शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

मुलाखत - उमेश कुलकर्णी



 वळू, विहीर सारखे चित्रपट निर्माण करून मराठी सिनेमाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणारे मराठीतले एक उभरते दिग्दर्शक, उमेश कुलकर्णी. त्यांची चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि त्यातून घडणारे आत्मनिरीक्षण. या सगळ्याबद्दल, आमच्या मराठी मंडळाच्या हितगुज दिवाळी अंकासाठी, फोनवर त्यांच्याशी साधलेला संवाद.

दिग्दर्शक होण्याचा विचार सर्वात प्रथम कधी मनात आला?
शाळा कॉलेज मध्ये मला अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट होता. नाटक, कोरीयाग्राफी, आर्किटेक्चर, गणित यामध्ये काहीतरी करायचे होते. हे सगळे करत असताना, मराठीतले महत्वाचे दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांनी मला त्यांच्या 'दोघी' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बोलावले. त्या चित्रपटाच्या प्रोसेस मध्ये मी शेवटपर्यंत इनव्हॉल्व होतो. त्यानंतर काही documentaries वर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तो सगळा अनुभव खूप challenging वाटला. चित्रपट ही किती अवघड गोष्ट आहे आणि त्यात संगीत, कोरीयाग्राफी, भाषा या सगळ्यांच्या मिश्रणातून काहीतरी अद्भुत निर्माण होतंय असं वाटलं. त्यानंतर CA, LAW करायचे सोडून, सुखटणकरांनी सुचविल्याप्रमाणे मी FTII मध्ये अॅडमिशन घेतली. तिथे जगभरातले महत्वाचे दिग्दर्शक कळाले, त्यांच्या फिल्म्स पाहता आल्या, त्यांनी या माध्यमाचा कशा प्रकारे उपयोग करून घेतला या गोष्टी शिकता आल्या. काही स्वत:च्या गोष्टीही करता आल्या. त्यात असं लक्षात आलं की आपण जे करू पाहतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय. मग त्यानंतर आमची स्वतःची निर्मिती असलेला 'वळू' चित्रपट आम्ही निर्माण केला.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीटयूट मध्ये शिक्षण घेताना कोणत्या filmmakers चे आदर्श तुमच्या डोळ्यासमोर होते?
तशी खूप नावं घेता येतील. त्यातही सांगायचे झालेच तर आब्बास किरोस्तामी, फेडरिको फेलिनी, याशचीरो वोसी, भारतातले सत्यजित रे, रित्विक घटक, गुरुदत्त, केरळमधले अरविंदन यांच्या फिल्म्स पाहता आल्या आणि त्यांचा अभ्यास करता आला.

वळू चित्रपट कसा मिळाला? तो करण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळवताना कोणत्या अडचणी आल्या?
FTII मधून बाहेर आल्यानंतर काही documentaries वर काम करत होतो. ते करताना मी आणि माझा मित्र गिरीश कुलकर्णी यांनी ठरवले की आपली स्वत:ची फिल्म केली पाहिजे. FTII मध्ये 'गिरणी' नावाच्या माझ्या शोर्ट फिल्म ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तेव्हा वाटले की वळूसाठी आम्हाला सहज प्रोड्यूसर मिळेल. मग आम्ही एक स्क्रिप्ट लिहिली आणि वेगवेगळ्या निर्मात्यांकडे जायला लागलो. तेव्हा असं लक्षात आलं की लोकांना जे चित्रपट आधी गाजलेले आहेत, त्याच पद्धतीचे चित्रपट बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि आमच्या चित्रपटाचा नायक एक बैल होता, त्यामुळे लोकांच्या लक्षात येत नव्हते की ही कोणत्या प्रकारची फिल्म आहे. फिल्मचे बजेटही जास्त होते आणि आम्हाला कोणतीही compromise करायची नव्हती. तेव्हा दीड वर्षांच्या प्रयत्नांनंतर, आम्हाला हवी तशी फिल्म काढण्यासाठी आम्ही स्वत:च निर्माते व्हायचे ठरविले. मी, गिरीश, प्रशांत पेठे, गणपत कोठारी आणि नितीन वैद्य आम्ही सगळ्यांनी मिळून कर्ज काढून पैसे जमा केले आणि पहिली निर्मिती केली.


वळू चित्रपट दिग्दर्शित करतानाच्या काही आठवणी?
३० दिवस वळूचे शुटींग चालू होते. प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या अनुभवाचा होता. प्रत्येक दिवसाचं शुटींग म्हणजे एखादे लग्न manage करण्याएव्हढं काम होते. म्हणजे आम्ही ३० दिवसात, ३० लग्नं manage केली असे म्हटले तरी चालेल. सगळे कलाकार म्हणजे अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, भारती आचरेकर, दिलीप प्रभावळकर, आमचा सिनेमॅटोग्राफर सुधीर पनसाळे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या सहकार्यानेच आम्ही वळू पूर्ण करू शकलो.

वळू चित्रपट एवढा यशस्वी झाल्यानंतर विहिरची निर्मिती करणे सोपे गेले का? त्याला AB कॉर्प सारख्या कंपनीकडून साहाय्य कसे मिळवले?
त्याचा फायदा अर्थातच झाला. वळूनंतर खूप निर्मात्यांनी आम्हाला संपर्क केला. त्याचवेळी जया बच्चन यांचा पण एकदा फोन आला. त्यात वळूचे यश हा भाग होताच आणि त्याचबरोबर त्या माझ्या फिल्म इन्स्टीटयूट मधल्या सिनियर आहेत तिथली आमची ओळख होती. तिथे त्यांना माझी 'गिरणी' फिल्म आवडली होती, तेव्हा त्यांनी बरोबर काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. विहिरची गोष्ट त्यांना आवडली आणि त्यांनी त्याची निर्मिती करण्यासाठी पैसे दिले.

विहीरला व्यावसायिक यश कितपत मिळाले?
पुण्यात आणि काही शहरांत तो रिलीज झाला. पुण्यात तो ३ महिने चालला होता. एखादा चित्रपट किती लोकांपर्यंत पोहचतो आणि किती खोलपर्यंत पोहचतो या दोन्ही गोष्टी माझ्यामते चित्रपटाचे यश सांगतात. अनेक तरुण मंडळीनी विहीर पाहून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर, बर्लिन महोत्सवात ही तो दाखवला गेला. ३५ वर्षापूर्वी दाखविलेल्या 'सामना' या चित्रपटानंतर त्या महोत्सवात दाखविलेला हा दुसरा मराठी चित्रपट आहे. त्याचबरोबर भारतातल्या आणि जगभरातल्या, अनेक मोठ्या चित्रपटमहोत्सवात देखील हा चित्रपट दाखविला गेला. कुठल्याही चित्रपटाचा स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग असतो तो विहिरला नक्कीच मिळाला.

देऊळ चित्रपटाबद्दल काही माहिती सांगाल का?
देऊळ पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत. तो या month end पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यावर आम्ही ३ वर्षे काम करतो आहे. आत्ता भारतातल्या खेड्यांमध्ये जी तरुण मुले आहेत, त्यांना शहरामधला जो झगमगाट आहे, तो TV आणि mobile मार्फत त्यांच्यापर्यंत पोहचतो आहे. पण त्यासारखे आयुष्य जगण्याचे त्यांच्याजवळ resources नाहीत. त्याबद्दल आकर्षण तर आहे, पण ते मिळवण्यासाठी काही मार्ग नाही. खेड्यातच नव्हे तर शहरातही तुम्ही जगता त्यापेक्षा काहीतरी वेगळे जगण्याची फूस लावली जाते. तर अशी ही आजच्या जगण्याची गोष्ट आहे आणि ती अतिशय हलक्याफुलक्या ढंगाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात बरेचसे ज्येष्ठ कलाकार आहेत जसे की नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, किशोर कदम आणि तो ४ नोव्हेंबर ला रिलीज होतोय.

फिचर फिल्म्स केल्यानंतर 'थ्री ऑफ अस', गारुड सारखे लघुचित्रपट करण्यापाठीमागे काय हेतू होता?
लघुचित्रपट हा चित्रपट सिनेमाचा एक वेगळा 'form' आहे आणि तो तितकाच सशक्त आणि challenging आहे. कमी कालावधीत एखादी गोष्ट मांडणे ही जास्त अवघड गोष्ट असते. अनेक गोष्टी अशा असतात की त्या जर छोट्या वेळामध्ये सांगितल्या तर जास्त प्रभावीपणे सांगता येतात. चित्रपट निर्मितीसाठी लोक जेव्हा पैसे देतात, तेव्हा ते पैसे त्यांना परत मिळवून द्यायची जबाबदारी तुमच्यावर येते. पण शोर्ट फिल्म्स मध्ये आर्थिक गणित नावाची गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर जमलेली नसते म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे experiments करता येतात.

तुम्ही वळू, विहीर सारख्या चित्रपटांना कलात्मक की व्यावसायिक चित्रपट म्हणाल?
असे कुठल्याही पद्धतीचे tags आम्ही लावत नाही आणि दुसऱ्यांनीही ते लाऊ नयेत अशी आमची विनंती असते. कलात्मक किंवा व्यावसायिक असे काही नसते. आमच्या दृष्टीने फक्त एक चांगला चित्रपट बनविण्याचा आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असतो.

कोणता चित्रपट दिग्दर्शित करायचं हे कसे ठरवता? कोणत्या प्रकारचे विषय आपणाला आकर्षित करतात?
काही वेळा असं होतं की एखादी कल्पना मनात येते आणि काही वर्षानंतर ती मनामध्ये आकार घ्यायला लागते. हे होत असताना आम्ही डोळसपणे अनेक लोकांना भेटत असतो, अनेक situations मधून जात असतो. काही गोष्टी खोलवर मनात रुजतात, त्याचं हळूहळू एखादं रूप तयार होतं. माझे मित्र गिरीश कुलकर्णी हे पटकथा आणि संवाद लिहतात. आम्हाला एखादी फिल्म करावीशी वाटली की आम्ही त्याच्याबद्दल बोलत राहतो. मग २-३ वर्षांनी त्याचं एक स्क्रिप्ट तयार होतं. अशी ती प्रोसेस आहे. आम्ही जाणूनबुजून एखाद्या विषयावर चित्रपट करायचे असे ठरवत नाही.

चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी आणि आता यशस्वी झाल्यानंतर आपल्या आयुष्यात काही फरक झाला आहे का?
मला स्वत:ला यश अपयश असे tags आवडत नाहीत. यश ही खूप फसवी गोष्ट आहे. आम्ही जे मांडू पाहतोय ते जास्तीत जास्त प्रभावीपणे कसे मांडता येईल. चित्रपट माध्यम वेगवेगळ्या पद्धतीने कसे explore करता येईल. आणि हे करत असताना माणूस म्हणूस स्वत:चा शोध कसा घेता येईल. हा आमचा मूळ उद्देश आहे. हे काम एका चित्रपटाने संपणारे नाही. तो प्रवास हाच आमचा आनंदाचा भाग आहे. त्याच्या शोधासाठीच आम्ही हे सगळं करतोय. त्यात यशाने खूप फरक पडत नाही. झालाच तर वळूसारखा चित्रपट जेव्हा चालतो, तेव्हा पुढच्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी मदत होते इतकाच.

आपल्या भविष्यातील प्रोजेक्ट्स बद्दल काही माहिती सांगाल का?
आम्ही एका नवीन चित्रपटाची निर्मिती करतो आहोत, ज्याचं नाव 'मसाला' असं आहे. त्याचे आम्ही creative producer आहोत. गिरीश कुलकर्णीनी तो चित्रपट लिहिला आहे आणि संदेश कुलकर्णी तो दिग्दर्शित करणार आहेत.















२ टिप्पण्या:

  1. रुपाली,
    ह्या सुंदर मुलाखती बद्दल धन्यवाद.उमेश कुलकर्णीचा मी "वळू" पासून फॅन आहे."वळू" मधील सर्व पात्रांची खास करून गिरीश कुलकर्णीची निवड हि इतकी अफलातून आहे कि प्रेक्षक त्यात रमून नाही गेला तरच नवल..गिरीश कुलकर्णीने त्या सिनेमात १९७६ सालच्या श्याम बेनेगलच्या "मंथन" मधील नसिरुद्दीन शहाने साकारलेल्या "भोला" ची आम्हाला आठवण करून दिली असे म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही.

    "देऊळ "ची पुण्यातील "प्रभात "ची गर्दी थोडी कमी झाल्यावर तो पहिला जाणार आहे हे सांगायलाच नको....
    उमेशला माझ्या तर्फे हार्दिक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा