परवा मला माझ्या एका मित्राचा इमेल आला. त्याने लिहिले होते - "तुझे काय चाललेय? इकडे आम्ही ओबामा बरोबर वेळ घालवतोय." त्यावेळी मी ते हसून घालवले. पण नंतर मनात विचार आला. हा माझा मित्र सातार्यात राहणारा. अमेरिकेचा राष्ट्रपती, कुठेतरी दिल्लीत आलाय, तरीही हा त्याच्या भेटीत किती सहभागी आहे. भारतातल्या सगळ्यांना तसंच वाटत असेल यात मला शंका नव्हती. २००० मध्ये झालेल्या प्रेसिडेंट क्लिंटनच्या भेटीची मी साक्षीदार होते. म्हणजे मी क्लिंटनला भेटायला वगैरे गेले नव्हते (ना ही मला कुणी त्याना भेटायचे आमंत्रण दिले होते.); पण मलाही असंच वाटत होतं की जणू काही ते मलाच भेटायला आलेत. दररोज संध्याकाळी टीव्ही पुढे क्लिंटन फॅमिलीच्या प्रत्येक क्षणा न क्षणाची बातमी पाहायला मी आवर्जून बसत होते. घरात क्लिंटन, त्याची मुलगी चेलसी, तिचे कपडे, केस, रंग याच्यावर जोरदार चर्चा घडत होती. घरातच काय, सगळ्या गावातही तीच चर्चा सुरु होती. जणू काही क्लिंटन साहेब दिल्लीत नाही, तर आमच्या गावातच आलेत. एवढी उत्सुकता! एवढ कौतुक! असं काय या अध्यक्षांच्या बाबतीत आहे की सगळा देश उत्साहित व्हावा! मी विचारात पडले.
दीडशे वर्षे गोर्या लोकांच्या वर्चस्वाखाली राहून, आपोआपच त्यांना खुश ठेवायची कला तर आपल्या अंगात भिनली नाही? गोरा साहेब आला, की सगळा कामधंदा सोडून, साहेबाच्या पुढेमागे करायची ही वृत्ती, आपली परंपरागत देन तर नव्हे! क्लिंटनच्या बाबतीत कदाचित ते खर तरी ठरू शकतं, पण ओबामाच्या बाबतीत तर ते ही खर नाही. मग असं वाटतं की गोर्या साहेबामुळे नव्हे, तर ते ज्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्या देशासाठी आपला सगळा देश वेडा होत असेल! पण तसं असेल तर, पाकिस्तानचे मुशर्रफ जेव्हा भारत भेटीला आले तेव्हा आपण त्यांचे एवढे स्वागत करायची काय गरज होती? विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यापाठीमागे एकच पटण्यासारखे कारण असू शकतं. "अतिथी देवो भव" ची आपली संस्कृती! आपल्या अंगावरचे कवच, हीच एकमेव शक्ती, अर्जुनाविरुद्ध युद्ध जिंकायला आपल्याजवळ उरली आहे, हे माहीत असतानाही, स्वतःच्या शरीराची त्वचा काढून देणार्या दानशूर कर्णासारखे आपले पूर्वज! दारात आलेल्या ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडायचा कसा म्हणून त्याचे तिसरे पाऊल झेलायला, आपलं मस्तक अर्पण करून पाताळात जाणारा बळी राजा! आणि द्धुतात आपले राज्य आणि बायकोही पणाला लावणार्या धर्मराजाचा शब्द मानणारे पांडव! आपली पुराणे या आणि अशाच गोष्टीनी भरलेली आहेत. आपले नशीब बलवत्तर म्हणून आपण लोकशाहीत जन्माला आलो. नाहीतर पाकिस्तानने, आपलं काश्मीर द्धुतात नाहीतर दानात नक्कीच जिंकलं असतं. तात्पर्य काय, की पाहुण्यांना भगवान मानून, त्यांना खुश कसे ठेवायचे, हे आपल्यापेक्षा जास्त कुणाला कळणार आहे?
मग आपण त्यांच्यासाठी काय करावे? पाहुण्यांना ताजमहाल पाहायचा असतो, गांधीजींच्या समाधीला भेट द्यायची असते, उद्योजकांना भेटायचे असते, शाळा-कॉलेजात जायचे असते. यासाठी लागणार्या संरक्षणासाठी करोडो रुपये खर्च होत असतील. ओबामा, क्लिंटन साठी आपण ताजमहाल आरामात एक दिवस बंद ठेवतो. अमेरिकेच्या अध्यक्षांना भारतात येऊन नाचायची भारी हौस! क्लिंटन आले, तेव्हा त्यांच्यासाठी, जयपूरच्या शेजारचे एक आख्खे गाव तयार ठेवले होते. गावातल्या बायका, ते येण्याआधी म्हणे तोंडावरचा पदरही काढायला तयार नव्हत्या. पण प्रेसिडेंट क्लिंटनने त्यांच्याबरोबर डान्स केल्यावर, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांची चढाओढ लागली होती. आता ओबामा दाम्पत्याने ही एका शाळेत जाऊन मुलांबरोबर कंबर हलवली होती. दोन्ही अमेरिकन अध्यक्षांच्या भेटीत प्रेक्षणीय स्थळे बघण्यापासून ते नाचण्यापर्यंत खूप साम्य होते. भारताच्या उज्ज्वल परंपरेचा, पाहुणचाराचा आणि प्रेमाचा त्यांनी पुरेपूर आस्वाद घेतला होता.
पण २००९ मधली पंतप्रधान मनमोहन सिंग यांची US भेट मला आठवली. CNN वर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी, स्टेट डिनर ला कुणाला आमंत्रित केले आहे आणि त्यांनी कोणत्या डिझायनरचा पोशाख घातला आहे, यावरच जास्त चर्चा चालली होती. टि व्हि वर ना मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमाची चर्चा होत होती, ना सिंग पतीपत्नींनी एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली होती आणि ना ही ते कुठल्यातरी बॉल मध्ये जाऊन नाचले होते. पण जर त्यांनी नायगर्याला किंवा लिंकन मेमोरिअल ला भेट दिली असती, तर अमेरिकेने तो बाकीच्या लोकांसाठी बंद ठेवला असता का? बातम्यांमध्ये त्याचा सविस्तर वृत्तांत दिला असता का? मला आपलं सहजच वाटलं. भारतीय पंतप्रधानांच्या भेटीने, अमेरिकन जनता कोणत्याही प्रकारे उत्साहित, उत्तेजित झाली नव्हती, याचे माझ्या भारतीय मनाला वाईट वाटणे साहजिकच होते. But then maybe that's the difference between the Great and the Good. पण तरीही मला वाटते की अमेरिकेने, ईकॉनॉमी सुधारण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचा सल्ला घेण्याबरोबरच काही पाहुणचाराचे धडेही घेण्यास हरकत नाही!'
१००% पटले...आपल्या पंतप्रधानांचे एवढे स्वागत कोणीच करत नाहीत...आपल्यालाच भारी हौस..हून जीन्तावो येओ नाही तर ओबामा.......बजाज,अंबानी ते मंन्त्र्या संत्र्यांना सर्वाना आपले काम सोडून त्यांच्या मागे धावायची हुक्की येते..कधीतरी आपले अतिथी देवो: भव हे जरा अतीच होते!!
उत्तर द्याहटवा