शनिवार, १९ सप्टेंबर, २००९

आम्ही अमेरिकावासी

               इतकी वर्षे अमेरिकेत रहायल्यानंतर आपण अमेरिकन झाल्याचं तिला वाटलं तर त्यात नवल कसलं! नाहीतरी भाजी खरेदी करण्यासाठी, रस्त्यावर भाजी विकत बसलेल्या लोकांना विसरुन, मोठ्या 'ग्रोसरी स्टोअर्स' मध्ये जायची तिला आत सवय झाली होती; फोडणीसाठी लागणार्या जिर्याला क्युमिन सीड्स म्हणायचं आता तिच्या जिभेवर बसलं होतं. एवढंच काय तर वाहतुकीसाठी  कार सोडून दुसरे वहान असु शकते हे ही ती पूर्णपणे विसरली होती. वडील अतिशय कर्मठ असल्यानं, भारतात तिला कधी जीन्स ही घालायला मिळाली नव्हती; पण इथे 'उन्हाळ्यात तर मी जीन्स मी घालूच शकत नाही. किती उकडंत ना!' असं म्हणत कॉटनची हाफ पॅंट घालण्यापर्यंत तिची मजल गेली होती. जेवताना ताटात भाजी पोळी  वरण भात या सगळ्या गोष्टी आता क्वचितच दिसू लागल्या होत्या. "आमच्या पिलाला अमेरिकन पदार्थच जास्त आवडतात, त्यामुळं आम्हीही तेच जास्त खातो" म्हणत ताटात पास्ता, सॅलेड सारखे पदार्थ पडत होते. दुकानात गेल्यानंतर भरमसाठ खरेदी करुन, त्या गोष्टी "आपल्याला आवडल्या नाहीत" या एकाच सबबीवर परत करणं हे सौभाग्य नसून तो आपला हक्कच आहे असं ती समजू लागली होती. अशा कितीतरी अमेरिकन लकबी तिनं आत्मसात केल्या होत्या. मग तिनं स्वत:ला अमेरिकन म्हणवून घेतलं म्हणून काय बिघडलं!
               सुरुवातीला ज्या गोष्टीसाठी तिला भारताची आठवण यायची त्याच गोष्टीसाठी आजकाल तिला अमेरिका आवडत होती. दोन-तीन वर्षांनी होणारी भारताची फेरी, तिचं भारताबद्दलचं प्रेम वाढवण्याऐवजी कमीच करत होती. कसलं ते पोल्युशन! दंगा, गोंधळ, बेशिस्तपणा आणि त्या उंचच उंच इमारती! तिला तर अगदी गुदमरून जायचं. रस्ता रिकामा असला तरी रिक्षावाल्याचा एक हात सतत हॉर्नवर! का तर म्हणे मधेच कुणी टपकु नये! त्याचंही बरोबरच आहे म्हणा, नाहीतर भारतात रस्त्यावर फक्त माणसंच असतील असं नाही.  गाई गुरांनाही  रस्ता ओलांडायचा असतोच की! पुण्यात तर रस्त्यावर एकाही बाईचं तुम्हाला तोंड बघायला मिळणार नाही! नाही हो, मनाई वगैरे काही नाही. पण रस्त्यावर पोल्युशनच इतकं आहे की त्यांना सगळं तोंड एखाद्या दरोडेखोरासारखं रुमालानं गुंडाळावं लागतं! कुणी परदेशी आला, तर इथे सगळे अतिरेकी  बिनबोभाट रस्त्यावर काय हिंडताहेत असं वाटेल त्याला! त्यामुळं अमेरिकेतलं शिस्तशीर आयुष्य चांगलच मानवलं होतं तिला. मरणाची  धावपळ नाही, बिनकामाचे हॉर्नस नाहीत; आणि दररोज दुप्पट वाढत जाणारी महागाई नाही.
             भारतातल्या महागाईबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे! पाच सहा रुपयाला मिळणार्या वडापावची  किंमत पन्नास साठ रुपये झाली होती. लार्ज (म्हणजे अमेरिकेतला स्मॉल) साईजचा पिझ्झा पाचशे रुपयाला! तिच्या पिलाच्या नाश्त्यासाठी सिरीयल आणायला ती आधुनिक मार्केट मधे गेली, आणि त्याची  किंमत बघुन तिला शॉकच बसला. एवढ्याशा सिरीयल ला २०० रुपये! सिरीयल, पिझ्झा या गोष्टी  इथं अन्न, वस्त्र, निवार्यासारख्या गरजेच्या झाल्या होत्या. त्यांची ती लक्झरी किंमत बघून तिला धक्काच बसला. कपड्यांच्या खरेदीसारखी, बायकांची अत्यंत आवडती गोष्टही  आजकाल डोकेदुखीची झाली होती. अमेरिकेतल्या गोर्या मेमलाही लाजवतील, अशा तोकड्या टी-शर्टच्या किंमती  मात्र लांबलचक होत्या. तिच्या पिलासाठी एखादा चांगला शरारा घेण्यासाठी ती पुण्यात लक्ष्मी रोडवर गेली, तर तो माणूस दोन हजाराखाली  काही दाखवायलाच तयार नाही!  "अहो हजारापर्यंतचे नाहीत का?" असं आवंढा गिळून तिने दुकानदाराला विचारलं;  आणि ज्या वहिनीबरोबर ती शॉपिंगला आली होती, तिच्याकडे वळून ती म्हणाली, "एव्हडे महागडे घेऊन काय करायचं? बघितलं तर दोन-तीनदा घालेल ती तिथे!"
             दुकानातून निघताना त्याच वहिनीनं तिच्या मुलीसाठी  जेव्हा साडेचार हजाराचा घागरा उचलला, तेव्हा तिचं तोंड बघण्यासारखं झालं होतं! भारतात आपल्यापेक्षा जास्त कमवायला लागलेत की काय? तिच्या मनात आलं. पण सेल आणि क्लिअरन्सची सवय झालेल्या तिच्या अमेरिकन मनाला रिटेल किंमत द्यायची सवय कुठे राहिली  होती?

            एकदा तर गंमतच झाली. मराठी नाटकांच्या सीडीज आणायला ती एका दुकानात गेली. तिला हव्या त्या सीडीज मिळाल्याने खुश होउन, बिलाकडे न बघता तिनं त्या खरेदी करुन टाकल्या. आणि दुकानाच्या बाहेर पाऊल टाकताच तिच्या लक्षात आलं, की तिच्या बोसच्या डीव्हीडी  प्लेअरवर या सीडीज चालणार ही नाहीत कदाचीत! ती पटकन दुकानात शिरली, आणि त्यांना तिनं तो प्रॉब्लम सांगितला.
"मला डीव्हीडीज दाखवा बघू" ती म्हणाली. त्यांनी  तिच्यासमोर चार-पाच डीव्हीडीज टाकल्या.
"एव्हढ्याच!"
"बाई, हे सीडीजचं दुकान आहे, डीव्हीडीचं नाही" पुढचा माणूस उर्मट्पणे म्हणाला. तिला त्यातली  एकही पसंद पडली  नाही. नकारार्थी  मान हलवुन, "मला ह्या सीडीज रिटर्न करायच्या आहेत" असं तिनं त्यांना सांगितले.
"आम्ही एकदा विकलेला माल परत घेत नाही" चेहर्यावरची रेषाही  न हलवता त्यानं दुकानाबाहेर लावलेल्या पाटीकडे हात केला. पाटीवर दुकानाच्या भल्यामोठ्या नावाखाली बारीक अक्षरात ते वाक्य लिहलं होतं.
"अहो, मी आत्ता दोन सेकंदापूर्वीच घेतल्यात ह्या. याला मी  हातही नाही लावला. आणि तुम्हाला त्या माघारी  घ्यायला काय प्रोब्लेम आहे?" तिला ते कळेना.
"आमचा नियम आहे मॅडम" तो पून्हा निर्विकार चेहर्यानं म्हणाला.
"पण माझ्याकडे बोसचा डीव्हीडी आहे आणि त्याच्यावर या नाही चालणार. मला या अमेरिकेला घेऊन जायच्यात" अमेरिकेचं नाव ऐकुन तरी तो नरम येईल म्हणून तिनं मुद्दाम सांगितलं.
"तुम्ही अमेरिकेला घेऊन जा, नाहीतर फ़ॉरेनला घेऊन जा, सगळ्या  डीव्हीडी  प्लेअर वर या चालणार म्हणजे चालणार." अमेरिका फ़ॉरेनमधे नसून, जणू पलीकडच्या गल्लीतच असल्यासारखी तो म्हणाला.
"तुम्हाला काही माहीताय का बोसच्या डीव्हीडी प्लेअरबद्दल? तो भारतात मिळतही नाही. मला माहीताय या नाही चालणार त्या!" ती वैतागून म्हणाली. त्यानं खांदे उडवले. तिला संताप आला. दिवसाढवळ्या ग्राहकांना लुबाडायचं चाललयं! अमेरिकेत वॉलमार्ट मधे 'वापरलेल्या' गोष्टीही  तिने किती  ताठ मानेने रिटर्न केल्या होत्या!
"हा तर सरळसरळ अन्याय आहे! तुमच्या मॅनेजरला बोलवा बघु." तिनं मागणी केली. दुकानात काम करणारी दोन मुलं यावर खुऽऽ करुन हसली. त्या माणसालाही  काय बोलावं ते कळेना. त्याच्या आख्ख्या कारकिर्दीत हा प्रश्न बहुतेक त्याला पहिल्यांदा विचारला गेला असावा.
"मीच मॅनेजर आहे" तो म्हणाला.
"मग मला मालकांना भेटायचंय." या गोष्टीचा आज निकाल लावायचाच असं तिनं ठरवलेलं.
"तो ही मीच." तो  निर्ल्लजपणे म्हणाला. परत ती दोन मुलं हसली.
घरी येऊन तणतणत तिनं ही गोष्ट घरच्यांना सांगितली. पण त्यांनी तिलाच वेड्यात काढलं. "विकलेल्या गोष्टी  परत घ्यायला लागल्यावर त्याचं दिवाळंच निघायचं!" तिच्या भावानं दुकानदाराची बाजु घेऊन तिची टर उडवली. "पण आमच्या अमेरिकेत तर.." हे तिचं वाक्य अर्ध्यावरच सोडत, आश्चर्यानं त्या लोकांकडे ती पहात राहीली. जर यांनाच काही वाटत नाही , तर दुकानदार कशाला त्याचे नियम बदलेल? अमेरिकेत या गोष्टी किती सहज, सोप्या वाटतात!
             त्यामुळं प्रत्येक वेळी भारताची फेरी झाल्यानंतर आपण पक्के अमेरिकन होत चालल्याची तिची जास्तीत जास्त खात्री पटत चालली होती. तिच्या नवर्याच्या मते ती जरा जास्तच अमेरिकन बनत चालली होती. जिथे गरज नव्हती  तिथेही ती  अमेरिकन पद्धतीनं विचार करत होती. त्याचं उदहरणच द्यायचं झालं तर;  एक दिवस तिची चार वर्षांची मुलगी, जिला लाडाने ते 'पिलु' म्हणत, मॉंटेसरीतुन येताना एक स्पॅनेश बार्बी घेऊन आली.
"कुणी दिली ही बाहुली तुला?" तिनं पिलाला विचारलं.
"गॅब्रियलनं." ती लाजत म्हणाली.
"and he said, I am his girlfriend."  हाताला झाका देत लाजत डोळ्यांच्या कोपर्यातून इकडेतिकडे बघत तिनं सांगितलं. ही दोघेही नवराबायको हसायला लागली. इकडे पिलू सोफ्यावर  "I am a girlfriend. I am a girlfriend."  म्हणून नाचत होतं.
"नक्की गर्लफ़्रेंड म्हणजे काय गं?" पोरीच्या मनात नक्की काय आहे हे काढण्यासाठी तिनं विचारलं.
"म्हणजे...you know he is my boyfriend and I am his girlfriend." चार वर्षांच्या मुलीच्या बुद्धीनं तिनं उत्तर दिलं.
"ठीक आहे. उद्या शाळेत गेल्यावर मी  रिटर्न करुन टाकेन.' हसत ती नवर्याला म्हणाली.
"No. I don't want to return it. He gave it to me. It's my present." पिलानं इवलासा चेहरा केला.
"ठिक आहे ठेऊयात मग." तिचा नवरा म्हणाला.
"असं कसं ठेऊयात?" अचानक गंभीर होत तिनं विचारलं. "आपण ठेऊन घेतल्यानंतर, त्या गोष्टीला मान्यता दिल्यासारखं होईल. पून्हा कधीतरी  ते पार्टीसाठी, गॅब्रियलच्या गर्लफ्रेंडला घेऊन जायला आले, तर तु काय करशील?"
"इतक्या लहान वयात तसं काही असेल इथे?" शंकीत नजरेनं नवर्यानं विचारलं.
"आपल्याला काय माहीत? असेलही कदाचित."
"नक्की काय झालं पिला सांगशील?" तिनं परत पिलाला विचारलं.
“he said I like you and you are my girlfriend”  नाचत ती म्हणाली.
"सगळ्यांसमोर?"
"No. Nobody was there. They were inside the classroom"
"उद्या शाळेत गेल्यावर तिच्या टिचरला विचारतेच." तिचं डोकंच फिरलं. पोरीला सरळ सरळ एकट्या मुलाबरोबर बाहेर सोडतायत म्हणजे! लहान असली म्हणून काय झालं!
              दुसर्या दिवशी  शाळेत गेल्यानंतर तिला कळलं की ते प्रपोजल वगैरे काही नव्हते. खेळण्यांच्या दुकानात गॅब्रियलनं वडिलांकडून हट्ट करून ती बाहुली पिलासाठी खरेदी केली होती. शाळेत गॅब्रियलला पिलु बरीच मदत करत असतं म्हणे! त्याच्या वडिलांनीही  कौतुकाने ती घेऊन दिली. आणि इतर मुलांसमोर देऊन रडारडी नको म्हणून शिक्षिकेने त्यांना कॉरिडॉर मधे पाठवलं होतं. तिथे काय झाले ते कुणालाच माहीत नव्हतं. "तु उगाच बाऊ करतेस." म्हणत नवर्याने तो जोक सगळ्यांना सांगितला होता. पण त्याला काय माहित, आपलं पिलु कधी ना कधी डेटिंग करायला लागणार आहे, या विचाराने त्या रात्री तिला झोप लागली नव्हती.
            तशी  ती  स्वत:ला अमेरिकन मानत असल्याने, डेटिंगला तिचा उघड उघड विरोध नव्हता. "ड्रगच्या आहारी जाण्यापेक्षा एखाद्या मुलाबरोबर पिक्चरला गेली  तर काय वाईट आहे" असं ती मैत्रिणींसमोर अगदी  अमेरिकनांसारखं बोलायचीही. नाहीतरी खरे अमेरिकन्स आपला मुलगा सोळा वर्षांचा झाला तरी त्याला गर्लफ्रेंड नाही  हे आनंदाने न घेता, काही प्रोब्लेम तर नाही  पोरात, असाच विचार करतात. पण तिच्या मनात मात्र, "आईवडिलांच्या डोळ्यापुढे कुणा मुलाचा हात धरुन जायची  हिंम्मतच कशी होते या सोळा-सतरा वर्षांच्या कार्ट्यांची?" असंच काहीतरी चाललेलं असायचं.
              एकदा तिच्या गोर्या सहकार्याने त्याच्या सहा वर्षाच्या गर्लफ़्रेंड बरोबर ब्रेकप झाल्यावर, दोन महिन्यात दुसर्या मुलीबरोबर डेटिंग सुरु केलं हे ऐकून "सहा वर्षाचा संबंध तुटल्यावर, सहा महिनेही डेटिंग सुरु करायला तुला वाट बघता नाही आली?" (मनात - लाज वाटत नाही?) असं सगळ्यांसमोर खडसावून विचारून, तिनं  त्याला कावराबावरा करून टाकला होता. आणि त्याच सहकार्याला, त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडची ओळख करून देताना, भेटल्यानंतर तिच्या ओठांचं चुंबन घेऊन 'हाय हनी' आणि निघताना परत तिच्या ओठांचं चुंबन घेऊन 'बाय हनी. आय लव्ह यु' म्हणताना  तिने पाहीले होते. एवढं सगळ्या लोकांच्यात चुंबन घेऊन दर्शवलेलं प्रेम, दोन महिन्यात आटलं कसं तिला प्रश्न पडला. पण मग ती अपेक्षेनं  तिच्या दुसर्या सहकार्याकडे बघायची. त्याची बायको  त्याची हायस्कूल स्वीटहार्ट होती, आणि दहा वर्षाच्या लग्नानंतर आणि दोन मुलांनंतरही त्याचं लग्न टिकून होतं. ते दर वर्षी आठवडाभर कुठेतरी फिरायला जायचे. लग्नाची  अनिव्हर्सरी, बायकोचा बर्थडे साजरा करायला तो नेहमी  रजा टाकायचा.  ऑफिसमधे नेहमी त्याच्या तोंडात त्याच्या बायकोचं आणि मुलांचं नाव असायचं. कधी कधी त्यांच्याबाबतीत तो जास्तच माहीती  पुरवतो  असं तिला वाटायचं. पण एकंदरीत हे अगदी  आदर्श अमेरिकन जोडपं! असं तिला वाटायचं. पण त्यानेही  एकदा तिचा भ्रमनिरास केला. त्याचं काय झालं, एकदा रेस्टॉरंट्मधे ते दुपारी  जेवायला गेले होते. तिचा आदर्श सहकारी, ' त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आलाय, तेव्हा बायकोला काहीतरी घेतलं पाहिजे' असं बोलत होता.
“अरे शेजारीच व्हिक्टोरिया सिक्रेटचं दुकान आहे, तिथे जाऊन काहीतरी  बघ.”  आणखी एका सहकार्याने हसत सुचवलं.
“हो, पण माझ्या बायकोला ते बसायला पाहिजे ना?”  तिच्या आदर्श सहकार्याने जोक केला. नंतर तिच्याकडे पाहुन म्हणतो कसा,
“नाहीतर आपण बीनाला ट्राय करायला लावू या”
what the heck!
तिचा चेहरा पाहून कुणी हसायचं धाडस केलं नाही.
“yaa sure! if she is as petite as me!” असं ताडकन बोलून ती तिथून उठली.
घरी येऊन तिनं नवर्याला हा किस्सा सांगितला, तर हसुन म्हणतो  कसा, "सहज चेष्टेत बोलला असेल, एवढं मनाला लावून नाही  घ्यायचं." अरे मनाला लावुन कसं नाही  घ्यायचं? मी  बाई आहे म्हणून काहीही बोलायचं म्हणजे? अमेरिकेत कुठल्यातरी  शहरात, एका बाईने म्हणे "smash shack" टाकलं होतं. Smash shack म्हणजे "तोडफ़ोडीचं दुकान". तुम्ही  त्या दुकानात जायचं आणि तुम्हाला जे काही तोडु वाटतय ते विकत घ्यायचं. सिरॅमिक प्लेट्स, वाईन ग्लासेस, काचेचे जग. थोडक्यात काचेचं काहीही.  नंतर संरक्षक हेल्मेट घालून तोडफोडीसाठी खास तयार केलेल्या रुममधे जायचं; आणि तिथे भिंतीवर आपटुन तोडायचं जे काही तोडायचय ते. तुम्हाला हव्या तश्या काचेच्या गोष्टी मिळतील तिथे फोडायला. फोडण्याआधी ज्याच्या नावानं तुम्हाला त्या फोडायच्या आहेत त्याचं नावही  लिहू शकता तुम्ही त्या प्लेटवर! भन्नाट कल्पना आहे नाही?  फक्त अमेरिकन लोकांनाच असल्या कल्पना सुचु शकतात. आत्ता जर तिला त्या रुममधे जायला मिळालं  तर तिने शंभरावर प्लेट्स सहज तोडल्या असत्या!
                मग  तिच्या नवर्यानं  तिला त्याच्या लेडी मॅनेजरच्या किस्स्याची  आठवण करून दिली. तिनं म्हणे भर मिटींगमधे "माझ्या पार्श्वभागावर एक टॅट्यू आहे" असं जाहीर केलं होतं. शी! असलं कसं बोलू शकतात ते पब्लिकमधे!  आणि तिला अजून मीटिंगमधे फटाक्यासारख्या उडणार्या 'फ..' शब्दाचीही नीट  सवय झाली नव्हती! भारतात कुणी असं  काही  बोललं तर काय कहर उडेल असं तिला वाटलं.
              दुसर्या  दिवशीही  ऑफ़िसला जाताना ती मनातनं धुसफ़ुसत होती. त्याचवेळी रेडिओवर एक सनसनाट बातमी लागली होती. कुणा जज्जने, त्याच्या ड्रायक्लिनरला म्हणे ६५ मिलियन डॉलर्सला 'सु' केले होते(आता हा 'सु' म्हणजे लहान बाळाची 'सु' नसून 'खटला' या अर्थाने घ्यायचा बरं!). कारण काय म्हणे, तर कोटाबरोबर तो त्याची पँट द्यायला विसरला होता. आता बिना पँटीचा तो जज्ज कोट घालणार कसा!  कुठेतरी गहाळ झालेली पँट एकदाची शोधून आणून त्याने जज्जसाहेबांना दिली. पण जज्जसाहेबांच्या मते ती त्याची पँटच नव्हती. मग केलं 'सु' त्याला. अकराशे-बाराशे डॉलरच्या पँटसाठी, पासष्ट मिलियन डॉलरचा फ़ाईन! अहो, मग त्याने दुकानाबाहेर 'सॅटिसफॅक्शन गॅरंटिड' चा बोर्ड लावायचा कशाला? सॅटिसफॅक्शन नाही  ते नाही आणि वर मनस्ताप किती झाला त्या जज्जला! त्याच्याकडे त्या सुटाशिवाय आणखी पन्नास-साठ सुट होते; पण त्याला तोच सुट घालायचा होता हे त्या उद्दाम ड्रायक्लिनरला कळलं कसं नव्हतं?
सगळेच न्युज चॅनल त्या बातमीवर तुटून पडले होते.  “Is it a joke?”  ती गाडी चालवताना विचार करत होती. अमेरिकेत बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मग करण्याचं स्वातंत्र्य का असु नये? नाहीतरी कुणीही दहा-पंधरा वर्षांचा मुलगा बंदुक खरेदी करुन, शाळेतल्या निरपराध मुलांना मारतोच आहे ना? पण अमेरिकन लोक पूर्वांपार बंदुक वापरत आली आहेत. त्यांची  ही महान संस्कृती ते बदलणार कशी? आजकालची  मुलंच अशी बेबंद होत चाललीत त्याला ते तरी काय करणार?
              त्या दिवशी ऑफिसमधे गेल्यागेल्या ती  त्या सहकार्याकडे गेली. आणि त्याला रेडिओवरचा किस्सा सांगून, काल तो जे काही बोलला त्याच्यासाठी  'I can sue you. right?' अशी शांत आवाजात विचारणा केली. त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. एखादी बाजी मारल्यासारखी  ती त्याच्या क्युबिकल मधून बाहेर पडली. खरी अमेरिकन झाल्याचा आनंद तिच्या चेहर्यावर पसरला होता!
आणि एकदाची ती  वेळ आली होती.
                    अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला जेव्हा ती 'ओथ सेरिमनी' ला चालली होती, तेव्हा तिचा आनंद ओसंडून वहात होता. आता थोड्याच वेळात ती कायद्याने अमेरिकन होणार होती. तिथे आलेल्या शेकडो लोकांच्या चेहर्यावर आशेचे भाव बघून तिलाही समाधान वाटत होते. तिने शपथ घेतली, ' I hearby declare, on oath, that I absolutely and entirely renounce and adjure...' त्या वाक्यांचा अर्थ जाणवून  तिच्या पोटात गोळा आला. अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला, भारताचं नागरिकत्व सोडायची काय गरज आहे? नंतर अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरू झालं होतं. तिचे ओठ हलत होते, पण त्यात 'जन गन मन..' म्हणतानाची भावना नव्हती. दोन्ही  डोळ्यातून धारा लागल्या होत्या. शाळेत 'भारत माझा देश आहे' म्हणताना तिला कुठे माहित होतं की एकदिवस ती त्या देशाला सोडणार आहे! कुणी जन्म दिलेल्या आईला सोडू शकतं? आणि 'वन्दे मातरम' चे नारे देऊन लाखो लोकांच्या प्राणाहुतीने स्वतंत्र झालेल्या तिच्या देशाला तिने असेच सोडून दिले होते!
               समारंभानंतर बाकीचे लोक आनंदाने बेहोश होउन एकमेकांचे फोटो काढत होते. तिचं शरीर हुंदक्यांनी गदगदत होते आणि अश्रूंनी चिंब झालेला आपला चेहरा, तिनं नवर्याच्या कुशीत लपवला होता.

                                                                                        || समाप्त ||

४ टिप्पण्या: