श्री
१५ जून १९९९, हा दिवस रामचंद्र काकडे अका रामभाऊ, त्याच्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. कुठल्यातरी दूरवरच्या देशातल्या माणसांच्या आयुष्यात अद्भुत घटना घडलेल्या त्याने वाचल्या होत्या. पण कधीतरी त्याच्याही आयुष्यात अस काही घडेल, हे त्याच्या स्वप्नातही आलं नव्हतं. तो त्या लाल दगडाकडे बघत होता. तो दगड आता त्याचे आयुष्य पालटवणार होता.
कितीतरी पिढ्यापासून तो त्याच्या घरात होता. रामभाऊचा खापरपणजा, गणपत काकडे खूप गरिबीत दिवस काढत होता. राहायला पडायला आलेलं वडलोपार्जित जुनं घर होत, आणि ती दोघेही नवराबायको पाटलाच्या शेतात कामाला जायची. पाटलाची दोनशे एक एकर शेती कृष्णेच्या काठावर पसरली होती, आणि गावातली सुमारे नव्वद टक्के लोकं, त्याच्या शेतावर मजुरी करायला जायची. पण त्या सगळ्यांचं नशीब एवढ चांगलं कुठल! रामभाऊचा खापरपणजा, त्याच्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन, उन्हाळ्यात कृष्णेवर पोहायला जायचा. एक दिवस कृष्णेत आंघोळ करत असताना, त्या मुलाला एक लाल गारगोटीसारखा मुठीएवढा दगड दिसला. उन्हात चकाकला तो! त्यानं तो खेळायला म्हणून घरी आणला; आणि खेळून कुठेतरी फेकून दिला. त्यानंतर त्याच्या आईने 'विचित्र दगड दिसतोय' म्हणून देव्हाऱ्यात ठेऊन दिला. कधीतरी एकदा त्याच्यावर हळदीकुंकू पडलं आणि त्याचा देव झाला. देवघरात नित्यनेमाने त्याची पूजा होऊ लागली.
पण त्यानंतर त्यांची परिस्थिती आकस्मितपणे सुधारली. गणपत काकडेची आत्या मेली. तिला मुलबाळ नव्हतं. मरताना तिने तिच्या नावावरची दोन एकर जमीन गणपत काकडेला भेट म्हणून दिली. हे त्या अनोख्या दगडामुळे घडलं असच सगळ्यांना वाटलं; आणि दगडावरची त्यांची श्रद्धा आणखीनच वाढली. मजुरी करायचं थांबवून गणपत काकडेनं स्वतःची जमीन कसायला सुरुवात केली. रामभाऊच्या वडिलांपर्यंत, त्या दोन एकराची वीस एकर जमीन झाली होती. रामभाऊ बी ए करून पासपोर्ट कार्यालयात कर्मचारी म्हणून लागला होता. गावी वडिलांबरोबर त्याचा धाकटा भाऊ शेती बघत होता. मागच्या वर्षी वडील वारल्यानंतर त्यांनी जमिनीची वाटणी केली, पण रामभाऊचा भाऊच सगळी शेती कसत होता. वर्षाला घराकडून नेहमीसारखं धनधान्य आलं तरी रामभाऊला पुरेसं होतं. परतताना त्याने देवघरातले काही देव आणले आणि तो लाल दगड! त्याच्या भावाने काही आक्षेप घेतला नाही. वीस एकर जमीन कसायला त्याने बरेचसे मजूर ठेवले होते; आणि गावात सरपंच बनून तो रुबाबदार वावरत होता. त्याला कसली त्या दगडाची पर्वा! तर असा तो दगड रामभाऊच्या घरात आला होता.
आज सकाळपर्यंत त्याला कसलीही कल्पना नव्हती. नेहमीसारखाच दिवस उजाडला होता. नेहमीसारखंच उरकून साडेनऊच्या दरम्यान कार्यालयात जाण्यासाठी निघायचा त्याचा बेत होता. तेवढ्यात नऊच्या सुमारास शेजारच्या शेखसाहेबांचा, साउथ आफ्रिकेत असणारा त्यांचा मोठा भाऊ त्यांना भेटायला आला. त्यांना बाहेरच्या कॉटवर बसवून, आत जाऊन ते चहा सांगून आले. दरवाजातून समोरचं देवघर स्पष्ट दिसत होते. आफ्रिकेतल्या गप्पा सांगता सांगता शेखासाहेबांच्या भावाचे तिकडे लक्ष गेले. देवघरात तो लाल दगड कसला? त्यांनी विचारले.
'काही नाही. साधा दगड आहे. आमच्या घरात बऱ्याच पिढ्यात त्याला आम्ही पुजतोय.' थोड्याशा शरमेनेच रामभाऊने उत्तर दिले. त्यावर उठून तो आत गेला आणि तो दगड हातात घेऊन त्याने निरखून पाहिला. सगळेजणंच त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होते. एवढं काय हा निरखून पाहतोय?
'मी हा थोड्या वेळासाठी घरी घेऊन जाऊ का? मला थोडं त्याचं निरीक्षण करायचंय' त्याने विनंती केली. नंतर चहासाठीही न थांबता तो शेजारच्या घरी गेला. तो गेल्यानंतर शेखसाहेब, रामभाऊ आणि रामभाऊची पत्नी यांच्यामध्ये चर्चा सुरु झाली. काय दिसलं त्याला त्या दगडात रामभाऊला कळेना.
'आफ्रिकेत तो डायमंड माईनमध्ये काम करतो' शेखसाहेबानी खुलासा केला.
'डायमंड!' रामभाऊची पत्नी उद्गारली.
'त्याला हिरा वाटला कि काय तो?' आश्चर्याने रामभाऊ बोलले.
'काय माहित? पण असला तर तुमच नशीब फळफळलं बघा.' हसत शेखसाहेब म्हणाले.' दोन तीन लाख रुपये तर आरामात मिळतील.'
'लाख रुपय?' आश्चर्याने तोंडावर हात मारत पत्नी म्हणाली. लाख काय पण कधी दहा हजार रुपये एकहाती बघायलाही तिला मिळाले नव्हते. लाखभर रुपये मिळाले तर त्यांच्या मुलाला एन्जिनिअरिन्गला पाठवायला मिळेल असं रामभाऊला वाटले. तो परत आला.
'काय झालं?' श्वास रोखून धरत रामभाऊने विचारलं. तो कसंनुसं हसला. एवढी मोठी बातमी रामभाऊला सांगावी कशी या चिंतेने कि हा दगड माझ्या देवघरात का नाही या निराशेने हे त्यालाच माहीत.
'रामभाऊ, हा काही साधा दगड नाही.' त्याने सुरुवात केली. रूममधल्या सगळ्यांनीच श्वास रोखून धरले होते. 'हा अतिशय दुर्मिळ असा लाल रंगाचा हिरा आहे.'
'वाटलंच मला.' एकदाचा श्वास सोडत, पत्नीने दोन्ही हातांनी टाळी वाजवली.
'तरी काय किमत असेल त्याची?' रामभाऊची वाचा बसलेली बघून शेखसाहेबानीच विचारले.
'ते मी लगेच सांगू शकत नाही. त्याचा अजून बराचसा अभ्यास करावा लागेल. त्याची क्लॅरिटी, वजन सगळं मोजावं लागेल. नंतर मग त्याची किंमत आपल्याला कळेल.' तो जे बोलत होता, ते रामभाऊच्या डोक्यावरून जात होते.
'पण तरी किती?' आपल्यापेक्षा, आपला शेजारी कितीने श्रीमंत होणार आहे; हे कळल्याशिवाय शेखासाहेबाना स्वस्थ बसवणार नव्हते. त्यांच्या भावाचे डोळे लकाकले.
'दोन लाख, दहा लाख. किती?' शेखासाहेबांना ते नुसते शब्द विचारून धाप लागली होती.
'त्याची लाखात नाही तर कितीतरी कोट्यात किमत होईल.' हसत त्यांचा भाऊ म्हणाला.
रामभाऊ पटकन कॉटवर बसले. त्यांची बायको: हात तोंडावर, डोळे विस्फारलेले; मागे सारून तिने भिंतीचा आधार घेतला. शेखसाहेबांना कुठून भावाला घेऊन आलो असे झाले. पण आता पुढे काय?
'मला ऑफिसमध्ये जायचंय' रामभाऊ म्हणाले. आता सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागले.
'आता तुम्हाला ऑफिसमध्ये जायची काय गरज?' वरवर हसत शेखसाहेब म्हणाले. 'बरं झालं मी भैयाला घेऊन आलो. नाहीतर तुम्हाला त्या हिऱ्याचा कधीच शोध लागला नसता.' तेवढ्यातल्या तेवढ्यात माझ्यामुळेच तुम्ही कोट्याधीश झालात हे त्यानं सुचवलं.
दिवशी रजा टाकून ते ज्वेलरीवाल्याकडे गेले. त्याने तासभर तो दगड वेगवेगळ्या भिंगातून निरखून पाहिला. नंतर तो आत गेला. बाथरूम मध्ये जाऊन त्याने तोंडावर फसाफस पाणी मारले. तो जे पाहतोय त्याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. 'रेड डायमंड!' तो स्वतःशीच पुटपुटला. बाहेर हे दोघे चुळबुळत तसेच उभे होते. तो बाहेर आला. परत त्याने थोडं निरीक्षण केल्यासारखे केले आणि म्हणाला 'हा दगड हिरा आहे खरा. अतिशय दुर्मिळ असा हिरा. Red diamonds are very rare. या रफ हिऱ्याचं वजन २७९ कॅरेट भरतंय, पैलू पाडून झाल्यानंतर वजन थोडं कमी होईल. याची क्लॅरिटी ही खूपच चांगली आहे. खर सांगायचं झाल तर, आमचा हा ज्वेलरीचा धंदा पिढ्यानपिढ्याचा आहे तरी मला याची किंमत नाही करता येणार. असलं काही मी माझ्या आयुष्यात पहिलेलं नाही.' नंतर ते दोन तीन ज्वेलरीवाल्यांकडे गेले. सगळ्यांनी वेगवेगळ्या शब्दात तेच सांगितले.
संध्याकाळी ते घरी आले. वाटेत भैया म्हणत होता कि तो हिरा दिल्लीला जेमॉलॉजि लॅब मध्ये पाठवावा म्हणून. जेमॉलॉजि लॅबची सगळी माहिती त्याने रामभाऊला दिली. पण पाठवणार कसा? घरी येऊन त्याने तो परत देवघरात ठेऊन दिला. दोघेही नवराबायको आपल्याला किती पैसे मिळणार, आणि त्या पैशाचं काय करायचं याचा विचार करत, झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहिले. सकाळ उजाडली. पहाटे पहाटे लागलेल्या झोपेतून कसंतरी उठत रामभाऊ बाथरूममध्ये गेले. पैसे मिळेपर्यंत नोकरी तर केलीच पाहिजे. तेवढ्यात दारावर टकटक झाली. दारात शेजारचे सूर्यवंशी साहेब सहपरिवार उपस्थित होते.
'काय रामभाऊ, बरेच आतल्या गाठीचे निघालात राव.' खी खी हसत ते आत आले.
'काय झालं?' भोळेपणाचा आव आणून रामभाऊने विचारले.
'एवढा दुर्मिळ हिरा तुमच्या घरात लपवून ठेवलात, आणि काय झालं म्हणून विचारता?' ते तडक स्वयंपाकघरात गेले. मग त्यांनी तो हिरा चाचपून पहिला. खिडकीत नेऊन उजेडात धरून पहिला. नंतर त्यांच्या बायकोने आणि मुलांनी तसेच केले.
'वा! दिसतो खरा खऱ्या डायमंड सारखा.' स्वतःची खात्री करून घेत ते म्हणाले.
'मग काय चहापाणी वगैरे? अजून माझा ब्रशही व्हायचा आहे.' औपचारिकता म्हणून रामभाऊने विचारले.
'नाही हो. आवराआवर करायची आहे.' म्हणत सूर्यवंशी साहेब चालते झाले.
त्यांना दारात सोडून ते मागे फिरणार तेवढ्यात खालच्या मजल्यावरचे जोशीकाका जिन्यातूनच ओरडले.
'रामभाऊ, काय नशीब घेऊन आलास रे! तुझ्या पूर्वजांची मात्र कमालच म्हंटली पाहिजे.' वर चढून येत ते म्हणाले. परत हिरा दाखवण्याचा प्रोग्रॅम झाला. जोशीकाकानंतर त्यांच्या मजल्यावरचे पाटीलसाहेब, घोरपडेसाहेब; खालच्या मजल्यावरचे मुलाणी सर, कुलकर्णी साहेब, नाईटगार्ड, कचरा नेणारा राम्या अशा सगळ्यांनी हजेरी लावली. सगळ्यांनी तो हिरा हातात घेऊन पाहिला. सगळ्यांनी हिरा सापडल्याची गोष्ट विचारली. शेखसाहेबांनी बातमी चांगलीच पसरवलेली दिसत होती. पत्नीचा त्रागा चालला होता. 'असं कसं सगळ्यांना हात लाऊन देता तुम्ही? काही झालं तरी कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे ती!'
त्यादिवशी ऑफिसला जायला उशीरच झाला. जाताना ते बायकोला 'दार लाऊन घे. कुणी आलं तर उघडू नकोस.' अशा हजार सूचना देऊन गेले. ऑफिसमध्ये दिवसभर कामात त्याचं लक्ष लागत नव्हते. शेवटी काहीतरी कारण सांगून ते तासभर आधीच निघाले. घरी येऊन पाहतात तर खोलीत दोन गृहस्थ आधीच येऊन बसले होते. हे कोण आता? रामभाऊच्या कपाळावर आट्या पडल्या.
'नमस्कार! मी अतुल परांजपे. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पत्रकार आहे.' त्यातल्या एका इसमाने उठून आपली ओळख करून दिली. आयला वर्तमानपत्रापर्यंत बातमी गेली! या शेखसाहेबांना...त्याने मनातच अस्सल शिवी दिली.
'नमस्कार.' वरवर हसून रामभाऊ म्हणाला. 'तुम्हाला कसं कळलं?'
''मुलाणी सर आणि माझा भाऊ' शेजारच्या माणसाकडे बोट करत अतुल म्हणाला, 'एकाच शाळेत काम करतात.'
'असं असं.' मग पुन्हा तो हिरा निरखून झालं. तो त्यांच्या घरात कसा आला ही गोष्ट पुन्हा ऐकवावी लागली.
'Amazing! Amazing!' म्हणत ते निघून गेले.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर बातमी. '179 carat Red Diamond found in the City.' कुठे? आपल्या रामभाऊच्यात? शेजारपाजारचे कुजबुजले. १७९ कॅरेट वजनाचा? लोकांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. असा कुणाच्या घरात हिरा येतो काय? आणि तोही इतका दुर्मिळ! रामभाऊची असुरक्षिततेची भावना वाढली. कुठे ठेवावा हा हिरा? कुणी चोरला तर? पण एवढे लोक बघायला येतात, कुठे दडवूनही ठेवता येत नाही. पेपरात बातमी वाचून त्याचा धाकटा भाऊ, सह्पारीवारासह आला आणि आता आपण दोघे किती श्रीमंत होणार हे हजारदा बोलून 'यात माझाही वाट आहे' हे सूचित करत राहिला.
हिरा बघायला दारासमोर रांग लागली. रामभाऊच्या पासपोर्ट ओफिसातलेही सगळे येऊन गेले. त्याचे साहेब आता त्याच्याशी जास्त सलगीने वागू लागले. 'रामभाऊ आमचा दोस्तच हो! दहा वर्षांची ओळख म्हणजे जिगरी दोस्त म्हणायला हरकत नाही.' त्या जिगरी दोस्ताला त्यांना कधी घरी बोलवून चहा वगेरे पाजायला झाला नव्हता. पण त्या किरकोळ गोष्टी! बाकीची वर्तमानपत्रं सुद्धा जागी झाली. आणि रामभाऊच्या घरात दररोज इन्टरव्ह्यू होऊ लागले.
"कसा सापडला मग?"
"काय करणार त्याचं आता?"
"मी दिल्लीला जेमोलौजी इन्स्टिट्युटमध्ये घेऊन जाणार आहे. तिथं त्याचं पूर्णपणे परीक्षण होईल, आणि नंतर आम्ही त्याचं काय करायचं ते ठरवू". सगळ्या वर्तमानपत्रांना तो हेच उत्तर देत होता.
त्यानंतर रात्री एकदा कुणी तरी खिडकी फोडून आत यायचा प्रयत्न केला. रामभाऊच्या पहिलवान भावावरच त्यानं उडी घेतली, आणि चांगला मार खाऊन तो पळाला. त्या प्रसंगानंतर तर रामभाऊनी अजून धास्ती घेतली. शेवटी स्वतःच्या शिलकीतले पाच हजार रुपये काढून तो आणि त्यांचा भाऊ दिल्लीला गेले. दिल्लीच्या जेमोलोजी इन्स्टिट्युटमध्ये त्यांच्या येण्याची बातमी आधीच पोहचली होती. त्यांनी हिऱ्याचं पूर्ण निरीक्षण करून तो अतिशय दुर्मिळ हिरा असून त्याची किंमत कुणीही करू शकणार नाही असा निष्कर्ष काढला. प्रत्यक्ष कोहिनूर हिऱ्यापेक्षा दुर्मिळ आणि मुळत:च तेजस्वी असा हा हिरा होता. हिऱ्याच्या अस्खलितपणाचं सर्टिफ़िकेट देताना त्यांनी हेही सुचविलं की तो दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये ठेवल्यास देशाची शान वाढेल. रामभाऊच्या भावाला हसावं की रडावं कळेना. असा कोण मूर्ख आहे, जो तो हिरा असाच देऊन टाकेल?
'आपण परदेशात प्रयत्न करूया. कुणीतरी त्या हिऱ्याची किंमत आपल्याला देईलच.' तो म्हणाला. येताना रेल्वेच्या प्रवासात एकदाही पापणी न मिटता, जीवाच्या कराराने तो हिरा त्यांनी घरी आणला. घरात तो कुठे ठेवावा याची चर्चा झाली. बँकेत ठेवायचाही विचार झाला, पण हल्ली बैकेवर कोण विश्वास ठेवतो? त्यापेक्षा तो घरीच, डोळ्यासमोर राहिलेला बरा असं सगळ्याचं मत पडलं. रामभाऊचा भाऊ, त्या हिऱ्याचं रक्षण करण्याकरता त्यांच्याकडेच तळ ठोकून राहिला. कुठूनतरी एका मंत्र्याची ओळख काढून, त्यानं त्याला हिरा विकत घेण्यासाठी फोरेनात कुणी भेटलं तर बघा. तुमचं कमिशनही तुम्हाला देऊन टाकू अस सांगितलं होत. आता फक्त वाट पाहायचं काम होत.
दररोज सकाळी ते दोघे भाऊ त्या हिऱ्यासाठी नवीन जागा शोधून काढू लागले. कधी कपाटात कपड्यांच्या घडीत, तर कधी पिठाच्या डब्यात. एकदा तर संडासातही, साबणासारखा तो ठेऊन दिला. आता संडासात कोण जाईल बघायला? पण तरीही ऑफिसमध्ये रामभाऊचे लक्ष लागेना. दररोज ऑफिसात जायला उशीर होऊ लागला, तिथे कामात हजार चुका होऊ लागल्या. त्याच्या नशिबाने, त्याचे साहेब त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करू लागले म्हणून बरं! काय थोडेच दिवस नोकरी करणार हा बेटा, कशाला उगाच त्रास द्या! अशी दयेची वृत्ती त्यांनी अंगिकारली होती. पण संध्याकाळी घरी जाताना, रामभाऊच्या मनात धाकधूक वाटू लागली. हिरा अजून तिथे असेल ना? कुणी चोरला तर नसेल? घरी आल्या आल्या, तो प्रथम हिरा जागेवर आहे का याची खात्री करून घेई. एकदा त्यांना सकाळी ठेवलेल्या जागी हिराच सापडेना. त्यांचा भाऊही सिगरेट आणायला खाली गेला होता. हिरा शोधण्यासाठी त्यांनी कपाटातली सगळी कपडे खाली फेकली, स्वयंपाकघरातले सगळे डबे खोलून पाहिलं; पिठाचा डब्बा तर खाली जमिनीवरच पालथा केला, बाथरूममधल्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे फेकल्या. पण हिरा कुठेच सापडेना. ओरडून आख्खं घर त्यांनी डोक्यावर घेतले. सिगारेट घेऊन परतलेल्या त्याच्या भावाला क्षणभर कळेनाच कि काय चाललय. सगळा प्रकार लक्षात आल्यावर, त्याने कॉटखाली शिरून आंब्याच्या परडीतून तो हिरा काढून दाखवला. तेव्हा कुठे रामभाऊला आठवले कि तिथेच त्याने हिरा ठेवला होता. त्याची स्वतःलाच लाज वाटली.
महिना झाला तरी मंत्र्याकडून काही कळेना. भारतातून एकही ऑफर आली नव्हती. त्यात दिल्लीच्या lab मधला एक माणूस त्यांच्याच शहरात रहायला आला होता. दर दोन दिवसाला त्याची घरी एक फेरी होऊ लागली. आणि त्या हिऱ्याचं महत्व तो दोघा भावांना पटवून देऊ लागला. कुणीतरी आयडिया दिली, कि हिरा फोडून त्याचे तुकडे करून विकले तर? रामभाऊच्या भावाला ती आयडिया एकदम पटली.
"आपण हिऱ्याचे दोन भाग करूया. एक भाग तुला आणि एक मला. मग मी बघतो काय करायचं माझ्या भागाचं ते" तो म्हणाला. चारपिढ्या, देवासारख पुजलेल्या त्या हिऱ्याचे तुकडे करणं, रामभाऊला पटेना. मग कडक शब्दात, "वाटणीत तो हिरा दगड समजुन तू मला देऊन टाकला होतास. तेव्हा कायद्यानं त्यात वाट मागायचा तुला काहीही अधिकार नाही. पण तरीही मी तुझा हक्क डावलत नाही. पण मी जो काही निर्णय घेईन तो तुला मान्य करावा लागेल". असं सांगून त्यानं त्याचं तोंड बंद करून टाकलं होत.
आता निर्णय रामभाऊच्या हातात होता.
त्याच्या भावाने त्या lab मधल्या माणसाला हिरा फोडण्याची गोष्ट सांगितली, तर त्याला चक्करच आली. "राष्ट्रीय संपत्ती आहे ती" त्वेषाने तो म्हणाला. दोन दिवसांनी हसत हसत मंत्र्याकडून त्याचा भाऊ बातमी घेऊन आला. "आठ मिलीयन डॉलर्स" ओरडून तो म्हणाला. रामभाऊही खुश झाला. त्याचं रुपयात रुपांतर करायला दोघांनाही जमेना. कुणीतरी सांगितलं की ते ३६ कोटीपर्यंत जातंय तर ऐकूनच त्यांना कसंनुस झालं. तो lab मधला माणूस पळत आला.
"अरे गाढवांनो, त्याची किंमत ८ मिलीयन नाही तर ४००-५०० मिलीयन तरी मिळायचा हवीय." रागानं तो म्हणाला. 'आत्तापर्यंत आपला देशातले सगळ्यात चांगले दागिने, हिरे, रत्नं परकीयांनी चोरली. आता हे हि तुम्ही त्यांना कवडीमोलाने विका.
'हे भोसडीच्या..' रामभाऊचा भाऊ गेन्ड्यासारखा त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांमधले भांडण आवरायला शेजारी पाजारी जमा झाले आणि त्यांनी भांडण अजून वाढवलं. त्या सगळ्या दंग्यातून रामभाऊ बाजूला झाला आणि कपाटातला हिरा खिशात टाकून बाहेर निघून गेला. त्याच्या डोक्यात वादळ घोंघावत होत, आपला कोहिनूर ब्रिटिशांनी गडप केल्याचा इतिहास त्याला माहीत होता. आणि हा हिरा तर त्यापेक्षा मोलाचा, असा कसा तो, तो देशाबाहेर जाऊन देईल? त्याच्यासाठी आता ती राष्ट्रभक्तीची गोष्ट झाली होती. त्यानं निर्णय घेऊन टाकला.
दुसऱ्या दिवशी तो ऑफिसातून आल्यावर, भाऊ आरडाओरडा करत होता. त्याच्या परस्पर तो हिरा रामभाऊन विकून टाकला असा त्याचा आरोप होता. यावर शांतपणे रामभाऊ म्हणाला, "विकला नाही, दिल्लीच्या म्युझियमला दान केला. आपल्या घराण्याचं नाव त्या हिऱ्याबरोबर तिथं कायमचं कोरलं जाईल". आणि त्यानं गादीवर अंग टाकलं. भाऊच्या शिव्या चालूच होत्या. पण बऱ्याच दिवसांनी रामभाऊला लगेचच शांत झोप लागली.
समाप्त
MARATHI BLOG,FUN,LIFE,COMEDY,LITERATURE,NOVEL,STORY,CONVERSATION, THOUGHTS,BOOKS,POEMS,DREAMS,IMAGINATION AND LOT MORE....
शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०
मंगळवार, २ मार्च, २०१०
श्री आणि गौरीचे किस्से - भाग 5
आई बाबा निघून गेल्यावर तो विचारात पडला. टी व्ही वर नऊच्या बातम्या लागल्या होत्या. ऑफिसमधून आल्यापासून कपडेही त्याने बदलले नव्हते. दरवाजा आतून हिने बंद करून घेतला की काय? बेडरूमचा दरवाजा हाताने हलकासा ढकलून त्याने पाहिलं. तो उघडाच होता.
गौरी बेडवर पडून स्फुंदत होती. श्रीचा तिला खुप राग येत होता. त्याने हे एवढ्या पुढे जाउन दिलेच कसे? एवढ्या हौसेनं मांडलेल्या संसारची झालेली ही दशा बघून तिला जाम रडू येत होतं. श्री आत आलेला तिला कळलं, तिने अजुनच मोठ्याने रडायला सुरुवात केली. तिच्याकडे पूर्ण दुर्लक्श करून श्रीने कपाटातून पायजामा काढला आणि तो बाथरूममधे गेला. तो बाहेर येइपर्यंत तिचे रडणे बरेच कमी झाले होते. तो तिला समजावण्याचं काही बोलेल म्हणून तिने रडण्याचा आवाज अजूनच कमी केला.
"ठिक आहे, उद्याच कोर्टात जाउन घटस्फोट घेउया." दारात घुटमळत तो म्हणाला. तिच्या रडण्याचा भोंगा अजूनच वाढला.
फ़्रिजमधून बीयर ची बाटली काढून तो परत टि व्ही समोर येउन बसला. सोनीवर रिषी कपूर चा पिक्चर लागला होता. उशी पाठीला लावून तो सोफ्यावर रेलून बसला. सुरुवातीचा काही काळ तो आतली चाहूल घेत होता, पण नंतर तो ही पिक्चरमधे रमला. बारा वाजता पिक्चर संपला तरी गौरी बाहेर आली नाही. आता त्याला सासरेबुवांच्या शक्कलेवर शंका यायला लागली होती. खरंच घटस्फोट द्यावा लागतोय की काय? त्याला चिंता वाटायला लागली.
तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडून गौरी बाहेर आली, आणि हॉलमधे कोपर्यात ठेवलेल्या लग्नाच्या भेटवस्तू तिने उघडायला सुरुवात केली. टि व्ही वर परत बातम्या सुरु झाल्या होत्या. तो गंभीरपणे बातम्या बघण्याचं नाटक करत, डोळ्याच्या कोपर्यातून तिच्याकडे पहात होता. हुंदके देत ती प्रत्येक वस्तूवरचं नाव बघत, आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवत होती. काय करतेय ही? त्याला कळेना. शेवटी न राहवून त्याने विचारलेच.
"काय करतेस?"
"गिफ्ट्स सॉर्ट करतेय, दिसत नाही का?" दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या पूसत ती म्हणाली.
"आत्ता? रात्री बारा वाजता?" अचंब्याने त्याने विचारले.
"हो. माझ्या लोकांकडून आलेल्या गोष्टी बाजूला काढून ठेवतेय. म्हणजे उद्या वेळ नको व्हायला. घटस्फोट पाहिजे ना तुला!" रडत, नव्या कोर्या रोबवर नाक शिंकरत ती म्हणाली.
"मला पाहिजे?" सोफ्यावर उठून बसत तो अगदी किंचाळलाच.
"मग कुणाला? तुच तर मघाशी बेडरूममधे म्हणालास तसं!" गच्च भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहात ती म्हणाली.
"मी तसं म्हणालो कारण तु तसं आधी म्हणालीस म्हणून." चक्रावून तिच्याकडे पहात तो म्हणाला.
"मी तसं म्हणाले म्हणून तु ही थोडंच तसं म्हटलं पाहीजेस!" लटक्या रागानं तिने सॉर्टिंग चालू ठेवले.
आपण जिंकल्याची श्री ची आता खात्री पटली.जय हो ससूरजी! मनात त्याने सासर्यांना धन्यवाद दिले.
"म्हणजे तू घटस्फोट मागितलेला चालतो, आणि मी मागितलेला चालत नाही." हसत तिच्याजवळ येत तो म्हनाला.
"येस." ती म्हणाली. "मी आपली रागाने अशीच म्हणालेले. तू सीरियसली म्हणालास. कदाचीत हनिमूनमधेच माझा तूला कंटाळा यायला लागला असेल." कुठेतरी शून्यात बघत ती म्हणाली. त्याला भारी हसू आले. तिच्याजवळ जात त्याने तिचा चेहरा हातात घेतला. त्या छान मेक अप केलेल्या चेहर्याची आता वाट लागली होती. रडून रडून डोळे लाल झाले होते. शिंकरून शिंकरून नाक लाल झालं होतं. आणि डोळ्यातून दोन अश्रुंचे ओघळ अजुन वहात होते. त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला मिठीत घेत तो तिच्या कनात हळूच पुटपुटला,
"कशाचा कंटाळा यायला, त्याचा आधी भरपूर आस्वादतरी घ्यावा लागतो."
"You sexist!" त्याला जोराने ढकलून ती बेडरूममधे धावत गेली.
समाप्त
गौरी बेडवर पडून स्फुंदत होती. श्रीचा तिला खुप राग येत होता. त्याने हे एवढ्या पुढे जाउन दिलेच कसे? एवढ्या हौसेनं मांडलेल्या संसारची झालेली ही दशा बघून तिला जाम रडू येत होतं. श्री आत आलेला तिला कळलं, तिने अजुनच मोठ्याने रडायला सुरुवात केली. तिच्याकडे पूर्ण दुर्लक्श करून श्रीने कपाटातून पायजामा काढला आणि तो बाथरूममधे गेला. तो बाहेर येइपर्यंत तिचे रडणे बरेच कमी झाले होते. तो तिला समजावण्याचं काही बोलेल म्हणून तिने रडण्याचा आवाज अजूनच कमी केला.
"ठिक आहे, उद्याच कोर्टात जाउन घटस्फोट घेउया." दारात घुटमळत तो म्हणाला. तिच्या रडण्याचा भोंगा अजूनच वाढला.
फ़्रिजमधून बीयर ची बाटली काढून तो परत टि व्ही समोर येउन बसला. सोनीवर रिषी कपूर चा पिक्चर लागला होता. उशी पाठीला लावून तो सोफ्यावर रेलून बसला. सुरुवातीचा काही काळ तो आतली चाहूल घेत होता, पण नंतर तो ही पिक्चरमधे रमला. बारा वाजता पिक्चर संपला तरी गौरी बाहेर आली नाही. आता त्याला सासरेबुवांच्या शक्कलेवर शंका यायला लागली होती. खरंच घटस्फोट द्यावा लागतोय की काय? त्याला चिंता वाटायला लागली.
तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडून गौरी बाहेर आली, आणि हॉलमधे कोपर्यात ठेवलेल्या लग्नाच्या भेटवस्तू तिने उघडायला सुरुवात केली. टि व्ही वर परत बातम्या सुरु झाल्या होत्या. तो गंभीरपणे बातम्या बघण्याचं नाटक करत, डोळ्याच्या कोपर्यातून तिच्याकडे पहात होता. हुंदके देत ती प्रत्येक वस्तूवरचं नाव बघत, आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवत होती. काय करतेय ही? त्याला कळेना. शेवटी न राहवून त्याने विचारलेच.
"काय करतेस?"
"गिफ्ट्स सॉर्ट करतेय, दिसत नाही का?" दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या पूसत ती म्हणाली.
"आत्ता? रात्री बारा वाजता?" अचंब्याने त्याने विचारले.
"हो. माझ्या लोकांकडून आलेल्या गोष्टी बाजूला काढून ठेवतेय. म्हणजे उद्या वेळ नको व्हायला. घटस्फोट पाहिजे ना तुला!" रडत, नव्या कोर्या रोबवर नाक शिंकरत ती म्हणाली.
"मला पाहिजे?" सोफ्यावर उठून बसत तो अगदी किंचाळलाच.
"मग कुणाला? तुच तर मघाशी बेडरूममधे म्हणालास तसं!" गच्च भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहात ती म्हणाली.
"मी तसं म्हणालो कारण तु तसं आधी म्हणालीस म्हणून." चक्रावून तिच्याकडे पहात तो म्हणाला.
"मी तसं म्हणाले म्हणून तु ही थोडंच तसं म्हटलं पाहीजेस!" लटक्या रागानं तिने सॉर्टिंग चालू ठेवले.
आपण जिंकल्याची श्री ची आता खात्री पटली.जय हो ससूरजी! मनात त्याने सासर्यांना धन्यवाद दिले.
"म्हणजे तू घटस्फोट मागितलेला चालतो, आणि मी मागितलेला चालत नाही." हसत तिच्याजवळ येत तो म्हनाला.
"येस." ती म्हणाली. "मी आपली रागाने अशीच म्हणालेले. तू सीरियसली म्हणालास. कदाचीत हनिमूनमधेच माझा तूला कंटाळा यायला लागला असेल." कुठेतरी शून्यात बघत ती म्हणाली. त्याला भारी हसू आले. तिच्याजवळ जात त्याने तिचा चेहरा हातात घेतला. त्या छान मेक अप केलेल्या चेहर्याची आता वाट लागली होती. रडून रडून डोळे लाल झाले होते. शिंकरून शिंकरून नाक लाल झालं होतं. आणि डोळ्यातून दोन अश्रुंचे ओघळ अजुन वहात होते. त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला मिठीत घेत तो तिच्या कनात हळूच पुटपुटला,
"कशाचा कंटाळा यायला, त्याचा आधी भरपूर आस्वादतरी घ्यावा लागतो."
"You sexist!" त्याला जोराने ढकलून ती बेडरूममधे धावत गेली.
समाप्त
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)