी गचके खात थांबली. आणि बरोबर टेकडीच्या पायथ्याला! आयला बाबाचं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती! मी गाडीवरून खाली उतरून टायर चेक केले. दोन्ही टायर टमटमीत भरलेले होते. आजुबाजुला नजर टाकली. सामसुम. आख्ख्या पृथ्वीवर मी एकटाच जिवंत प्राणी असावा असं वाटण्याइतपत शांतता. वारा मात्र जोरात वहात होता. त्याचा सु-सु आवाज रात्रीच्या शांततेत अजूनच मोठ्यानं ऐकू येत होता. मी टेकडीवर पाहिलं. काळोखात टेकडीचा आकार, आणि त्याला वर आलेलं टेंगुळ तेवढं दिसलं. अंधारच एवढा होता की मला शंकरानं तिसरा डोळा दिला असता तरी काही दिसलं नसतं. पण टेंगुळच मंदिर असावं याची मला खात्री होती. आज तिथं भुतांनी नाच करु नये म्हणजे मिळवली.
काय करावं कळत नव्हतं. कार्बोरेटर तर ओव्हरफ्लो झाला नाही? कार्बोरेटर उघडायला स्क्रुड्रायव्हर, पाना शोधायला लागलो. अंधारात काहीच दिसत नव्हतं आणि बाबांनी ती कुठं ठेवली माहीतही नव्हतं. तशीच गाडी चाचपायला लागलो. शेवटी पान्याची पिशवी डिकीत सापडली. मनातनं आता शंकराचा धावा सुरू केला. उगाच त्याला नाराज नको करायला! नाहीतर तो तांडवनृत्य करायला लागायचा! तशा अंधारात कार्बोरेटर खोलायचा म्हणजे जिकीरीचं काम होतं. मी बसून हातानं गाडी चाचपत होतो, तेवढ्यात माझं लक्ष रस्त्यावर गेलं. दुरवरून एक पांढर टिंब माझ्या दिशेनं येत होत. थोडं जवळ आल्यावर लक्षात आलं तीही मोटरसायकल होती. मी हुश्श्य केलं, आता तिच्याच उजेडात गाडी दुरूस्त करावी म्हणूनं मी उभा राहिलो. त्या दिवशी नशीबाने मी ही पांढराच टी शर्ट घातला होता. आता ती मोटारसायकल मला अगदी स्पष्ट दिसायला लागली. आणि अचानक ती थांबली. आयला! याचीही गाडी बंद पडली की काय? मी हात हलवला. अंधारात याला मी दिसतोय तरी का? एक मिनीटभर ती तिथचं थांबली. आता माझा पेशन्स संपायला लागला. हात हलवत त्याच्यादिशेनं मी पळत सुटलो. त्या माणसाला काय वाटलं कुणास ठाऊक, गाडी वळवून एखादं भुत मागं लागल्यासारखा त्यानं पोबारा केला. आयला! मला भुत समजला की काय? मी अगदी रडायच्या बेताला आलो...
हताशपणे मी माझ्या गाडीकडं यायला लागलो. हळूच टेकडीवर नजर टाकली आणि मला काय दिसावं? टेकडीवर आता एक मशाल जळत होती! मला दरदरून घाम सुटला. बहुतेक बारा वाजलेले दिसत होते. पळत माझ्या गाडीकडे येत, थरथरल्या हातानं मी कार्बोरेटर शोधायला लागलो. त्यानंतर मला तो कसा सापडला, त्यातले एक्स्ट्रा पेट्रोल मी कसं टाकून दिलं, हे मला काही कळल नाही. एक नजर वरच्या मशालीवर ठेऊन, घामानं थबथबलेल्या अवस्थेत मी जे काय करायचंय ते केलं. आणि गाडीला कीक मारली. आणि 'फट्-फट्' असा आवाज करत गाडी एकदाची चालु झाली. मनातनं शंकराचे लाख आभार मानून मी ती पळवली. एकदाही मागं वळून पाहिलं नाही.
त्या रात्री, बारामतीतल्या एका मित्राकडेच मी मुक्काम ठोकला. गेलं ते लग्न चुलीत....
या गोष्टीला आता वीस-बावीस वर्षे होऊन गेली. त्यानंतर त्या रस्त्यानं मी किती वेळा आलो गेलो. जिथं माझ्या पाठीला स्पर्श झाला, तिथं कितीतरी झाडाच्या पारंब्या रस्त्यावर आल्या होत्या. आणि ती घटना घडल्यानंतर, दोन-तीन आठवड्यांनी सावकाराच्या घरातले चोरीचे दागिने त्या मंदिरात सापडले होते. आता या सगळ्याची जरी लिंक जुळत असली, तरी मी ती जुळवायचा कधीच प्रयत्न केला नाही. कारण तो अनुभव इतका जिवंत होता, की माझ्या सद्सद्विवेकबुद्धीनं सगळ्या तर्कांना गाडून टाकलं. माझ्यासाठी, माझी ती खास "भुताची गोष्टच" होती.
--------------------- समाप्त ---------------------------------
Hi mom,
उत्तर द्याहटवाI would LOVE to say YOUR STORY IS WONDERFUL!
I wanted to write a story about or going to it is about...SIYONA!
LOVE,
Urvi
Hi Rupali,
उत्तर द्याहटवाInteresting story... Your writing style is good, its fun to read your stuff...
Keep it up and we expect more stories on this blog..
Priya & Sangram
Thanks Urvi, I can't wait to read your stuff. Love you.
उत्तर द्याहटवाThanks Sangram and Priya, you both are always encouraging me.
Mast... US madhe rahun Marathi changali japaliy...good
उत्तर द्याहटवाUR STORY IS VERY INTERESTING & HOREBLE
उत्तर द्याहटवाI HOBE THAT UR GOOD JOB
nice story....
उत्तर द्याहटवाkhupch interesting aahe...
This story is vary interesting & i like this story very much.
उत्तर द्याहटवाNice story interesting.good job
उत्तर द्याहटवाgood job.interesting
उत्तर द्याहटवाi liuke
उत्तर द्याहटवा