गेल्या वर्षीची गोष्ट. फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी settings मध्ये काही बदल केला होता, त्याची बातमी रेडिओवर लागली होती. फेसबुक बघितले तर ऑर्कुट, माय स्पेस, ट्विटर सारख्या शेकडो सोशल नेटवर्किंग साईट मधली एक वेबसाईट; त्याच्या एवढ्या छोट्या बदलाची राष्ट्रीय बातमी झालेली पाहून मला आश्चर्य वाटले. म्हटलं बघूया अमेरिकेचं हे नवीन फॅड काय आहे ते!
अकाउंट उघडल्यावर मला एखाद्या नवीन दुनियेत गेल्यासारखे वाटले. धबधब्याखाली उभं राहिल्यावर, चारी बाजूंनी पाण्याचे सपकारे बसावेत; तश्या चहूबाजूंनी मित्र-मैत्रिणींच्या requests आल्या होत्या. मला अगदी ओल्ड फ़ॅशन्ड असल्यासारखे वाटले. आमची एन्ट्री खूपच उशीरा झालेली दिसत होती. मग जुने हायस्कूल, कॉलेज मधले सखे सोबती, त्यांचे एकेकाळी नाक पुसणारे भाऊ बहीण, आयुष्यात कधीही संबंध न ठेवलेले पाहूणे अशा कितीतरी लोकांच्या मैत्रीच्या requests मी स्वीकारल्या. सुरुवात तर चांगली झाली होती. दररोज ऑफिसमध्ये गेल्यावर, प्रथम फेसबुक वर मी हजेरी लावू लागले. माझ्या मैत्रिणींचे 'आज खूप कंटाळा आलाय' किंवा मित्रांचे 'Sixty six चा पार्किंग लॉट झाला होता आज. वाट लागली माझी.' अशासारख्या वाक्यांनी माझी करमणूक झाली. भरपूर लोकांचे फोटो पाहायला मिळाले. माझेही काही जुने शाळेतले, दोन वेण्या घातलेले, बावरलेले फोटो लोकांनी लावले. फोटो एका क्षणात १००-२०० लोकांपर्यंत पोहचत होते मग का नाही लावायचे? यु ट्यूब वरचे share केलेले मजेदार व्हिडीओज पहिले. कोण कशाचा फॅन आहे ते कळलं. दोन तीन महिने खूप मजा आली. पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि पुढे काय असं वाटू लागलं. ट्विटर जेव्हा सुरु झाले होते, तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता. १४० शब्दात माणूस, लोकांनी फ़ॉलो करण्यासारखे काय लिहू शकतो? ब्लॉग ला फ़ॉलो करणं मी समजू शकते, पण एखाद्याची दैनंदिनी जाणण्यात काय मजा आहे? कविता वाचून पोट भरणार्या? मला, चारोळीवर पोट भरणे कठीण वाटत होते! असो.
तर फेसबुकची सुरुवात कॉलेजच्या मुलांसाठी झाली. त्यांना फेसबुक वर भरपूर मित्र करता आले, अभ्यासक्रमाची, परीक्षांची महत्वाची माहिती मिळत गेली, नवीन गोष्टी कळत गेल्या. मग युनिव्हर्सिटींनी सुद्धा फेसबुकवर स्वतःची अकाउंट्स उघडली. आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला. पण कधी नव्हे तो होणारा हिमवर्षाव कौतुकाने पाहायला जावे, आणि पाहता पाहता त्याचे घोंघावणार्याा वादळात रुपांतर व्हावे; तसे काहीसे फेसबुकचे झाले. सगळ्यांनाच फेसबुकवर जायचे होते. हा हा म्हणता ५०० मिलिअन लोकांनी फेसबुकवर अकाउंट्स उघडली. त्यापाठोपाठ जाहिरातदार, नवीन अपायकारक applications, spammers यांनी ही आपलं ठाण मांडलं. लोकंही उभे आडवे कुणालाही मित्र करून घेत होते. एखाद्याचे ३०० मित्र खरंच असू शकतात का? आणि असले तरी, आपल्या मुलाबाळांचे फोटो share करण्याइतपत सगळ्यांशी घनदाट दोस्ती असू शकते का? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ३०० पैकी एक किंवा दोनच लोक वाईट मनोवृत्तीचे असतील तरी त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमची दैनंदिनी इंटरनेटवर टाकत असाल, तर एखाद्या चोराला तुम्ही सुट्टीवर असताना घर साफ करून जायला किती वेळ लागणार आहे? 'My poor boy is home alone' हे फेसबुकवर टाकलेलं एक वाक्य, तुमची अख्खी गोष्टच लोकांना सांगत नाही का?
तरी बरं, फेसबुकवर काय लिहायचे आणि काय नाही हे आपल्या हातात आहे! पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार? फेसबुकची privacy policy खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एकदम पब्लिक होऊन जाते. नंतर privacy settings सापडेपर्यंत आणि कळेपर्यंत, फेसबुकच्या FarmVille सारख्या App नी तुमची माहिती अगोदरच जाहिरातदारांना विकली नसेल कशावरून? तसा आरोपही त्यांच्यावर झाला होता. आता परवाच फेसबुकने एक वादग्रस्त घोषणा केली. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लिहिलेला अभिप्राय, तुमचं मत, ते तुमच्या परवानगी शिवाय त्या गोष्टीची जाहिरात म्हणून प्रकाशित करणार आहेत. आता हे किती लोकांना आवडेल कुणास ठाऊक?
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर फेसबुकमुळे काय बदल झालाय? माणूस हा कळप करून राहणारा प्राणी, मग तो virtual का असेना! काही लोकांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याचा फायदा झाला असेल; तर त्यामुळे काही माणसे एककल्लीही बनू शकतात. पण त्याच्यामुळे लोकांना एकमेकांना भेटण्याची गरज कमी होईल असे मला तरी वाटत नाही. उलट सध्या जगातल्या घडामोडी पाहता, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून एक नवीन क्रांती घडून येत आहे. तरुण टुनिशियन, मोहम्मद बौझीझी ने पोलिसांच्या अत्याचाराने वैतागून आत्महत्या केली. त्याच्यामुळे पेटून जाऊन कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि ट्विटर वरून जनतेला उठावासाठी आवाहन केले आणि त्याचा शेवट टुनिशियाचं सरकार बरखास्त करण्यात झाला. 'The Indispensable Man', होस्नी मुबारक सारख्या इजिप्तच्या 'फेअरो' विरुद्ध लोकांनी फेसबुकद्वारे उठाव करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. सोशल नेटवर्किंग साईट्स मध्ये किती ताकद आहे आणि त्याचा उपयोग विधायक कामासाठीही कसा होऊ शकतो हेच त्याद्वारे सिद्ध झाले.
वाईट वृत्तींवर, चांगल्या वृत्तींनी मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आपण होळी साजरी करतो. टुनिशिया आणि इजिप्त मधली बातमी वाचून मला वाटलं, की फेसबुकनेही नाही का नरसिंहासारखा अवतार घेऊन, पूर्वी कधीही न वापरलेल्या शस्त्राने, युक्तीने, आणि अवताराने वाईट वृत्तींचा नाश करायला मदत केली? जय हो फेसबुक!
फेसबुकमुळे लोकांचा उठाव झाला असे नसून फक्त दडपून ठेवलेला टोळ्यांमधील वैरभाव उघड्यावर आला आहे.
उत्तर द्याहटवा