मंगळवार, १५ सप्टेंबर, २००९

अर्धविराम

        जिन्यावरुन पळत वर येत, तिनं दरवाजा उघडला. आई, समोर  फ़रशीवर भाजी निवडत बसल्या होत्या. चप्पल कशीतरी कोपर्‍यात  सरकावून ती बाथरुमकडे पळाली. तोंड दाबून धरलेली  ओकारीची उबळ भडकन बाहेर पडली. पोट धरुन तिनं उलटी  थांबवण्याचा प्रयत्न केला; पण ओयक ओयक करत ती उलटी करतच  राहिली. एकदा सगळ पोट रिकामं झाल्यावर तिला बरं  वाटलं. सिंकमध्ये तोडं धुवुन, तिनं आरशात पाहिलं. तिचे दोन्ही  डोळे पाण्यानं डबडबले होते. काही क्षण ती तशीच उभी  राहिली. स्वत:कडे पहात: दरवाजाला टेकून. आत येताना दरवाजा  बंद करायचाही ती विसरली होती. आई, मामांनी ऐकलं असेल  का? तोंडावर भरपूर पाणी मारुन नंतर टॉवेलनं पुसत  ती बाहेर आली.
        “पित्त झालंय का गं?” सासुबाईनी विचारलं.
        “हं बहुतेक” म्हणत ती स्वयंपाक घरात गेली. गॅसवर  चहा ठेवला. हे तिंच नेहमीचच रुटीन होतं.
चहा पिल्यानंतर सासू-सासरे बाहेर पडत. बिल्डिंगच्या  समोर गजाननाचं मदिंर होतं; तिथं सासूबाई त्यांच्या समवयस्क बायकांमध्ये जाऊन बसत. सासरे नेमानं पोवई  नाक्यापर्यंत चालत जात. त्यांच्या रिटार्यड मित्रांचा ग्रुप  बरेचदा 'साई हार्डवेअर' च्या कट्ट्यावर बसलेला असे. तिथं  त्यांचा तास-दीड तास सहज निघून जाई. आत्ताही ते टी. व्ही. वरच्या  बातम्या बघत चहाचीच वाट बघत होते.
       चहामध्ये साखर टाकताना तिचा हात कापत होता. ग़ेल्या  २-४ दिवसांपासूनच तिला त्याची चाहूल लागली होती. त्याचं ओझं मनावर घेऊन ती तेव्हापासून वावरत होती. पण आता  तिची खात्री झाली होती. आणि त्या ओझ्यानं दडपून  जाण्याऐवजी तिला एकदम मोकळं मोकळं वाटत होतं. जसं काही  पहिल्यांदा जेव्हा ती पोहायला शिकली, तेव्हा विहिरीतील  काळभिन्न पाणी बघून, तिच्या पोटात गोळा आला होता; पण पाण्यात  पडल्यावर, तिला माहित होतं की  आता हातपाय मारल्याशिवाय गत्यंतर नाही. संकटाची चाहुल लागल्यावर, ते येईपर्यंतच मनाची चलबिचल होते. एकदा का ते आलं की त्याचा सामना करण्यावाचून गत्यंतर नसतं: तिलाही ते कळुन चुकलं होतं.
        आणि कदाचित याचीच ती वाट पहात होती इतकी वर्षे! 
        चहा पिऊन झाल्यावर ते दोघंही बाहेर गेले. दरवाजा  बंद करुन ती बेडरुममध्ये गेली. काहीच सुचत नव्हतं  तिला. विमनस्क अवस्थेत ती तशीच बेडवर बसून राहिली.  समोरच्या आरशात तिचं प्रतिबिबं दिसत होतं. खरंच आपला  रंग उजळलाय का आजकाल? बॅंकेतल्या तिच्या मैत्रिणीनं  दिलेला शेरा तिला आठवला. तसाही आपला रंग सावळा  कधीच नव्हता. लग्नानंतर थोड्या अशक्त झाल्यामुळं दिसत असु  कदाचित. कसल्याशा कडवट आठवणीनं तिनं आवंढा  गिळला; चेहरयावर कठोर भाव पसरले. आपण असा काय गुन्हा केला होता म्हणून आपल्या नशिबी  हे भोग आले? चांगला संसार  करायचा, मुलाबाळांना वाढवायचं एवढ्याच तर आपल्या  अपेक्षा होत्या!
 --------------------------------------------
        पहिल्या रात्री 'तुम्ही बेडवर झोपा. मी खाली झोपतो' हे  सांगणारा तिचा नवरा तिला आठवला आणि हातात दुधाचा  पेला घेतलेली  हतबुद्ध अवस्थेत दोन पावलं मागं सरकलेली;  आपलं काही  चुकलं का या विचारानं बावरलेली ती नवी नवरी तिला  आठवली. एक,दोन  नाही दहा वर्षे झाली या गोष्टीला.
पहिली तीन एक वर्षे तिनं कुणालाच काही थांगपत्ता  लागून दिला नव्हता:  एक ना एक दिवस तरी तो तिच्याकडं येईल  या अपेक्षेनं. पण त्याच्यात काही बदल व्हायची चिन्हं दिसत नव्हती. व्रत केल्यासारखा तो खोलीत यायचा आणि मुसकटून भिंतीकडे तोंड करून झोपायचा. याला कसल्या इच्छा कशा होत नाहीत? तिला वाटे. तिच्या लग्न झालेल्या मैत्रिणींकडून ऐकलेल्या गोष्टी  तिला काही वेगळंच सांगत होत्या; आणि इथे काही वेगळाच प्रकार दिसत होता. हा पूर्ण पुरुष तरी आहे ना? या विचारानंही ती दचकत होती. पण तरीही, स्वभावानंच सहणशील असल्यामुळं की काय, किंवा सामाजिक रुढींच्या बंधनामुळे ही असेल; पण कसेतरी ती त्यातूनही आनंदात दिवस काढायचे प्रयत्न करत होती.
        आणि त्यातच त्यानं पुण्याला बदली करुन घेतली. प्रमोशन मिळालय, नाकारायचं कसं म्हणत; आई, तात्यांनीही  त्याला जाऊ दिलं. आठवड्या-दोन आठवड्यातून तो घरी येऊ लागला. आला की सगळ्यांशी चांगला वागे. तिच्याशीही. तसा तो तिच्याशी वाईट कधीच वागला नव्हता. कसेही वागण्यासाठी समोरच्याचं अस्तित्व तरी स्विकारायला हवं  ना! त्याच्यासाठी जशीकाही ती  अल्झायमरच्या पेशंटच्या भासातली काल्पनिक व्यक्ती होती! त्यानंतर मात्र तिचा धीर सुटला आणि एक दिवस माहेरी गेलेली असताना; तिनं आईला हे सगळ सांगितलं. हे ऐकल्यानंतर तिच्या आई-वडिलांच्या मनस्थितिची कल्पनाच न केलेली बरी! कितीतरी वेळा त्या नवराबायकोंनी : “आता फ़ॅमिली प्लॅनिंग राहू द्या; आम्हाला नातवंडाशी कधी खेळायला मिळेल ते सांगा?' असा तिच्याजवळ हट्ट केला होता. आणि प्रत्येकवेळी एवढे भयंकर सत्य लपवून तिनं हसून तो प्रश्न टोलावला होता. तिच्या घरच्यांकडून तरी या विषयावर काही तोडगा निघेल म्हणून; दोघांनी विचारविनिमय करून तिच्या सासूसासर्‍याच्या कानावर ही गोष्ट घातली  होती.
 --------------------------------------------
        त्या रविवारी तो घरी आला तेव्हा घरात तणावाचं वातावरण होतं. ती स्वयंपाक घरातली आवराआवर करताना बाहेर कान लावून बसली होती.  तिघंही शांतपणे टी.  व्ही.  पहात बसले होते. तात्यांना कशी सुरुवात करावी हे कळत नव्हतं. तर आईंना भीती वाटत होती की काही बोललं तर पोरगं डोक्यात राख तर घालून घेणार नाही! त्याची तशी ख्यातीही होती. तो लहान असताना; शाळा चुकवून, त्याच्या मित्राच्या भावाच्या लग्नाला गेला; म्हणून तात्यांनी त्याला वेतानं फ़ोडला होता. त्यानंतर चार दिवस तो घरातून बेपत्ता होता. तात्यांनी सगळीकडे धावाधाव केली होती; पोलीसात तक्रार सुद्धा नोंदविली होती. नंतर नाथाच्या डोंगराखाली रस्त्यावर खडीकाम करणार्‍या लोकांना तो दिसला होता. ४ दिवस डोंगरावरच्या टिचभर  मंदिरात रहात होता आणि मंदिरातल्या प्रसादावर पोट भरत होता! त्याच्या संतापी  व्रुत्तिची तेव्हापासून त्यांनी  धास्ती घेतली होती.
           बातम्या संपून जाहिराती सुरू झाल्या आणि एकदम हसत तात्यांनी सुरूवात केली.
“मग काय सर्व्हीस वगैरे ठीक चाललीय ना?”
“हं ठीक चाललीय.” टी. व्ही. वरून नजर न हलवता तो म्हणाला.
“नव्हे हे काय चाललय?” आईंनी थरथरत्या आवाजात विचारलं.
“काय, काय चाललय?” आईकडे पहात बेफ़िकीरीने तो म्हणाला.
“लग्नाला तीन वर्षे झाली. काय मुलं बाळं होऊन द्यायचा विचार आहे की नाही?” प्रश्न एकून त्याचा चेहरा काळाठिक्कर पडला, आत्ता त्याच्या सगळं लक्षात आलं. काही न बोलता घुम्यासारखा तो तसाच बसून राहिला.
“चांगल्या मुलीचं मातेर करु नकोस” धीर धरून आई पुढे म्हणाली; तसा तो उठला आणि कोपर्‍यातल्या बुटात पाय घालून, खाली वाकून लेस बांधू लागला.
"याच्यासाठी लग्न केलं का आम्ही तुझं?" - तात्यांचा आवाज त्याच्या कानावर पडला.
"कुणाला लग्न करायची हौस होती!" - फ़टकार्‍यानं तो म्हणाला.
"मग लग्न कशाला केलेस?"
"हे आत्ता विचारताय? लग्न लावून देण्याआधी नाही विचारलंत?"
रागाने दार आदळून तो चालता झाला.
 --------------------------------------------
          त्यानंतर दोन वर्षे घरी काही फिरकला नाही, पुण्यात बहिणीकडे येणं जाणं होत. तिच्याकडूनच यांना कळलं की मुलगी पसंत नव्हती त्याला. का? मग लग़्न का केल वगैरे कारणं विचारायची काही सोय नव्हती.
         सुरुवातीला तिला रात्र रात्र झोप यायची नाही. त्याचं तिकडे अफेयर तर चालू नसेल? काही वाईट नाद तर लागले नसतील! पण वर्षे गेली आणि तिला कळून चुकलं की तसं काही होणार नाही. तोही जर एकटा राहू शकतो तर आपणही राहू असं मनाला बजावत तिनं तेही आयुष्य स्विकारलं; तिनंच नव्हे तर सगळ्यांनीच स्विकारलं. तो घरी येऊ जाऊ लागला. बेडरूम मध्ये तिच्याबरोबर आई झोपू लागल्या. तो आला की हॉलमध्ये तात्यांबरोबर झोपत असे. बाहेरच्या लोकांसाठी तो आठवड्या-पंधरावड्याला येतो हे माहित असणं पुरेसं होतं. तो येऊन गेल्यानंतर, शेजारच्या बायकांनी  केलेल्या मस्करीला ती ह्रदयातील सल लपवून हसून उत्तरं द्यायला शिकली होती.
          महिन्या-दोन नहिन्यातून तिचे वडील येऊन जात. तिच्या नवर्‍याची आणि त्यांची भेट, लग्नानंतर एक-दोनदा झाली असेल तेवढीच. त्यांनाही त्याला भेटायची इच्छा होत नसे. तो घरी नाही पाहूनच ते येत. ते येत, तिच्या सासू-सासर्‍यांशी गप्पा मारत. तिचं कसं चाललंय याचं निरीक्षण करत आणि व्यथित मनानं परत जात. कधी ना कधीतरी तिची गाडी  रूळाला लागेल याच आशेवर ते होते.
         त्यानंतर कधीतरी तिला बॅंकेत जॉब लागला. ग्रॅज़्युएट तर ती होतीच आणि घरात बसून डोक्यात नाही ते विचार येण्यापेक्षा बाहेर जाऊन जरा चार लोकांत मिसळेल म्हणून तात्यांनीच, त्यांच्या मित्राच्या ओळखीनं तिला तो जॉब मिळवून दिला होता.
        आणि तिथेच तो तिला भेटला.
        बॅंकेच्या पिकनिकला दोनदा तिनं नाही म्हंटल्यावर तिच्याजवळ येऊन त्यानं विचारलं होतं,
“पाटीलबाई तुम्ही येताय ना पिकनिकला?”
“नाही हो काम आहे जरा” डेस्क आवरता आवरता ती म्हणाली होती.
“हे काही नाही. कसले काम आहे? बॅंकेतले सगळे कर्मचारी येत आहेत. तुम्हीच एकट्या नाही म्हणताय. मागच्या वर्षीही तुम्ही नाही आलात. आमची कंपनीही एवढी काही वाईट नाही! “  तो थोड्याशा मिश्किल आवाजात म्हणाला होता.
“तसं नाही हो...” तिला काय बोलावं तेच कळलं नव्हतं.
         ती मुळातच अबोल होती, आणि कुणी अशी थोडीशी जवळीक दाखवायचा प्रयत्न केला तर ती भांबावूनच जात असे. पण सुनीलची गोष्टच वेगळी होती. इतका मसकर्‍या होता तो! आणि ऑफिसमध्ये सर्वांना मदत करण्यास तत्पर, त्यामुळं त्याला नाही  म्हणायचं तिला काही जमलं नव्हतं. आणि त्या वर्षीच्या पिकनिकला ती गेली होती.
          त्यानंतर तिच्या बॅंकेत मैत्रिणीही झाल्या. पण तिनं त्यांना काही अंतरावरच ठेवलं. कुणाच्याही जास्त जवळ जायची तिला भीतीच वाटत असे. न जाणो आपल्या अंतरीचं  शल्य त्यांना कळ्लं तर! पण वर्षे निघून गेली आणि ती सुनिलशी मनमोकळेपणानं बोलू लागली. सुनील कधी कधी त्याच्या मुलांना बॅंकेत घेऊन येत असे. त्याचा मुलगा सहा वर्षाचा आणि मुलगी तीन वर्षांची होती. ती दोघे बॅंकेत आली की  तिचा वेळ कसा आनंदात निघून जाई. त्यांच्याबरोबर तिही लहान मुलं होऊन जाई. सुनीलला तिच्या स्वभावातल्या बदलाचं खूप आश्चर्य वाटे. त्याच्या मुलांकडचा तिचा ओढा बघून त्यानं तिला खुपदा घरीही  बोलावलं. 'मिस्टरांनाही बरोबर घेऊन ये' असंही बजावलं. पण  प्रत्येक वेळी काहीतरी कारण देऊन तिनं ते आमंत्रण नाकारलं होतं.
            नंतर सुनीललाही, इथं काहीतरी पाणी मुरतंय याचा मागमूस  लागला होता. आणि नंतर त्यानं कधी तो हट्ट केला नव्हता.
 --------------------------------------------
          दिवस सरत होते, ऋतु बदलत होते. त्या दोघांच्या नात्यामधे कसलेसे निराळे बंध निर्माण होत होते. इतकी वर्षे सुप्तावस्थेत असलेल्या तिच्या भावना उसळून वर येत होत्या. कधी न अनुभवलेल्या आनंदाने वारंवार तिचं ह्रदय भरुन येत होतं. बॅंकेतून घरी आल्यावरही, त्याच्याच मनोराज्यात ती गुंगुन जात होती. सकाळी घराबाहेर पडताना तीनदा आरशात वळून स्वत:ला पहात होती.
सुनीलच्या लक्षात तिच्यातले हे बदल येत होते. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीसारखे तिचे अविर्भाव पाहून; त्याचंही मन ताळ्यावर राहत नव्हतं. सहेतुक स्पर्श होत होते. नजरा टाळल्या जात होत्या. हे आपल्याला काय होतंय हे तिला कळत नव्हतं. आपण याच्या प्रेमात तर नाही पडत आहोत? हा प्रश्न तिला वांरवार सतावत होता. तिच्या मनात द्वंद्व सुरू होतं. पण मनावर कितीही ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या मनाचं  पाखरू पुन्हा पुन्हा त्याच्याच मिठीत जाऊन विसावत होतं. पुरूषाची मिठी, ते आसुसलेलं चुंबन यांबाबत तिनं फक्त  कादंबर्‍यातच वाचलं होत. पण आता हे सगळं तिला हवं होतं. कधी कधी तो तिला स्कुटरवरून तिच्या घराजवळच्या बसस्टॉप पर्यंत सोडत असे, तेव्हा त्याच्या पाठीचा होणारा स्पर्श, तो वास तिला बेभान करत असे.
              ती ओढ, ते आकर्षण एवढं अफाट होतं की त्याच्यासाठी तिनं सात समुद्रही ओलांडले असते. म्हणून जेव्हा त्यानं तिला हॉटेलमध्ये बोलावलं, तेव्हा एखाद्या तुफानासारखी धावत ती गेली होती, त्यात आश्चर्य कसलं!
 --------------------------------------------
              बेडवर बसल्या बसल्या हे सारं तिला आठवत होतं. अजून आई,तात्या परतले नव्हते. गॅस बंद करून ती बाल्कनीत गेली. आकाश ढगांनी अंधारून आलं होतं. जोराचा वारा सुटला होता. रस्त्यावरचा पालापाचोळा हवेत वर गिरक्या घेत होता. विजा कडाडत होत्या. वार्‍यावर तिचे केस,पदर उडत होते. तिला हलकं वाटत होतं. इतक्या वर्षाचं ह्रदयावरचं दडपण वार्‍यांवर जसं काही उडून जात होतं. तिनं दोन्ही हात हवेत पसरले. आपणही त्या पालापाचोळ्यासारखं उडून जावं असं तिला वाटलं. तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाचे मोठ-मोठाले थेंब तिच्या डोळ्यांतील ओघळणारे अश्रू धूवून टाकू लागले.
             “अगं पावसात अशी भिजतेस काय?”  मागून आईच्या ओरडण्यानं ती भानावर आली. कसल्याशा धुंदीत आत येत, हॉलच्या दरवाजात उभी राहून तीन गोप्यस्फोट केला: "आई मी प्रेग्नंट आहे." टॉवेलनं केस पुसणार्‍या आईंचा हात झटका बसल्यासारखा थांबला. त्यांच्या 'आ' वासलेल्या तोंडाकडे जास्त वेळ न पहाता ती बाथरूममधे शिरली.
"कुणाचं आहे?" बाथरुमच्या बंद दरवाजाला लागून थोड्या वेळानंतर आईंनी विचारले.
त्यांच्या प्रश्नाचंही तिला नवल वाटलं.
"तुमच्या मुलाचं नाही." निर्विकारपणे तिने उत्तर दिले.
             दुसर्‍या दिबशी सकाळी आठच्या ठोक्याला, दारात तिचे आई-बाबा हजर होते. आई समोर दिसताक्षणी तिच्या मनाचा बांध सुटला; बेडरुममध्ये दोघी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडत बसल्या. "काय चुकलं आई माझे? मला कसल्या सुखाचा अधिकार नाही का?" - रडण्याचा भर ओसरल्यावर तिने आईला विचारले.
              जुन्या पिढीतली तिची आई; या प्रश्नावर तिच्याकडे उत्तर नव्हते. किंबहूना असले काही होऊ शकते, याची तिने स्वप्नातही कल्पना केली नसेल! तिच्या पापभिरु मनासाठी हा जबरदस्त धक्का होता. हुंदके देऊन रडणार्‍या आपल्या मुलीचे ती  धड सांत्वनही करु शकत नव्हती. काय सांत्वन करायचे अशा मुलीचे! लग्न झाल्यावर, कसाही असेना, पती हाच परमेश्वर, असे मानणारी बाई ती! मोठ्या विचित्र अवस्थेत सापडली होती.
             "आयुष्यात सगळ्या गोष्टी प्रत्येकाला मिळतातच असं नाही सुमा." - त्यातूनही ती शब्द जोडत होती."जे आहे त्यातच समाधान मानलं पाहिजे. आता तुझ्या या करणीनं, उद्या काही वाईट झाले तर? उमाच्या लग्नाचं चाललंय...गावात हे कळलं तर किती छी थू होईल. आणि तुझ्या भविष्याचं काय?... भावनेच्या भरात खूप मोठी चूक केलीस तु सुमा..."
           हातात तोंड लपवून रडणार्‍या आईकडे ती सुन्नपणे पहात राहिली.
           स्वयपांकघरात सासूबाईंची एकट्यांचीच खुडबुड चाललेली पाहून ती आत गेली. ती येताच फणकार्‍याने झटकन किचनमधून त्या बाहेर पडल्या. हॉलमध्ये तात्या आणि तिचे बाबाही सुतकी चेहेरे करून बसले होते. आल्यापासून बाबा तिच्याशी बोलले नव्हते. किंबहूना तिच्याकडे पहाण्याचेही ते टाळत होते. नाष्ट्यानंतर ते दोघेही बाहेर पडले. रस्त्याला लागल्यानंतरही बराच वेळ ते दोघे शांतपणे चालत होते.
"काय करायच आता?"अचानक तिच्या वडीलांनी विचारलं.
"काय करायचे कळत नाही. वाटलं कधीतरी पोराचं डोकं ताळ्यावर येईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. पण भलतंच काही होऊन बसलं."
चालत चालत ते मंदिरापर्यंत आले. एका पायरीकडे,  बसण्यासाठी हात करत, खालच्या आवाजात तात्या म्हणाले 'डॉक्टरांकडे जाऊन मोकळी करावी तिला, असं वाटतय'.  हतबुद्ध झालेले तिचे वडील तसेच जाग्यावर खिळून राहिले. त्यांचा घसा भरून आला. कसलं नशीब ही पोरगी घेऊन आली! चांगला नवरा मिळाला असता तर आत्तापर्यंत दोन-तीन नातवंडे मांडीवर खेळती. पण त्यांनाही दुसरा मार्ग दिसत नव्हता. एवढा धिप्पाड माणूस पण दहा वर्षांनी थकल्यासारखा पायरीवर टेकला.
“घ्या; काहीही निर्णय तुम्ही घरातले लोकं मिळून घ्या. पण तिला जर काही कमी जास्त झालं, जर तिनं स्वत:ला काही करून घेतलं, तर मी तुम्हाला जबाबदार धरीन. आणि तुमच्या त्या मुलाला काही सुखानं जगुन देणार नाही एवढंच लक्षात ठेवा.”  डबडबलेल्या डोळ्यांनी  त्यांनी  तात्यांना तंबी दिली.
                   जेवणाच्या वेळेपर्यंत तिचा नवराही आला होता. कसेबसे चार घास खाऊन हॉलमध्ये त्यांची बैठक बसली. सासुबाईही त्यांच्याबरोबर बसल्या. तात्या बोलायला सुरुवात करणार, तोच तिचा नवर्‍याने, "मला काही बोलायचंय तात्या" म्हणून बोलायला सुरुवात केली. त्याला आता घटस्फोट हवा होता. त्याचे बोलणे संपताच तिचे वडिल संतापाने थरथरत उभे राहिले."लग्न करून आणलीत आणि कधी नांदवली नाहीत. गेली दहा वर्षे पोरगीनं अस्से दिवस काढलेत आणि आता तुमची हिम्मतच कशी होते घटस्फोट मागायची.?" ते म्हणाले. ती भिंतीला टेकून आत बसली होती. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या.
"घटस्फोट या घराण्याला शोभत नाही. मी जिंवत असेपर्यंत ता घरात घटस्फोट कदापि होऊ देणार नाही. माझ्या पश्च्यात तुम्ही काहीही करा."  तात्यांचा कडाडणारा आवाज तिने ऐकला. कुठून एवढं बळ संचारलं तिच्या अंगात पण; झंझावातासारखी ती हॉलमध्ये आली.
"आणि तुमच्या पश्च्यात काय, तात्या?" तिने तात्यांना प्रश्न विचारला. तिच्या या धाडसाने सगळेच अचिंबित झाले.
"तुम्हा लोकांना घटस्फोट नकोय, कारण तुमच्या घराण्याला बट्टा लागेल. माझ्यापेक्शा तुम्हाला तुमच्या समाजाची जास्त काळजी!”
“ माझ्याकडून चुक झाली मला कबूल आहे. पण त्याला जबाबदार फक़्त मीच आहे का? गेली कित्येक वर्षे विवाहीत असून मी कुमारिकेसारखी राहतेय. तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था असेल याचा तुम्ही विचार केलात का? यांची लग्नाची इच्छा नव्हती तर तुम्ही यांच लग्न का लावून दिलेत? यांना मी पसंत नव्हते तर हे लग्नाला का उभे राहिले? आणि या सगळ्यामध्ये बळी माझाच गेला ना?"
"आम्हाला हे कबूल आहे प.."
"थांबा तात्या मला बोलू द्यात." सासर्‍यांना अडवत ती म्हणाली.
"गेले दहा वर्षे माझ्या मनाची, माझ्या जीवाची जी तगमग झाली. ती दूर करायला कुणी मदत केली? उलट तुम्ही सगळे गांधीजींच्या माकडासारखे डोळे,कान बंद करुन बसलात: कधीतरी सगळे सरळ होईल म्हणून. पण कधी? हे तुम्ही तुमच्या चिरंजीवांना खडसावून कधी विचारलंत, तात्या?"
"मी ही माणूस आहे, मलाही भावना आहेत; हा विचार तुम्हा लोकांना कधी स्पर्श करुन गेला नाही? आणि आता कधी नव्हे तो मला आशेचा एक किरण दिसतोय; तो ही विझवायला निघाला आहात. मला आई व्हावंस वाटत नाही का? आणि दुसरं मुलं होईल याची शाश्वती काय? नंतर कशाच्या आधारावर मी माझं आयुष्य काढणार आहे?”  तिनं उत्तराच्या अपेक्षनं सगळ्यांकडं पाहिलं. पण कुणाकडेच उत्तर नव्हतं.
“मला हे मुल हवंय. आणि या घरात राहून जर ते शक्य होणार नसेल; तर मी घराबाहेर पडायला तयार आहे.” शेवटी निर्धाराने ती म्हणाली.

   तिच्या बोलण्यातला निश्चय ऐकून सगळेजण आवाक् होऊन तिच्याकडे पहात राहिले!
 --------------------------------------------

२ टिप्पण्या:

  1. अप्रतिम! सुंदर कथा आहे. तुम्ही अगदी डोळ्यातून पाणी आणलंत. आपल्याकडच्या कितीतरी कुटुंबांतील नवरा बायकोमधे अशा अनामिक भिंती असतात. वर्षानुवर्षे बायका हे ओझं बाळगून जगतात आणि मरतातसुद्धा! स्त्रीजन्माचं उदात्तीकरण नाही करत मी पण अजूनही 'ठपका' हा स्त्रीवरच ठेवला जातो.

    उत्तर द्याहटवा
  2. अंतर्मुख करायला लावणारी कथा. स्त्रीच्या मनातील भावना आणि होणारी घुसमट फार प्रभावीपणे व्यक्त केले आहे. आणि शेवटी ती स्वतच्या विचारावर ठाम उभी राहते हे खुपच छान.

    उत्तर द्याहटवा