बुधवार, ३० मार्च, २०११

पप्पांचे मोर!

मोरपिसांचा गुच्छ घेऊन तुम्ही आलात
मी अत्यानंदाने ओरडले
'पहाटे सहा वाजता यावे लागेल, तुलाही पाहायची असतील तर!' तुम्ही म्हणालात.
मग मोरांच्या झुंडी कशा आल्या,
आणि पिसारा फुलवून तुमच्यासमोर ते नाचू कसे लागले:
याच वर्णन तुम्ही केलंत.
'उद्या नक्कीच' पिसांकडे झेपावत मी म्हणाले.
हे कितीतरी दिवस चाललं
पण तो उद्या कधीच नाही उजाडला...
आणि आता तुम्हीच नाही राहिलात
मोर पाहायला घेऊन जायला.

त्यावेळी जर मी आले असते तर!
तुमच्यासोबत काही क्षण घालवले असते तर!
त्या अविस्मरणीय आठवणींना मुकल्याचे दु:ख
माझ्या इवल्याश्या शरीरात मावेनासे झाले
आता ते मोर मला पाहायचेच होते,
तो रस्ता मला तुडवायचाच होता.
ज्या मोरांना त्या डोळ्यांनी बेभान होऊन पहिले
त्या मोरांना माझ्या डोळ्यात कायमचे कोरून ठेवायचेच होते.
मग आम्ही निघालो.
संध्याकाळच्या सहा वाजता.
कुणी म्हणाले मोर तेव्हाही येतात.
सगळा ओढा पालथा घातला.
तुमच्यासारखाच मोरही आमच्यावर रुसून बसला होता.
मग दूरवर कुठेतरी मोराचा डौलदार तुरा दिसला
आणि आम्ही पळालो
काट्याकुट्यातून, चिखलातून.
सगळे बेभान होऊन.
मोर मोर..पप्पांचे मोर!
शरीरातला कण न कण गात होता.
वरून दिव्य संधिप्रकाश पाझरत होता.
सारा आसमंत आमच्याबरोबर जणू तेच म्हणत होता.
आणि अचानक तो मोर आमच्या डोळ्यासमोरच अदृश्य झाला.
तुमच्यासारखाच!
खूप रडू आलं.
मोर न पाहता जायचं जीवावर आलं.
पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत
हे नुकतंच कुठं शिकलो होतो.
रडत रडत परतीच्या वाटेवर लागलो होतो.
आणि त्याच वेळी आमच्या समोरून
डौलात एक मोर आणि मोरणी येत होती.
पप्पा, तुम्हीच तर ती पाठवली नव्हती?
पुनर्जन्मावर माझाही विश्वास बसलाय आता,
त्या मोरांना बघायला जायचं,
कधीच चुकवणार नाही मी आता.

गुरुवार, १० मार्च, २०११

फेसबुक

           गेल्या वर्षीची गोष्ट. फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी settings मध्ये काही बदल केला होता, त्याची बातमी रेडिओवर लागली होती. फेसबुक बघितले तर ऑर्कुट, माय स्पेस, ट्विटर सारख्या शेकडो सोशल नेटवर्किंग साईट मधली एक वेबसाईट; त्याच्या एवढ्या छोट्या बदलाची राष्ट्रीय बातमी झालेली पाहून मला आश्चर्य वाटले. म्हटलं बघूया अमेरिकेचं हे नवीन फॅड काय आहे ते!
           अकाउंट उघडल्यावर मला एखाद्या नवीन दुनियेत गेल्यासारखे वाटले. धबधब्याखाली उभं राहिल्यावर, चारी बाजूंनी पाण्याचे सपकारे बसावेत; तश्या चहूबाजूंनी मित्र-मैत्रिणींच्या requests आल्या होत्या. मला अगदी ओल्ड फ़ॅशन्ड असल्यासारखे वाटले. आमची एन्ट्री खूपच उशीरा झालेली दिसत होती. मग जुने हायस्कूल, कॉलेज मधले सखे सोबती, त्यांचे एकेकाळी नाक पुसणारे भाऊ बहीण, आयुष्यात कधीही संबंध न ठेवलेले पाहूणे अशा कितीतरी लोकांच्या मैत्रीच्या requests मी स्वीकारल्या. सुरुवात तर चांगली झाली होती. दररोज ऑफिसमध्ये गेल्यावर, प्रथम फेसबुक वर मी हजेरी लावू लागले. माझ्या मैत्रिणींचे 'आज खूप कंटाळा आलाय' किंवा मित्रांचे 'Sixty six चा पार्किंग लॉट झाला होता आज. वाट लागली माझी.' अशासारख्या वाक्यांनी माझी करमणूक झाली. भरपूर लोकांचे फोटो पाहायला मिळाले. माझेही काही जुने शाळेतले, दोन वेण्या घातलेले, बावरलेले फोटो लोकांनी लावले. फोटो एका क्षणात १००-२०० लोकांपर्यंत पोहचत होते मग का नाही लावायचे? यु ट्यूब वरचे share केलेले मजेदार व्हिडीओज पहिले. कोण कशाचा फॅन आहे ते कळलं. दोन तीन महिने खूप मजा आली. पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि पुढे काय असं वाटू लागलं. ट्विटर जेव्हा सुरु झाले होते, तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता. १४० शब्दात माणूस, लोकांनी फ़ॉलो करण्यासारखे काय लिहू शकतो? ब्लॉग ला फ़ॉलो करणं मी समजू शकते, पण एखाद्याची दैनंदिनी जाणण्यात काय मजा आहे? कविता वाचून पोट भरणार्या? मला, चारोळीवर पोट भरणे कठीण वाटत होते! असो.
           तर फेसबुकची सुरुवात कॉलेजच्या मुलांसाठी झाली. त्यांना फेसबुक वर भरपूर मित्र करता आले, अभ्यासक्रमाची, परीक्षांची महत्वाची माहिती मिळत गेली, नवीन गोष्टी कळत गेल्या. मग युनिव्हर्सिटींनी सुद्धा फेसबुकवर स्वतःची अकाउंट्स उघडली. आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला. पण कधी नव्हे तो होणारा हिमवर्षाव कौतुकाने पाहायला जावे, आणि पाहता पाहता त्याचे घोंघावणार्याा वादळात रुपांतर व्हावे; तसे काहीसे फेसबुकचे झाले. सगळ्यांनाच फेसबुकवर जायचे होते. हा हा म्हणता ५०० मिलिअन लोकांनी फेसबुकवर अकाउंट्स उघडली. त्यापाठोपाठ जाहिरातदार, नवीन अपायकारक applications, spammers यांनी ही आपलं ठाण मांडलं. लोकंही उभे आडवे कुणालाही मित्र करून घेत होते. एखाद्याचे ३०० मित्र खरंच असू शकतात का? आणि असले तरी, आपल्या मुलाबाळांचे फोटो share करण्याइतपत सगळ्यांशी घनदाट दोस्ती असू शकते का? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ३०० पैकी एक किंवा दोनच लोक वाईट मनोवृत्तीचे असतील तरी त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमची दैनंदिनी इंटरनेटवर टाकत असाल, तर एखाद्या चोराला तुम्ही सुट्टीवर असताना घर साफ करून जायला किती वेळ लागणार आहे? 'My poor boy is home alone' हे फेसबुकवर टाकलेलं एक वाक्य, तुमची अख्खी गोष्टच लोकांना सांगत नाही का?
          तरी बरं, फेसबुकवर काय लिहायचे आणि काय नाही हे आपल्या हातात आहे! पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार? फेसबुकची privacy policy खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एकदम पब्लिक होऊन जाते. नंतर privacy settings सापडेपर्यंत आणि कळेपर्यंत, फेसबुकच्या FarmVille सारख्या App नी तुमची माहिती अगोदरच जाहिरातदारांना विकली नसेल कशावरून? तसा आरोपही त्यांच्यावर झाला होता. आता परवाच फेसबुकने एक वादग्रस्त घोषणा केली. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लिहिलेला अभिप्राय, तुमचं मत, ते तुमच्या परवानगी शिवाय त्या गोष्टीची जाहिरात म्हणून प्रकाशित करणार आहेत. आता हे किती लोकांना आवडेल कुणास ठाऊक?
              समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर फेसबुकमुळे काय बदल झालाय? माणूस हा कळप करून राहणारा प्राणी, मग तो virtual का असेना! काही लोकांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याचा फायदा झाला असेल; तर त्यामुळे काही माणसे एककल्लीही बनू शकतात. पण त्याच्यामुळे लोकांना एकमेकांना भेटण्याची गरज कमी होईल असे मला तरी वाटत नाही. उलट सध्या जगातल्या घडामोडी पाहता, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून एक नवीन क्रांती घडून येत आहे. तरुण टुनिशियन, मोहम्मद बौझीझी ने पोलिसांच्या अत्याचाराने वैतागून आत्महत्या केली. त्याच्यामुळे पेटून जाऊन कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि ट्विटर वरून जनतेला उठावासाठी आवाहन केले आणि त्याचा शेवट टुनिशियाचं सरकार बरखास्त करण्यात झाला. 'The Indispensable Man', होस्नी मुबारक सारख्या इजिप्तच्या 'फेअरो' विरुद्ध लोकांनी फेसबुकद्वारे उठाव करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. सोशल नेटवर्किंग साईट्स मध्ये किती ताकद आहे आणि त्याचा उपयोग विधायक कामासाठीही कसा होऊ शकतो हेच त्याद्वारे सिद्ध झाले.
          वाईट वृत्तींवर, चांगल्या वृत्तींनी मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आपण होळी साजरी करतो. टुनिशिया आणि इजिप्त मधली बातमी वाचून मला वाटलं, की फेसबुकनेही नाही का नरसिंहासारखा अवतार घेऊन, पूर्वी कधीही न वापरलेल्या शस्त्राने, युक्तीने, आणि अवताराने वाईट वृत्तींचा नाश करायला मदत केली? जय हो फेसबुक!

शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

The Good and The Great!

            परवा मला माझ्या एका मित्राचा इमेल आला. त्याने लिहिले होते - "तुझे काय चाललेय? इकडे आम्ही ओबामा बरोबर वेळ घालवतोय." त्यावेळी मी ते हसून घालवले. पण नंतर मनात विचार आला. हा माझा मित्र सातार्‍यात राहणारा. अमेरिकेचा राष्ट्रपती, कुठेतरी दिल्लीत आलाय, तरीही हा त्याच्या भेटीत किती सहभागी आहे. भारतातल्या सगळ्यांना तसंच वाटत असेल यात मला शंका नव्हती. २००० मध्ये झालेल्या प्रेसिडेंट क्लिंटनच्या भेटीची मी साक्षीदार होते. म्हणजे मी क्लिंटनला भेटायला वगैरे गेले नव्हते (ना ही मला कुणी त्याना भेटायचे आमंत्रण दिले होते.); पण मलाही असंच वाटत होतं की जणू काही ते मलाच भेटायला आलेत. दररोज संध्याकाळी टीव्ही पुढे क्लिंटन फॅमिलीच्या प्रत्येक क्षणा न क्षणाची बातमी पाहायला मी आवर्जून बसत होते. घरात क्लिंटन, त्याची मुलगी चेलसी, तिचे कपडे, केस, रंग याच्यावर जोरदार चर्चा घडत होती. घरातच काय, सगळ्या गावातही तीच चर्चा सुरु होती. जणू काही क्लिंटन साहेब दिल्लीत नाही, तर आमच्या गावातच आलेत. एवढी उत्सुकता! एवढ कौतुक! असं काय या अध्यक्षांच्या बाबतीत आहे की सगळा देश उत्साहित व्हावा! मी विचारात पडले.
                दीडशे वर्षे गोर्‍या लोकांच्या वर्चस्वाखाली राहून, आपोआपच त्यांना खुश ठेवायची कला तर आपल्या अंगात भिनली नाही? गोरा साहेब आला, की सगळा कामधंदा सोडून, साहेबाच्या पुढेमागे करायची ही वृत्ती, आपली परंपरागत देन तर नव्हे! क्लिंटनच्या बाबतीत कदाचित ते खर तरी ठरू शकतं, पण ओबामाच्या बाबतीत तर ते ही खर नाही. मग असं वाटतं की गोर्‍या साहेबामुळे नव्हे, तर ते ज्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्या देशासाठी आपला सगळा देश वेडा होत असेल! पण तसं असेल तर, पाकिस्तानचे मुशर्रफ जेव्हा भारत भेटीला आले तेव्हा आपण त्यांचे एवढे स्वागत करायची काय गरज होती? विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यापाठीमागे एकच पटण्यासारखे कारण असू शकतं. "अतिथी देवो भव" ची आपली संस्कृती! आपल्या अंगावरचे कवच, हीच एकमेव शक्ती, अर्जुनाविरुद्ध युद्ध जिंकायला आपल्याजवळ उरली आहे, हे माहीत असतानाही, स्वतःच्या शरीराची त्वचा काढून देणार्‍या दानशूर कर्णासारखे आपले पूर्वज! दारात आलेल्या ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडायचा कसा म्हणून त्याचे तिसरे पाऊल झेलायला, आपलं मस्तक अर्पण करून पाताळात जाणारा बळी राजा! आणि द्धुतात आपले राज्य आणि बायकोही पणाला लावणार्‍या धर्मराजाचा शब्द मानणारे पांडव! आपली पुराणे या आणि अशाच गोष्टीनी भरलेली आहेत. आपले नशीब बलवत्तर म्हणून आपण लोकशाहीत जन्माला आलो. नाहीतर पाकिस्तानने, आपलं काश्मीर द्धुतात नाहीतर दानात नक्कीच जिंकलं असतं. तात्पर्य काय, की पाहुण्यांना भगवान मानून, त्यांना खुश कसे ठेवायचे, हे आपल्यापेक्षा जास्त कुणाला कळणार आहे?
                      मग आपण त्यांच्यासाठी काय करावे? पाहुण्यांना ताजमहाल पाहायचा असतो, गांधीजींच्या समाधीला भेट द्यायची असते, उद्योजकांना भेटायचे असते, शाळा-कॉलेजात जायचे असते. यासाठी लागणार्‍या संरक्षणासाठी करोडो रुपये खर्च होत असतील. ओबामा, क्लिंटन साठी आपण ताजमहाल आरामात एक दिवस बंद ठेवतो. अमेरिकेच्या अध्यक्षांना भारतात येऊन नाचायची भारी हौस! क्लिंटन आले, तेव्हा त्यांच्यासाठी, जयपूरच्या शेजारचे एक आख्खे गाव तयार ठेवले होते. गावातल्या बायका, ते येण्याआधी म्हणे तोंडावरचा पदरही काढायला तयार नव्हत्या. पण प्रेसिडेंट क्लिंटनने त्यांच्याबरोबर डान्स केल्यावर, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांची चढाओढ लागली होती. आता ओबामा दाम्पत्याने ही एका शाळेत जाऊन मुलांबरोबर कंबर हलवली होती. दोन्ही अमेरिकन अध्यक्षांच्या भेटीत प्रेक्षणीय स्थळे बघण्यापासून ते नाचण्यापर्यंत खूप साम्य होते. भारताच्या उज्ज्वल परंपरेचा, पाहुणचाराचा आणि प्रेमाचा त्यांनी पुरेपूर आस्वाद घेतला होता.
                      पण २००९ मधली पंतप्रधान मनमोहन सिंग यांची US भेट मला आठवली. CNN वर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी, स्टेट डिनर ला कुणाला आमंत्रित केले आहे आणि त्यांनी कोणत्या डिझायनरचा पोशाख घातला आहे, यावरच जास्त चर्चा चालली होती. टि व्हि वर ना मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमाची चर्चा होत होती, ना सिंग पतीपत्नींनी एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली होती आणि ना ही ते कुठल्यातरी बॉल मध्ये जाऊन नाचले होते. पण जर त्यांनी नायगर्‍याला किंवा लिंकन मेमोरिअल ला भेट दिली असती, तर अमेरिकेने तो बाकीच्या लोकांसाठी बंद ठेवला असता का? बातम्यांमध्ये त्याचा सविस्तर वृत्तांत दिला असता का? मला आपलं सहजच वाटलं. भारतीय पंतप्रधानांच्या भेटीने, अमेरिकन जनता कोणत्याही प्रकारे उत्साहित, उत्तेजित झाली नव्हती, याचे माझ्या भारतीय मनाला वाईट वाटणे साहजिकच होते. But then maybe that's the difference between the Great and the Good. पण तरीही मला वाटते की अमेरिकेने, ईकॉनॉमी सुधारण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचा सल्ला घेण्याबरोबरच काही पाहुणचाराचे धडेही घेण्यास हरकत नाही!'

शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०

रेड डायमंड

                                                       श्री
                 १५ जून १९९९, हा दिवस रामचंद्र काकडे अका रामभाऊ, त्याच्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. कुठल्यातरी दूरवरच्या देशातल्या माणसांच्या आयुष्यात अद्भुत घटना घडलेल्या त्याने वाचल्या होत्या. पण कधीतरी त्याच्याही आयुष्यात अस काही घडेल, हे त्याच्या स्वप्नातही आलं नव्हतं. तो त्या लाल दगडाकडे बघत होता. तो दगड आता त्याचे आयुष्य पालटवणार होता.
                कितीतरी पिढ्यापासून तो त्याच्या घरात होता. रामभाऊचा खापरपणजा, गणपत काकडे खूप गरिबीत दिवस काढत होता. राहायला पडायला आलेलं वडलोपार्जित जुनं घर होत, आणि ती दोघेही नवराबायको पाटलाच्या शेतात कामाला जायची. पाटलाची दोनशे एक एकर शेती कृष्णेच्या काठावर पसरली होती, आणि गावातली सुमारे नव्वद टक्के लोकं, त्याच्या शेतावर मजुरी करायला जायची. पण त्या सगळ्यांचं नशीब एवढ चांगलं कुठल! रामभाऊचा खापरपणजा, त्याच्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन, उन्हाळ्यात कृष्णेवर पोहायला जायचा. एक दिवस कृष्णेत आंघोळ करत असताना, त्या मुलाला एक लाल गारगोटीसारखा मुठीएवढा दगड दिसला. उन्हात चकाकला तो! त्यानं तो खेळायला म्हणून घरी आणला; आणि खेळून कुठेतरी फेकून दिला. त्यानंतर त्याच्या आईने 'विचित्र दगड दिसतोय' म्हणून देव्हाऱ्यात ठेऊन दिला. कधीतरी एकदा त्याच्यावर हळदीकुंकू पडलं आणि त्याचा देव झाला. देवघरात नित्यनेमाने त्याची पूजा होऊ लागली.
               पण त्यानंतर त्यांची परिस्थिती आकस्मितपणे सुधारली. गणपत काकडेची आत्या मेली. तिला मुलबाळ नव्हतं. मरताना तिने तिच्या नावावरची दोन एकर जमीन गणपत काकडेला भेट म्हणून दिली. हे त्या अनोख्या दगडामुळे घडलं असच सगळ्यांना वाटलं; आणि दगडावरची त्यांची श्रद्धा आणखीनच वाढली. मजुरी करायचं थांबवून गणपत काकडेनं स्वतःची जमीन कसायला सुरुवात केली. रामभाऊच्या वडिलांपर्यंत, त्या दोन एकराची वीस एकर जमीन झाली होती. रामभाऊ बी ए करून पासपोर्ट कार्यालयात कर्मचारी म्हणून लागला होता. गावी वडिलांबरोबर त्याचा धाकटा भाऊ शेती बघत होता. मागच्या वर्षी वडील वारल्यानंतर त्यांनी जमिनीची वाटणी केली, पण रामभाऊचा भाऊच सगळी शेती कसत होता. वर्षाला घराकडून नेहमीसारखं धनधान्य आलं तरी रामभाऊला पुरेसं होतं. परतताना त्याने देवघरातले काही देव आणले आणि तो लाल दगड! त्याच्या भावाने काही आक्षेप घेतला नाही. वीस एकर जमीन कसायला त्याने बरेचसे मजूर ठेवले होते; आणि गावात सरपंच बनून तो रुबाबदार वावरत होता. त्याला कसली त्या दगडाची पर्वा! तर असा तो दगड रामभाऊच्या घरात आला होता.
                 आज सकाळपर्यंत त्याला कसलीही कल्पना नव्हती. नेहमीसारखाच दिवस उजाडला होता. नेहमीसारखंच उरकून साडेनऊच्या दरम्यान कार्यालयात जाण्यासाठी निघायचा त्याचा बेत होता. तेवढ्यात नऊच्या सुमारास शेजारच्या शेखसाहेबांचा, साउथ आफ्रिकेत असणारा त्यांचा मोठा भाऊ त्यांना भेटायला आला. त्यांना बाहेरच्या कॉटवर बसवून, आत जाऊन ते चहा सांगून आले. दरवाजातून समोरचं देवघर स्पष्ट दिसत होते. आफ्रिकेतल्या गप्पा सांगता सांगता शेखासाहेबांच्या भावाचे तिकडे लक्ष गेले. देवघरात तो लाल दगड कसला? त्यांनी विचारले.
               'काही नाही. साधा दगड आहे. आमच्या घरात बऱ्याच पिढ्यात त्याला आम्ही पुजतोय.' थोड्याशा शरमेनेच रामभाऊने उत्तर दिले. त्यावर उठून तो आत गेला आणि तो दगड हातात घेऊन त्याने निरखून पाहिला. सगळेजणंच त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होते. एवढं काय हा निरखून पाहतोय?
              'मी हा थोड्या वेळासाठी घरी घेऊन जाऊ का? मला थोडं त्याचं निरीक्षण करायचंय' त्याने विनंती केली. नंतर चहासाठीही न थांबता तो शेजारच्या घरी गेला. तो गेल्यानंतर शेखसाहेब, रामभाऊ आणि रामभाऊची पत्नी यांच्यामध्ये चर्चा सुरु झाली. काय दिसलं त्याला त्या दगडात रामभाऊला कळेना.
'आफ्रिकेत तो डायमंड माईनमध्ये काम करतो' शेखसाहेबानी खुलासा केला.
'डायमंड!' रामभाऊची पत्नी उद्गारली.
'त्याला हिरा वाटला कि काय तो?' आश्चर्याने रामभाऊ बोलले.
'काय माहित? पण असला तर तुमच नशीब फळफळलं बघा.' हसत शेखसाहेब म्हणाले.' दोन तीन लाख रुपये तर आरामात मिळतील.'
'लाख रुपय?' आश्चर्याने तोंडावर हात मारत पत्नी म्हणाली. लाख काय पण कधी दहा हजार रुपये एकहाती बघायलाही तिला मिळाले नव्हते. लाखभर रुपये मिळाले तर त्यांच्या मुलाला एन्जिनिअरिन्गला पाठवायला मिळेल असं रामभाऊला वाटले. तो परत आला.
'काय झालं?' श्वास रोखून धरत रामभाऊने विचारलं. तो कसंनुसं हसला. एवढी मोठी बातमी रामभाऊला सांगावी कशी या चिंतेने कि हा दगड माझ्या देवघरात का नाही या निराशेने हे त्यालाच माहीत.
'रामभाऊ, हा काही साधा दगड नाही.' त्याने सुरुवात केली. रूममधल्या सगळ्यांनीच श्वास रोखून धरले होते. 'हा अतिशय दुर्मिळ असा लाल रंगाचा हिरा आहे.'
'वाटलंच मला.' एकदाचा श्वास सोडत, पत्नीने दोन्ही हातांनी टाळी वाजवली.
'तरी काय किमत असेल त्याची?' रामभाऊची वाचा बसलेली बघून शेखसाहेबानीच विचारले.
'ते मी लगेच सांगू शकत नाही. त्याचा अजून बराचसा अभ्यास करावा लागेल. त्याची क्लॅरिटी, वजन सगळं मोजावं लागेल. नंतर मग त्याची किंमत आपल्याला कळेल.' तो जे बोलत होता, ते रामभाऊच्या डोक्यावरून जात होते.
'पण तरी किती?' आपल्यापेक्षा, आपला शेजारी कितीने श्रीमंत होणार आहे; हे कळल्याशिवाय शेखासाहेबाना स्वस्थ बसवणार नव्हते. त्यांच्या भावाचे डोळे लकाकले.
'दोन लाख, दहा लाख. किती?' शेखासाहेबांना ते नुसते शब्द विचारून धाप लागली होती.
'त्याची लाखात नाही तर कितीतरी कोट्यात किमत होईल.' हसत त्यांचा भाऊ म्हणाला.
रामभाऊ पटकन कॉटवर बसले. त्यांची बायको: हात तोंडावर, डोळे विस्फारलेले; मागे सारून तिने भिंतीचा आधार घेतला. शेखसाहेबांना कुठून भावाला घेऊन आलो असे झाले. पण आता पुढे काय?
'मला ऑफिसमध्ये जायचंय' रामभाऊ म्हणाले. आता सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागले.
'आता तुम्हाला ऑफिसमध्ये जायची काय गरज?' वरवर हसत शेखसाहेब म्हणाले. 'बरं झालं मी भैयाला घेऊन आलो. नाहीतर तुम्हाला त्या हिऱ्याचा कधीच शोध लागला नसता.' तेवढ्यातल्या तेवढ्यात माझ्यामुळेच तुम्ही कोट्याधीश झालात हे त्यानं सुचवलं.
               दिवशी रजा टाकून ते ज्वेलरीवाल्याकडे गेले. त्याने तासभर तो दगड वेगवेगळ्या भिंगातून निरखून पाहिला. नंतर तो आत गेला. बाथरूम मध्ये जाऊन त्याने तोंडावर फसाफस पाणी मारले. तो जे पाहतोय त्याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. 'रेड डायमंड!' तो स्वतःशीच पुटपुटला. बाहेर हे दोघे चुळबुळत तसेच उभे होते. तो बाहेर आला. परत त्याने थोडं निरीक्षण केल्यासारखे केले आणि म्हणाला 'हा दगड हिरा आहे खरा. अतिशय दुर्मिळ असा हिरा. Red diamonds are very rare. या रफ हिऱ्याचं वजन २७९ कॅरेट भरतंय, पैलू पाडून झाल्यानंतर वजन थोडं कमी होईल. याची क्लॅरिटी ही खूपच चांगली आहे. खर सांगायचं झाल तर, आमचा हा ज्वेलरीचा धंदा पिढ्यानपिढ्याचा आहे तरी मला याची किंमत नाही करता येणार. असलं काही मी माझ्या आयुष्यात पहिलेलं नाही.' नंतर ते दोन तीन ज्वेलरीवाल्यांकडे गेले. सगळ्यांनी वेगवेगळ्या शब्दात तेच सांगितले.
                संध्याकाळी ते घरी आले. वाटेत भैया म्हणत होता कि तो हिरा दिल्लीला जेमॉलॉजि लॅब मध्ये पाठवावा म्हणून. जेमॉलॉजि लॅबची सगळी माहिती त्याने रामभाऊला दिली. पण पाठवणार कसा? घरी येऊन त्याने तो परत देवघरात ठेऊन दिला. दोघेही नवराबायको आपल्याला किती पैसे मिळणार, आणि त्या पैशाचं काय करायचं याचा विचार करत, झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहिले. सकाळ उजाडली. पहाटे पहाटे लागलेल्या झोपेतून कसंतरी उठत रामभाऊ बाथरूममध्ये गेले. पैसे मिळेपर्यंत नोकरी तर केलीच पाहिजे. तेवढ्यात दारावर टकटक झाली. दारात शेजारचे सूर्यवंशी साहेब सहपरिवार उपस्थित होते.
'काय रामभाऊ, बरेच आतल्या गाठीचे निघालात राव.' खी खी हसत ते आत आले.
'काय झालं?' भोळेपणाचा आव आणून रामभाऊने विचारले.
'एवढा दुर्मिळ हिरा तुमच्या घरात लपवून ठेवलात, आणि काय झालं म्हणून विचारता?' ते तडक स्वयंपाकघरात गेले. मग त्यांनी तो हिरा चाचपून पहिला. खिडकीत नेऊन उजेडात धरून पहिला. नंतर त्यांच्या बायकोने आणि मुलांनी तसेच केले.
'वा! दिसतो खरा खऱ्या डायमंड सारखा.' स्वतःची खात्री करून घेत ते म्हणाले.
'मग काय चहापाणी वगैरे? अजून माझा ब्रशही व्हायचा आहे.' औपचारिकता म्हणून रामभाऊने विचारले.
'नाही हो. आवराआवर करायची आहे.' म्हणत सूर्यवंशी साहेब चालते झाले.
त्यांना दारात सोडून ते मागे फिरणार तेवढ्यात खालच्या मजल्यावरचे जोशीकाका जिन्यातूनच ओरडले.
'रामभाऊ, काय नशीब घेऊन आलास रे! तुझ्या पूर्वजांची मात्र कमालच म्हंटली पाहिजे.' वर चढून येत ते म्हणाले.  परत हिरा दाखवण्याचा प्रोग्रॅम झाला. जोशीकाकानंतर त्यांच्या मजल्यावरचे पाटीलसाहेब, घोरपडेसाहेब; खालच्या मजल्यावरचे मुलाणी सर, कुलकर्णी साहेब, नाईटगार्ड, कचरा नेणारा राम्या अशा सगळ्यांनी हजेरी लावली. सगळ्यांनी तो हिरा हातात घेऊन पाहिला. सगळ्यांनी हिरा सापडल्याची गोष्ट विचारली. शेखसाहेबांनी बातमी चांगलीच पसरवलेली दिसत होती. पत्नीचा त्रागा चालला होता. 'असं कसं सगळ्यांना हात लाऊन देता तुम्ही? काही झालं तरी कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे ती!'
                  त्यादिवशी ऑफिसला जायला उशीरच झाला. जाताना ते बायकोला 'दार लाऊन घे. कुणी आलं तर उघडू नकोस.' अशा हजार सूचना देऊन गेले. ऑफिसमध्ये दिवसभर कामात त्याचं लक्ष लागत नव्हते. शेवटी काहीतरी कारण सांगून ते तासभर आधीच निघाले. घरी येऊन पाहतात तर खोलीत दोन गृहस्थ आधीच येऊन बसले होते. हे कोण आता? रामभाऊच्या कपाळावर आट्या पडल्या.
'नमस्कार! मी अतुल परांजपे. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पत्रकार आहे.' त्यातल्या एका इसमाने उठून आपली ओळख करून दिली. आयला वर्तमानपत्रापर्यंत बातमी गेली! या शेखसाहेबांना...त्याने मनातच अस्सल शिवी दिली.
'नमस्कार.' वरवर हसून रामभाऊ म्हणाला. 'तुम्हाला कसं कळलं?'
''मुलाणी सर आणि माझा भाऊ' शेजारच्या माणसाकडे बोट करत अतुल म्हणाला, 'एकाच शाळेत काम करतात.'
'असं असं.' मग पुन्हा तो हिरा निरखून झालं. तो त्यांच्या घरात कसा आला ही गोष्ट पुन्हा ऐकवावी लागली.
'Amazing! Amazing!' म्हणत ते निघून गेले.
                         दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर बातमी. '179 carat Red Diamond found in the City.' कुठे? आपल्या रामभाऊच्यात? शेजारपाजारचे कुजबुजले. १७९ कॅरेट वजनाचा? लोकांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. असा कुणाच्या घरात हिरा येतो काय? आणि तोही इतका दुर्मिळ! रामभाऊची असुरक्षिततेची भावना वाढली. कुठे ठेवावा हा हिरा? कुणी चोरला तर? पण एवढे लोक बघायला येतात, कुठे दडवूनही ठेवता येत नाही. पेपरात बातमी वाचून त्याचा धाकटा भाऊ, सह्पारीवारासह आला आणि आता आपण दोघे किती श्रीमंत होणार हे हजारदा बोलून 'यात माझाही वाट आहे' हे सूचित करत राहिला.
                      हिरा बघायला दारासमोर रांग लागली. रामभाऊच्या पासपोर्ट ओफिसातलेही सगळे येऊन गेले. त्याचे साहेब आता त्याच्याशी जास्त सलगीने वागू लागले. 'रामभाऊ आमचा दोस्तच हो! दहा वर्षांची ओळख म्हणजे जिगरी दोस्त म्हणायला हरकत नाही.' त्या जिगरी दोस्ताला त्यांना कधी घरी बोलवून चहा वगेरे पाजायला झाला नव्हता. पण त्या किरकोळ गोष्टी! बाकीची वर्तमानपत्रं सुद्धा जागी झाली. आणि रामभाऊच्या घरात दररोज इन्टरव्ह्यू होऊ लागले.
"कसा सापडला मग?"
"काय करणार त्याचं आता?"
"मी दिल्लीला जेमोलौजी इन्स्टिट्युटमध्ये घेऊन जाणार आहे. तिथं त्याचं पूर्णपणे परीक्षण होईल, आणि नंतर आम्ही त्याचं काय करायचं ते ठरवू". सगळ्या वर्तमानपत्रांना तो हेच उत्तर देत होता.
                     त्यानंतर रात्री एकदा कुणी तरी खिडकी फोडून आत यायचा प्रयत्न केला. रामभाऊच्या पहिलवान भावावरच त्यानं उडी घेतली, आणि चांगला मार खाऊन तो पळाला. त्या प्रसंगानंतर तर रामभाऊनी अजून धास्ती घेतली. शेवटी स्वतःच्या शिलकीतले पाच हजार रुपये काढून तो आणि त्यांचा भाऊ दिल्लीला गेले. दिल्लीच्या जेमोलोजी इन्स्टिट्युटमध्ये त्यांच्या येण्याची बातमी आधीच पोहचली होती. त्यांनी हिऱ्याचं पूर्ण निरीक्षण करून तो अतिशय दुर्मिळ हिरा असून त्याची किंमत कुणीही करू शकणार नाही असा निष्कर्ष काढला. प्रत्यक्ष कोहिनूर हिऱ्यापेक्षा दुर्मिळ आणि मुळत:च तेजस्वी असा हा हिरा होता. हिऱ्याच्या अस्खलितपणाचं सर्टिफ़िकेट देताना त्यांनी हेही सुचविलं की तो दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये ठेवल्यास देशाची शान वाढेल. रामभाऊच्या भावाला हसावं की रडावं कळेना. असा कोण मूर्ख आहे, जो तो हिरा असाच देऊन टाकेल?
'आपण परदेशात प्रयत्न करूया. कुणीतरी त्या हिऱ्याची किंमत आपल्याला देईलच.' तो म्हणाला.  येताना रेल्वेच्या प्रवासात एकदाही पापणी न मिटता, जीवाच्या कराराने तो हिरा त्यांनी घरी आणला. घरात तो कुठे ठेवावा याची चर्चा झाली. बँकेत ठेवायचाही विचार झाला, पण हल्ली बैकेवर कोण विश्वास ठेवतो? त्यापेक्षा तो घरीच, डोळ्यासमोर राहिलेला बरा असं सगळ्याचं मत पडलं. रामभाऊचा भाऊ, त्या हिऱ्याचं रक्षण करण्याकरता त्यांच्याकडेच तळ ठोकून राहिला. कुठूनतरी एका मंत्र्याची ओळख काढून, त्यानं त्याला हिरा विकत घेण्यासाठी फोरेनात कुणी भेटलं तर बघा. तुमचं कमिशनही तुम्हाला देऊन टाकू अस सांगितलं होत. आता फक्त वाट पाहायचं काम होत.
                 दररोज सकाळी ते दोघे भाऊ त्या हिऱ्यासाठी नवीन जागा शोधून काढू लागले. कधी कपाटात कपड्यांच्या घडीत, तर कधी पिठाच्या डब्यात. एकदा तर संडासातही, साबणासारखा तो ठेऊन दिला. आता संडासात कोण जाईल बघायला? पण तरीही ऑफिसमध्ये रामभाऊचे लक्ष लागेना. दररोज ऑफिसात जायला उशीर होऊ लागला, तिथे कामात हजार चुका होऊ लागल्या. त्याच्या नशिबाने, त्याचे साहेब त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करू लागले म्हणून बरं! काय थोडेच दिवस नोकरी करणार हा बेटा, कशाला उगाच त्रास द्या! अशी दयेची वृत्ती त्यांनी अंगिकारली होती. पण संध्याकाळी घरी जाताना, रामभाऊच्या मनात धाकधूक वाटू लागली. हिरा अजून तिथे असेल ना? कुणी चोरला तर नसेल? घरी आल्या आल्या, तो प्रथम हिरा जागेवर आहे का याची खात्री करून घेई. एकदा त्यांना सकाळी ठेवलेल्या जागी हिराच सापडेना. त्यांचा भाऊही सिगरेट आणायला खाली गेला होता. हिरा शोधण्यासाठी त्यांनी कपाटातली सगळी कपडे खाली फेकली, स्वयंपाकघरातले सगळे डबे खोलून पाहिलं; पिठाचा डब्बा तर खाली जमिनीवरच पालथा केला, बाथरूममधल्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे फेकल्या. पण हिरा कुठेच सापडेना. ओरडून आख्खं घर त्यांनी डोक्यावर घेतले. सिगारेट घेऊन परतलेल्या त्याच्या भावाला क्षणभर कळेनाच कि काय चाललय. सगळा प्रकार लक्षात आल्यावर, त्याने कॉटखाली शिरून आंब्याच्या परडीतून तो हिरा काढून दाखवला. तेव्हा कुठे रामभाऊला आठवले कि तिथेच त्याने हिरा ठेवला होता. त्याची स्वतःलाच लाज वाटली.
                     महिना झाला तरी मंत्र्याकडून काही कळेना. भारतातून एकही ऑफर आली नव्हती. त्यात दिल्लीच्या lab मधला एक माणूस त्यांच्याच शहरात रहायला आला होता. दर दोन दिवसाला त्याची घरी एक फेरी होऊ लागली. आणि त्या हिऱ्याचं महत्व तो दोघा भावांना पटवून देऊ लागला. कुणीतरी आयडिया दिली, कि हिरा फोडून त्याचे तुकडे करून विकले तर? रामभाऊच्या भावाला ती आयडिया एकदम पटली.
"आपण हिऱ्याचे दोन भाग करूया. एक भाग तुला आणि एक मला. मग मी बघतो काय करायचं माझ्या भागाचं ते" तो म्हणाला. चारपिढ्या, देवासारख पुजलेल्या त्या हिऱ्याचे तुकडे करणं, रामभाऊला पटेना. मग कडक शब्दात, "वाटणीत तो हिरा दगड समजुन तू मला देऊन टाकला होतास. तेव्हा कायद्यानं त्यात वाट मागायचा तुला काहीही अधिकार नाही. पण तरीही मी तुझा हक्क डावलत नाही. पण मी जो काही निर्णय घेईन तो तुला मान्य करावा लागेल". असं सांगून त्यानं त्याचं तोंड बंद करून टाकलं होत.
             आता निर्णय रामभाऊच्या हातात होता.
             त्याच्या भावाने त्या lab मधल्या माणसाला हिरा फोडण्याची गोष्ट सांगितली, तर त्याला चक्करच आली. "राष्ट्रीय संपत्ती आहे ती" त्वेषाने तो म्हणाला. दोन दिवसांनी हसत हसत मंत्र्याकडून त्याचा भाऊ बातमी घेऊन आला. "आठ मिलीयन डॉलर्स" ओरडून तो म्हणाला. रामभाऊही खुश झाला. त्याचं रुपयात रुपांतर करायला दोघांनाही जमेना. कुणीतरी सांगितलं की ते ३६ कोटीपर्यंत जातंय तर ऐकूनच त्यांना कसंनुस झालं. तो lab मधला माणूस पळत आला.
"अरे गाढवांनो, त्याची किंमत ८ मिलीयन नाही तर ४००-५०० मिलीयन तरी मिळायचा हवीय." रागानं तो म्हणाला. 'आत्तापर्यंत आपला देशातले सगळ्यात चांगले दागिने, हिरे, रत्नं परकीयांनी चोरली. आता हे हि तुम्ही त्यांना कवडीमोलाने विका.
'हे भोसडीच्या..' रामभाऊचा भाऊ गेन्ड्यासारखा त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांमधले भांडण आवरायला शेजारी पाजारी जमा झाले आणि त्यांनी भांडण अजून वाढवलं. त्या सगळ्या दंग्यातून रामभाऊ बाजूला झाला आणि कपाटातला हिरा खिशात टाकून बाहेर निघून गेला. त्याच्या डोक्यात वादळ घोंघावत होत, आपला कोहिनूर ब्रिटिशांनी गडप केल्याचा इतिहास त्याला माहीत होता. आणि हा हिरा तर त्यापेक्षा मोलाचा, असा कसा तो, तो देशाबाहेर जाऊन देईल? त्याच्यासाठी आता ती राष्ट्रभक्तीची गोष्ट झाली होती. त्यानं निर्णय घेऊन टाकला.
                  दुसऱ्या दिवशी तो ऑफिसातून आल्यावर, भाऊ आरडाओरडा करत होता. त्याच्या परस्पर तो हिरा रामभाऊन विकून टाकला असा त्याचा आरोप होता. यावर शांतपणे रामभाऊ म्हणाला, "विकला नाही, दिल्लीच्या म्युझियमला दान केला. आपल्या घराण्याचं नाव त्या हिऱ्याबरोबर तिथं कायमचं कोरलं जाईल". आणि त्यानं गादीवर अंग टाकलं. भाऊच्या शिव्या चालूच होत्या. पण बऱ्याच दिवसांनी रामभाऊला लगेचच शांत झोप लागली.





समाप्त

मंगळवार, २ मार्च, २०१०

श्री आणि गौरीचे किस्से - भाग 5

            आई बाबा निघून गेल्यावर तो विचारात पडला. टी व्ही वर नऊच्या बातम्या लागल्या होत्या. ऑफिसमधून आल्यापासून कपडेही त्याने बदलले नव्हते. दरवाजा आतून हिने बंद करून घेतला की काय? बेडरूमचा दरवाजा हाताने हलकासा ढकलून त्याने पाहिलं. तो उघडाच होता.
           गौरी बेडवर पडून स्फुंदत होती. श्रीचा तिला खुप राग येत होता. त्याने हे एवढ्या पुढे जाउन दिलेच कसे? एवढ्या हौसेनं मांडलेल्या संसारची झालेली ही दशा बघून तिला जाम रडू येत होतं. श्री आत आलेला तिला कळलं, तिने अजुनच मोठ्याने रडायला सुरुवात केली. तिच्याकडे पूर्ण दुर्लक्श करून श्रीने कपाटातून पायजामा काढला आणि तो बाथरूममधे गेला. तो बाहेर येइपर्यंत तिचे रडणे बरेच कमी झाले होते. तो तिला समजावण्याचं काही बोलेल म्हणून तिने रडण्याचा आवाज अजूनच कमी केला.
           "ठिक आहे, उद्याच कोर्टात जाउन घटस्फोट घेउया." दारात घुटमळत तो म्हणाला. तिच्या रडण्याचा भोंगा अजूनच वाढला.
           फ़्रिजमधून बीयर ची बाटली काढून तो परत टि व्ही समोर येउन बसला. सोनीवर रिषी कपूर चा पिक्चर लागला होता. उशी पाठीला लावून तो सोफ्यावर रेलून बसला. सुरुवातीचा काही काळ तो आतली चाहूल घेत होता, पण नंतर तो ही पिक्चरमधे रमला. बारा वाजता पिक्चर संपला तरी गौरी बाहेर आली नाही. आता त्याला सासरेबुवांच्या शक्कलेवर शंका यायला लागली होती. खरंच घटस्फोट द्यावा लागतोय की काय? त्याला चिंता वाटायला लागली.
            तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडून गौरी बाहेर आली, आणि हॉलमधे कोपर्‍यात ठेवलेल्या लग्नाच्या भेटवस्तू तिने उघडायला सुरुवात केली. टि व्ही वर परत बातम्या सुरु झाल्या होत्या. तो गंभीरपणे बातम्या बघण्याचं नाटक करत, डोळ्याच्या कोपर्‍यातून तिच्याकडे पहात होता. हुंदके देत ती प्रत्येक वस्तूवरचं नाव बघत, आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवत होती. काय करतेय ही? त्याला कळेना. शेवटी न राहवून त्याने विचारलेच.
"काय करतेस?"
"गिफ्ट्स सॉर्ट करतेय, दिसत नाही का?" दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या पूसत ती म्हणाली.
"आत्ता? रात्री बारा वाजता?" अचंब्याने त्याने विचारले.
"हो. माझ्या लोकांकडून आलेल्या गोष्टी बाजूला काढून ठेवतेय. म्हणजे उद्या वेळ नको व्हायला. घटस्फोट पाहिजे ना तुला!" रडत, नव्या कोर्‍या रोबवर नाक शिंकरत ती म्हणाली.
"मला पाहिजे?" सोफ्यावर उठून बसत तो अगदी किंचाळलाच.
"मग कुणाला? तुच तर मघाशी बेडरूममधे म्हणालास तसं!" गच्च भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहात ती म्हणाली.
"मी तसं म्हणालो कारण तु तसं आधी म्हणालीस म्हणून." चक्रावून तिच्याकडे पहात तो म्हणाला.
"मी तसं म्हणाले म्हणून तु ही थोडंच तसं म्हटलं पाहीजेस!" लटक्या रागानं तिने सॉर्टिंग चालू ठेवले.
आपण जिंकल्याची श्री ची आता खात्री पटली.जय हो ससूरजी! मनात त्याने सासर्‍यांना धन्यवाद दिले.
"म्हणजे तू घटस्फोट मागितलेला चालतो, आणि मी मागितलेला चालत नाही." हसत तिच्याजवळ येत तो म्हनाला.
"येस." ती म्हणाली. "मी आपली रागाने अशीच म्हणालेले. तू सीरियसली म्हणालास. कदाचीत हनिमूनमधेच माझा तूला कंटाळा यायला लागला असेल." कुठेतरी शून्यात बघत ती म्हणाली. त्याला भारी हसू आले. तिच्याजवळ जात त्याने तिचा चेहरा हातात घेतला. त्या छान मेक अप केलेल्या चेहर्‍याची आता वाट लागली होती. रडून रडून डोळे लाल झाले होते. शिंकरून शिंकरून नाक लाल झालं होतं. आणि डोळ्यातून दोन अश्रुंचे ओघळ अजुन वहात होते. त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला मिठीत घेत तो तिच्या कनात हळूच पुटपुटला,
"कशाचा कंटाळा यायला, त्याचा आधी भरपूर आस्वादतरी घ्यावा लागतो."
"You sexist!" त्याला जोराने ढकलून ती बेडरूममधे धावत गेली.


                                              समाप्त

रविवार, २७ डिसेंबर, २००९

श्री आणि गौरीचे किस्से - भाग ४

पण तिच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नव्हता.
"काय झाले?" बाबांनी त्याला विचारले.
"काही नाही. It was nothing actually." एक हात मानेवर घासत खाली बघत तो म्हणाला. बाबा तरी उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे पहात राहिले.
"मी चेष्टेत मुलींनी ऑफिसमधे काम न करता नुसते हसले तरी चालते असे म्हणालो, त्याचा तिला राग आलाय." एकदाचं त्याने बोलून टाकलं.
"त्याच्यात एव्हढे चिडण्यासारखे काय आहे?" बाबा आईकडे बघत म्हणाले.
"बाबा ताईला याच्यात भरपूर चिढण्यासारखे आहे. ती पक्की फ़ेमिनिस्ट आहे माहीत नाही का?"
"काय जिजू संसाराची चांगली सुरुवात केलीय तुम्ही." परत त्याच्या पाठीवर थाप मारत बबलू म्हणाला. हा मेहूणा सारखा पाठीवर थापा काय मारतोय त्याला कळेना.
"तु गप्प बस रे." आई बबलूवर ओरडली.
"ठिक आहे. होईल ती उद्यापर्यंत नीट." खुर्चीवरून उठत बाबा म्हणाले.
"चला आता. बराच उशीर झालाय." हे वाक्य त्यांच्या बायकोला उद्देशून होतं.
सांगावे की नाही या विचारात श्री घोटाळला. सांगून त्यांना हार्ट अटॅक तर येणार नाही ना!
"गोष्ट याच्याही पुढे गेलीय." हळूच तो म्हणाला.
"काय झाले?" पून्हा बसत बाबा म्हणाले.
"ती घटस्फोट हवाय म्हणतेय." श्रीने बाँम्ब टाकला. म्हणजे त्याला तरी तसं वाटले. तो सावधपणे त्या दोघांकडे बघू लागला.
"खरं की काय!" शांतपणे बाबा म्हणाले.
त्यांची प्रतिक्रिया ऐकून त्याला काय बोलावे ते कळेना. संसार सुरु व्हायच्या आधी त्यांची मुलगी घटस्फोट मागतेय याचं त्यांना काहीच वाटू नये? त्याला आश्चर्य वाटले. बबलू हसायला लागला.
"देउन टाक मग." बाबा जराही विचलीत न होता म्हणाले. हार्ट अटॅक यायची पाळी आता त्याची होती. आपल्या बायकोसारखं तिचं सगळं कुटुंबच विचित्र दिसतंय! आवाक होउन तो बाबांकडे पहायला लागला.
"असा बघू नकोस माझ्याकडे." हसत त्याच्या हातावर थोपटत ते म्हणाले. "खरचं सांगतोय मी."
"उद्याच घटस्फोट घ्यायला जाउया म्हणून सांग तिला, मग बघ काय होतेय ते!" हसत ते म्हणाले.
ओऽऽ आत्ता कुठे त्याला कळले!

                                                क्रमश:

रविवार, ११ ऑक्टोबर, २००९

श्री आणि गौरीचे किस्से - भाग 3

"Surprise!" दारात गौरीचे आई, बाबा आणि तिचा भाऊ बबलू हातात जेवणाचे डब्बे घेऊन उभे होते. त्यांचे अत्यानंदाने उजळलेले चेहरे पाहून त्याने आवंढा गिळला.
"या या" तो मोठ्याने म्हणाला. दारात आई बाबांना बघून गौरी दचकली.  
"आई बाबा, तुम्ही आज कसे" पटकन सोफ्यावरून उठत ती म्हणाली. 
"अगं हे यायला नकोच म्हणत होते. पण मीच म्हटल की काल तुम्हाला यायला एवढा उशीर झालेला, आणि आज ऑफिसमधून येऊन तू कधी स्वयंपाक करणार म्हणून म्हटलं जेवणच घेऊन जावे." नवर्‍याची नजर टाळत तिची आई स्वयंपाकघरात गेली.
"अगं ताई, जेवणाचे नुसते निमीत्त आहे. इथे यायला ती कारणच शोधत होती." बबलूने खुलासा केला.
"आम्ही पिझ्झा मागवणारच होतो." आईच्या मागे जात ती म्हणाली.
"पिझ्झा काय खाताय." म्हणत गौरीच्या आईने डबे उघडायला सुरुवात केली. तिच्या आवडीचे बासुंदी आणि पुरीचे जेवण होते. "पण निघताना फोन तरी करायचास?" त्रासिक आवाजात तिने तक्रार केली. 
"मी तेच म्हणत होतो आईला. तुमच्यात लुडबुड करायला कशाला जायचे म्हणून." बबलूने ओरडून तिला साथ दिली. 
"मग काय जीजू कसा काय झाला हनिमून?" सोफ्यावर श्रीच्या शेजारी बसत त्याच्या पाठीवर थाप मारून त्याने विचारले. 
"छान झाला."
"काय काय केले मग तिथे?" खी खी हसत त्याने विचारले.
"बबलु आता चावटपणा बस झाला तुझा." त्याचे वडील त्याच्यावर ओरडले.
"त्यात चावट्पणा कसला? मी आपला इनोसंटली विचारत होतो." चेहर्‍यावर निरागस भाव आणून तो म्हणाला.
"माहीत आहे मला तुझा इनोसंटपणा."
ताटे वाढली होती, म्हणून ते आत गेले. डायनिंग टेबलवर गौरीच्या शेजारी श्रीचे ताट आईने वाढले होते. तिच्याशेजारी श्री येऊन बसताच गौरी उठली. "बबल्या तू इथे बस रे." म्हणत बबलुला जागा करून देत ती बबलुच्या जागेवर जाऊन बसली. श्री चा चेहरा पडला. सासरच्यांपर्यंत ही गोष्ट जावू नये असं त्याला वाटत होते. पण आता त्याचा नाईलाज होता. बाबांनी काय झाले म्हणून आईकडे बघितले. त्यावर आईने नकारार्थी मान हलवत खांदे उडवले. सगळेजण मग शांतपणाने जेवायला लागले. 
"मग कोण कोणते बिचेस पाहिले तिथे?" शांततेचा भंग करत बाबांनी विचारले.
"सगळे! बिचेस बघण्याशिवाय दुसरे केले काय तिथे!" डब्यातली पुरी आपल्या ताटावर आपटत गौरी म्हणाली. गौरीच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून श्री उत्तरला.
"तीन चांगले बिचेस पाहिले. आणि क्रुजही घेतली एकदा."
"How Romantic! मस्त मजा आली असेल ना!" बासुंदीवर ताव मारत बबलु म्हणाला.  
"मग स्नॉर्क्लिन्ग करायला मिळाले का?" यावर श्रीचा घास घशात अडकला.
"झालं!" हवेत हात उडवत तो म्हणाला.
"काय झालं?"
"स्नॉर्क्लिन्ग करायची खुप हौस होती, पण काही लोकांना बीचवर लोळण्यातून वेळ मिळाला तर ना!" श्रीकडे एकदाही न पहाता, जणू ती दुसर्‍याच कुणाबद्दल तरी बोलतेय अशा अविर्भावाने गौरी म्हणाली.
"ओह!" आत्ता बबलूची ट्युब पेटली.
"मग cruise कोणती घेतली?" विषय बदलण्याच्या हेतूने तो म्हणाला पण गौरी काही तो विषय सोडायला तयार नव्हती.
"आमच्या हॉटेलमधल्या सगळ्यांनी स्नॉर्क्लिन्ग केले. आम्ही सोडून!"
"मला तुला स्नॉर्क्लिन्ग ला न्यायला काही प्रॉब्लेम नव्हता. पण तुला त्यांनी घेतले असते तर ना!"
"का नसते घेतले त्यांनी तिला?" आईने कुतुहलाने विचारले.
"तिला पोहायला कुठे येते?" श्री वैतागून म्हणाला. बबलू लागला हसायला.
"पोहायचं कारण देऊ नकोस. हॉटेलमधली ती बाई गेली, तिलाही थोडं थोडंच पोहायला येत होते."
"पण तुला तेवढेही येत नाही." हसत श्री म्हणाला. बबलूनेही त्याला साथ दिली. तिच्या रागाचा पारा चढला. 
"बरं झालं मी गेले नाही ते. नाहीतर तुझ्यासारख्या sexist माणसाबरोबर जाऊन मला आजन्म पश्चाताप झाला असता." रागाने ताटात हात धूवून, पाय आपटत ती किचनबाहेर गेली. ती गेल्यानंतर ते तिघेही आवाक होऊन श्रीकडे बघायला लागले. काय झाले हिला?
"कधी या पोरीचा पोरकटपणा जाणार कुणास ठाऊक!" हताश स्वरात बाबा म्हणाले.
"जीजु best of luck आमच्या ताईबरोबर!" पून्हा त्याच्या पाठीवर थोपटत बबलू म्हणाला. विचारावे की नाही या विवंचनेत असणार्‍या गौरीच्या आईने शेवटी विचारलेच.
"Sexist म्हणजे काय हो?"

क्रमश: