मंगळवार, २ मार्च, २०१०

श्री आणि गौरीचे किस्से - भाग 5

            आई बाबा निघून गेल्यावर तो विचारात पडला. टी व्ही वर नऊच्या बातम्या लागल्या होत्या. ऑफिसमधून आल्यापासून कपडेही त्याने बदलले नव्हते. दरवाजा आतून हिने बंद करून घेतला की काय? बेडरूमचा दरवाजा हाताने हलकासा ढकलून त्याने पाहिलं. तो उघडाच होता.
           गौरी बेडवर पडून स्फुंदत होती. श्रीचा तिला खुप राग येत होता. त्याने हे एवढ्या पुढे जाउन दिलेच कसे? एवढ्या हौसेनं मांडलेल्या संसारची झालेली ही दशा बघून तिला जाम रडू येत होतं. श्री आत आलेला तिला कळलं, तिने अजुनच मोठ्याने रडायला सुरुवात केली. तिच्याकडे पूर्ण दुर्लक्श करून श्रीने कपाटातून पायजामा काढला आणि तो बाथरूममधे गेला. तो बाहेर येइपर्यंत तिचे रडणे बरेच कमी झाले होते. तो तिला समजावण्याचं काही बोलेल म्हणून तिने रडण्याचा आवाज अजूनच कमी केला.
           "ठिक आहे, उद्याच कोर्टात जाउन घटस्फोट घेउया." दारात घुटमळत तो म्हणाला. तिच्या रडण्याचा भोंगा अजूनच वाढला.
           फ़्रिजमधून बीयर ची बाटली काढून तो परत टि व्ही समोर येउन बसला. सोनीवर रिषी कपूर चा पिक्चर लागला होता. उशी पाठीला लावून तो सोफ्यावर रेलून बसला. सुरुवातीचा काही काळ तो आतली चाहूल घेत होता, पण नंतर तो ही पिक्चरमधे रमला. बारा वाजता पिक्चर संपला तरी गौरी बाहेर आली नाही. आता त्याला सासरेबुवांच्या शक्कलेवर शंका यायला लागली होती. खरंच घटस्फोट द्यावा लागतोय की काय? त्याला चिंता वाटायला लागली.
            तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडून गौरी बाहेर आली, आणि हॉलमधे कोपर्‍यात ठेवलेल्या लग्नाच्या भेटवस्तू तिने उघडायला सुरुवात केली. टि व्ही वर परत बातम्या सुरु झाल्या होत्या. तो गंभीरपणे बातम्या बघण्याचं नाटक करत, डोळ्याच्या कोपर्‍यातून तिच्याकडे पहात होता. हुंदके देत ती प्रत्येक वस्तूवरचं नाव बघत, आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवत होती. काय करतेय ही? त्याला कळेना. शेवटी न राहवून त्याने विचारलेच.
"काय करतेस?"
"गिफ्ट्स सॉर्ट करतेय, दिसत नाही का?" दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या पूसत ती म्हणाली.
"आत्ता? रात्री बारा वाजता?" अचंब्याने त्याने विचारले.
"हो. माझ्या लोकांकडून आलेल्या गोष्टी बाजूला काढून ठेवतेय. म्हणजे उद्या वेळ नको व्हायला. घटस्फोट पाहिजे ना तुला!" रडत, नव्या कोर्‍या रोबवर नाक शिंकरत ती म्हणाली.
"मला पाहिजे?" सोफ्यावर उठून बसत तो अगदी किंचाळलाच.
"मग कुणाला? तुच तर मघाशी बेडरूममधे म्हणालास तसं!" गच्च भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहात ती म्हणाली.
"मी तसं म्हणालो कारण तु तसं आधी म्हणालीस म्हणून." चक्रावून तिच्याकडे पहात तो म्हणाला.
"मी तसं म्हणाले म्हणून तु ही थोडंच तसं म्हटलं पाहीजेस!" लटक्या रागानं तिने सॉर्टिंग चालू ठेवले.
आपण जिंकल्याची श्री ची आता खात्री पटली.जय हो ससूरजी! मनात त्याने सासर्‍यांना धन्यवाद दिले.
"म्हणजे तू घटस्फोट मागितलेला चालतो, आणि मी मागितलेला चालत नाही." हसत तिच्याजवळ येत तो म्हनाला.
"येस." ती म्हणाली. "मी आपली रागाने अशीच म्हणालेले. तू सीरियसली म्हणालास. कदाचीत हनिमूनमधेच माझा तूला कंटाळा यायला लागला असेल." कुठेतरी शून्यात बघत ती म्हणाली. त्याला भारी हसू आले. तिच्याजवळ जात त्याने तिचा चेहरा हातात घेतला. त्या छान मेक अप केलेल्या चेहर्‍याची आता वाट लागली होती. रडून रडून डोळे लाल झाले होते. शिंकरून शिंकरून नाक लाल झालं होतं. आणि डोळ्यातून दोन अश्रुंचे ओघळ अजुन वहात होते. त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला मिठीत घेत तो तिच्या कनात हळूच पुटपुटला,
"कशाचा कंटाळा यायला, त्याचा आधी भरपूर आस्वादतरी घ्यावा लागतो."
"You sexist!" त्याला जोराने ढकलून ती बेडरूममधे धावत गेली.


                                              समाप्त

७ टिप्पण्या:

 1. माफक दुरुस्ती, Sexist म्हणजे लिंगभेद करणारा/री. श्रीच्या वरच्या वाक्यात तसे काही जाणवले नाही.

  उत्तर द्याहटवा
 2. साधक,

  तुमचे बरोबर आहे. लिंगभेद म्हणजे एखाद्या लिंगाला कनिष्ट किंवा वरिष्ट समजणे. "गौरीचा आस्वाद घ्यायचा आहे" आणि "नंतर त्याला त्याचा कंटाळा येऊन तो तिला सोडूही शकतो" या दोन वाक्यांमधे तो तिला एखादी वस्तू मानून कनिष्ट समजत नाही का? अर्थात कथेत हे वाक्य विनोदाने म्हटले आहे. आणि त्यावरचं गौरीचं उत्तरही मजेतच घ्यायच आहे.

  धन्यवाद,
  रुपाली

  उत्तर द्याहटवा
 3. Mast aahe post. Mala tumacha blog aavadala...akkhaa vachla....good work.
  lihit raha...

  उत्तर द्याहटवा
 4. खूप दिवसानी?..मस्त झालीय पोस्ट

  उत्तर द्याहटवा
 5. खूपच चांगली मालिका आणि शेवट तर एकदम झकास. खूपच छान. असे वाटले कि हे सगळे आपल्या घरात चालले आहे किवा हि आपलीच गोष्ट आहे.

  खूप वर्षा पूर्वी radio वर रविवारी सकाळी श्रुतिका असे, ती आठवली.

  रूपा, please please अशी मालिका चालू ठेव. चल, लवकरच नवी मालिका चालू करशील, हि request .

  उत्तर द्याहटवा