लाल रंगाची मारुती रस्त्यावरून चालली होती. संध्याकाळची वेळ होती. आजीच्या बाजूची खिडकी उघडी होती. बाहेरच्या थंडगार वाऱ्याबरोबर संधिप्रकाशाची रुपेरी किरणं, तिच्या रुपेरी केसांशी खेळत होती. एखाद्या लहान मुलीसारखी ती खिडकीवर हात ठेऊन बाहेर टकमक बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचा बालिश आनंद न्याहाळत, शेजारी तिची नात स्नेहा बसली होती.
"हे तुझ्या आजीचं माहेर." स्नेहाच्या आईने स्नेहाची तंद्री भंग केली. गाडी एका गावावरून चालली होती.
"You mean my great grandmother's" झोपण्यासाठी मिटलेले डोळे उघडून स्नेहाची सात वर्षांची मुलगी, आस्था उद्गारली. तिला बहुतेक आजीचं मराठी कळलं हे दर्शवायचं असावं. गाडीत पाठीमागे चौघीही दाटीवाटी करून बसल्या होत्या. आस्थाला तिच्या आजीने मांडीवर घेतले होते आणि स्नेहा तिच्या आजीजवळ बसली होती. त्या घरातल्या चार पिढ्या त्या गाडीत पाठीमागच्या सीटवर सामावल्या होत्या.
आज सकाळी जेव्हा आजीला पाहायला म्हणून स्नेहा निघाली, तेव्हा तिला घेऊनच ती परतेल याची तिला यत्किंचितही कल्पना नव्हती. मागच्या दोन्ही भारत भेटीत तिला आजीकडे जायला मिळालं नव्हतं. त्यामुळे या वेळी जायला एक आठवडाच राहिला असताना, वेळात वेळ काढून ती चालली होती. जाताना तिच्या डोळ्यासमोर गोरीपान, उंच, भलंमोठ्ठं कुंकू लावलेली आजीची मूर्ती होती. तशी सगळ्यांनी तिला कल्पना देऊन ठेवली होती पण प्रत्यक्षात आजीला पाहिल्यावर तिला रडू फुटलं. अंधार्या खोलीतून छोटीशी, अशक्त, सुरुकुतलेल्या शरीराची आजी बाहेर आली आणि मध्ये किती काळ गेला असेल याची स्नेहाला जाणीव झाली. तसा पाच-सहा वर्षांचा काळ खूप नव्हता. पण त्या कालावधीत झालेल्या घटनांनी आजीच्या तब्येतीवर चांगलाच टोल घेतला होता. आपल्याला कोण भेटायला आलं म्हणून आजीनं तिच्याकडे कुतूहलानं पाहिलं. सगळ्यांना वाटलं की ती कदाचित स्नेहाला ओळखेल. पहिली नात म्हणून स्नेहा सगळ्यांचीच खूप लाडकी होती. पण एखाद्या अनोळखी माणसाकडे पाहावं तसं आजीनं तिच्याकडे पाहिलं. तिचं कृश शरीर मिठीत घेताना स्नेहाला असंख्य यातना झाल्या. हीच आजी: आपली काळजी करणारी, पोट भरले तरी प्रेमाने खाऊ घालणारी, रस्त्यात वेडंवाकडं पळाल्यावर धोपटणारी, शनिवारी कोणतेही महत्वाचे काम न करणारी, आपल्याला मारलं की आईला तंबी देणारी! तिच्या कितीतरी आठवणी स्नेहाच्या मनात दाटून आल्या.
मग तिनं आजीशी एकतर्फी खूप गोष्टी गेल्या. लहान मुलाच्या उत्सुक नजरेनं आजीनं त्या सगळ्या ऐकल्या. पण निघायची वेळ झाली आणि तिला सोडून जाणे स्नेहाच्या जीवावर आलं. आता पुन्हा आजी भेटेल का या विचारानं तिला कसनुसं झालं. "आई, प्लीज तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊया ना?" तिनं आईला विनंती केली. तिची आईही सर्व्हिस करणारी. घरी नेऊन आजीचे हाल होतील ही तिला काळजी. तिच्यासाठी दिवसभर घरी कोण थांबणार? इथं at least मामी असते तिची काळजी घेणारी. पण शेवटी स्नेहानं तिला तयार केलंच. आजी केवढी खुश झाली! लहानपणी एस. टी. त बसून जायचं म्हटल्यावर स्नेहाला जेवढी मजा वाटायची अगदी तसेच भाव आजीच्या चेहऱ्यावरही होते.
आजीचे केस तिच्या खूपच डोळ्यावर येत आहेत हे पाहून स्नेहाने ते पुढे होऊन मागे सारले. आजीने तिच्याकडे आस्थेनं बघितलं आणि पुन्हा बाहेर नजर वळवली. बाहेर तिला कसलीतरी खुण पटल्यासारखी झाली. गाडी तिच्या शाळेजवळून चालली होती. आज दुपारीच तर तिने रामुशी भांडणे केली होती. आणि चिडून जाऊन रामूनं, रस्त्यावरचा दगड फेकून तिच्या डोक्यात मारला होता. भळाभळा रक्त वाहायला लागलं होतं म्हणून शिक्षकांनी तिला, तिच्या मोठ्या बहिणीबरोबर घरी पाठवले होते. वडील शेतातून घरी येण्याआधी ती घाबरून कोपऱ्यात बसली होती. बाबांना कळलं तर मार मिळणार याची तिला खात्री होती.
"मी नाही रामूची खोडी काढली. त्यानंच माझा खोडरबर चोरला होता." अचानक स्नेहाकडे पाहत ती म्हणाली. आजीला एकदम काय झाले हे स्नेहाला कळेना. तिच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले भाव पाहून तिला एकदम भडभडून आलं.
"कोण रामू आजी? काय केलं त्यानं?" आजीला जवळ घेत तिनं विचारलं.
"त्यानं माझ्या डोक्याला मारलं." डोक्याकडे हात नेऊन आजीने तक्रार केली.
"हो हो. तो रामू आहेच तसा खोडकर"
"तू बाबांना सांगणार नाही ना?”
"अ हं. बिलकुल नाही" आजीच्या कृश हातांचा विळखा तिच्या गळ्याभोवती पडला. डोळ्यातलं पाणी तिने आजीच्याच साडीला पुसले. लगेचच लहान मुलीसारखं समाधानानं हसत आजीने तिच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकली.
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी आजोबा तर कधी आजी त्यांना आजोळी घेऊन जायला येत असत. तेव्हा ती आजीच्या खांद्यावर मान टाकून अशीच झोपली असेल गाडीत! आई बाबा रागवले की आजीच्या कुशीत जाऊन लपायची तिला सवय. त्या कुशीतली ती मायेची ऊब, अगदी मागच्या भेटी पर्यंतही तशीच होती. तिच्या काळजीने वेडी होणारी आजी तिला आठवली. एकदा चुकून तिच्याकडून, बोगद्यातल्या सापाला दगड लागला, असं तिच्या घोळक्यातलं कुणीतरी म्हणालं, म्हणून आजीने किती अकांडतांडव केला होता. तिथं खरंच साप होता की नव्हता हेही तिने पाहिलं नव्हतं. पण त्याची माफी मागायला सांगून आणि तोंडाने 'आस्तिक मुनीची शपथ' असा सतत जप करायला लाऊन तिने तिला पूर्ण घाबरवून टाकलं होतं. तो संपूर्ण उन्हाळा, कुठेतरी तो साप दगा धरून बसलाय या धास्तीत स्नेहाने घरात बसून काढला. अजूनही तिच्या मनातली ती सापाची भीती गेली नव्हती. आजीची कृपा!
तिने आजीकडे पाहिलं. शांतपणे ती तिच्या खांद्यावर विसावली होती. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तिचं भलं मोठ्ठं गोंदण उठून दिसत होतं. तोंडात मोजकेच दात बाकी होते, त्यामुळे गाल खोबणीत गेले होते. तिचा कृश, जाळ्या जाळ्यांचा हात तिने हातात घेतला. नवव्या वर्षी लग्न करून आजी घरात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या सत्तर वर्षात आजीनं काय काय पाहिलं असेल, सोसलं असेल? तिच्या मनात आलं. आणि आत्ता त्याची तिला कसलीच आठवण नव्हती. एक आख्खं आयुष्य, त्याच्यामध्ये घडलेल्या असंख्य घटना, संवाद, हजारो माणसे सगळं आता तिच्या दृष्टीने शून्यवत होतं.
"आई, कसं गं हे आजीचं झालं? तिला काहीच समजत नाही का?" न राहवून तिने आईला विचारलं.
"गप रडू नको. म्हातारपणी असं व्हायचंच."
"असलं काही पाहिलं की जगण्यात काही अर्थच वाटत नाही."
"असलं काही बोलू नये. चांगला नवरा आहे, दोन मुलं आहेत. चांगला संसार करायचा." आई कशीतरी तिची समजूत काढत होती.
"मलाही नवरा आहे." त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या आजीनं, अचानक स्नेहाच्या खांद्यावरची मान उचलून सांगितलं.
"हो का?" तिच्या आकस्मित बोलण्यावर स्नेहाला काय म्हणावे ते सुचेना.
"हो. ते कराडला असतात. शाळेवर शिक्षक आहेत. मला दर महिन्याला पैसे पाठवून देतात."
कुतूहलानं स्नेहाच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत ती म्हणाली. स्नेहाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसतोय की नाही याचा ती अंदाज घेत होती. ऐंशीतली तिची आजी! तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरच्या, निस्तेज डोळ्यामधली ती आर्जव स्नेहाचं काळीज चिरून गेली.
"हो? किती पैसे पाठवतात?" आवंढा गिळून तिने विचारलं.
आजीच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले. खूप वेळ तिने विचार केला.
"शंभर." शेवटी ती उत्तरली.
पहिला मुलगा झाल्यानंतर एक दोन वर्षांसाठी आजोबा कराडला सर्व्हिसला जात होते हे स्नेहाला माहित होते. पण आजी त्याबद्दल बोलत होती की आता दर महिन्याला आजोबांची पेन्शन तिला मिळत असे त्याबद्दल हे स्नेहाला कळलं नाही. लग्न झाल्यावर सुरुवातीला आजोबा म्हणे आजीला खांद्यावर घेऊन फिरवत असत. हे खरं की खोटं कुणास ठाऊक. नऊ वर्षांचीच होती ती! माहेरी आजी अतिशय लाडात वाढलेली. घरी दोघी बहिणीच, त्यांना भाऊ नव्हता. घरचीच गाईगुरे त्यामुळे दुधदुभतं भरपूर. वडिलांनी कधी कसला लाड पुरवला नाही असं झालं नाही. पण सासरी ती एकत्र कुटुंबात येऊन पडली. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला. दिराने एकदा तिच्यावर हातही उगारला होता, तेव्हा ती सहा महिने माहेरी जाऊन राहिली होती. पण आजोबा शेवटपर्यंत कसे तिला न्यायला आले नाहीत ही गोष्ट पोटतिडकीने तिने आत्तापर्यंत सगळ्या नातवंडाना सांगितली होती. पण नंतर आपोआपच तिला घराची ओढ वाटू लागली आणि तिच्या वडिलांनी तिला घरी आणून सोडले. नंतर सासू-सासरे, दीर, नणंद यांच्या मर्जीनुसार वागायची सवय जडली. लहान वयातच मुले व्हायला सुरुवात झाली. सगळं तरुणपण मुलांना जन्म देण्यात आणि त्यांच दुखणंखुपणं काढण्यात गेलं. मुलांच्या शिक्षणासाठी दागिने मोडून लंकेची पार्वती झाली. नंतर तीच मुलं मोठी होऊन सुना घेऊन आली. पण सासूपण भोगायचे सोडून, शिकल्यासवरलेल्या सुनांकडून तिला ऐकून घ्यायची पाळी आली. सुना आल्यानंतर, आता सुखाचे चार घास मिळतील असं तिला वाटलं असेल का? या आयुष्याच्या रहाटगाडग्यातून कधी तिची सुटका झाली असेल का? स्नेहाच्या मनात विचार येऊ लागले.
आस्थाने थोडी चुळबूळ केली.
"ही तुझी मुलगी का?" तिच्याकडे पाहत आजीने विचारलं.
"हो"
"मलाही एक मुलगी आहे.”
"हो? काय नाव तिचं?" स्नेहानं विचारलं.
“मीना." स्नेहानं चमकून आईकडे पाहिलं. स्नेहाच्या आईचंच नाव मीना होतं. आई, आस्था बरोबर शांतपणे झोपली होती. स्वतःचे नाव आजीच्या तोंडून ऐकून आईला बरं वाटलं असतं! पण आजीला मीना तिच्याबरोबर गाडीत आहे याची काही जाणीव नव्हती. तिच्या मनातली मीना केवढी असेल असं स्नेहाला वाटलं.
"मग कुठाय मीना आता?" तिनं विचारलं.
"ती शाळेत जाते. शंकराच्या देवळाजवळ ती शाळा आहे ना, तिथं जाते ती." पापणीही न हलवता आजीने सांगितलं.
"किती मुलं आहेत तुला?" स्नेहाला उगाचच कुतूहल वाटलं.
"तीन."
आजीला एकूण आठ मुलं झालेली. त्यातली तीन बाळपणातच वारलेली. पण आत्ता तिला त्यातली फक्त तीनच आठवत होती. अधून मधून स्नेहा तिच्या तोंडावरून हात फिरवत होती. आस्थाच्या तोंडावरून फिरवावा तसा! आपल्यावर एवढं प्रेम करणारं अचानक कोण आलंय म्हणून आजी तिच्याकडे कुतूहलाने बघत होती. सुखावत होती.
"माझा एक मुलगा साताऱ्यात दुकान चालवतो." आता ती बबन मामाबद्दल बोलत होती. तीन वर्षापूर्वी स्नेहाचे आजोबा वृद्धत्वाने गेले आणि त्यानंतर दोनच महिन्यात accident मध्ये बबन मामाचा देहांत झाला होता. त्या धक्क्यानंच आजीची ही अवस्था झाली होती. तिला वर्तमान, भूत, भविष्य काळाची कसली जाणीवच राहिली नव्हती. टाईम मशीन मध्ये बसल्यासारखं आजीचं मन वेगवेगळ्या कालखंडात वावरत होतं. तिच्या आयुष्यातल्या घटना एखाद्या मृगजळा सारख्या तिच्या मेंदूत हुलकावण्या देत होत्या. आजीची बुद्धी गेलीय असं सगळे म्हणत होते. पण स्नेहाला माहीत होतं. अल्झायमर या रोगाबद्दल अमेरिकेत तिनं कितीतरी ऐकलं होतं. पण तो कुणाला झालेला ती प्रथमच पाहत होती. त्याच्याबद्दल अमेरिकेत किती जागृती निर्माण केलीय! पण इथे भारतात म्हातारपणी असं व्हायचं असं लोक गृहीतच धरतात. हात नसला, दृष्टी नसली तरी जगणं ती समजू शकत होती. पण स्मरणशक्तीच नसेल तर! तिने आस्थाकडे पाहिलं. ती आहे, आई आहे, नवरा आहे म्हणून तिच्या जगण्याला अर्थ आहे. त्यांचं अस्तित्व हीच तिची ओळख आहे. कुणी विचारलं तू कोण आहेस म्हणून तर आस्थाची आई, आईची मुलगी आणि नवऱ्याची बायको म्हणूनच तिनं स्वत:ची ओळख करून दिली असती. पण ती त्यांनाच विसरली तर? मागच्या सगळ्या आठवणीच विसरली तर? किती पोकळी जाणवेल तिच्या मनात? सगळेच परके! पण सगळे परके आहेत हे कळायला आधी स्वत:ची ओळखही राहायला हवी ना? कसं वाटत असेल आता आजीला? तिच्या मनात काय विचार चालले असतील?
घरी पोहचल्यानंतर शून्यमनस्कपणे आजीला तिने घरात आणले. दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन आजीसाठी तिने दोन-तीन चांगल्या साड्या घेतल्या. घरी आल्यावर लगेचच आजीला तिने एक साडी नेसायला लावली. आजीचा चेहरा खुलला. किती वर्षांनी तिला नवीन साडी मिळाली असेल देव जाणे! आजीची आठवण म्हणून तिनं सगळ्या फॅमिलीचा एक फोटो घ्यायचं ठरवलं. तिला मध्यभागी बसवून सगळे तिच्याभोवती उभे राहिले. त्या फोटोतही आजीने तिचा हात पकडला होता. नंतर डिजिटल कॅमेऱ्यात तो फोटो पाहताना तिला कसंतरीच झालं. आजी कॅमेऱ्या कडे बघत नव्हती. कुठेतरी शून्यात, पैलतीरी तिची नजर लागली होती. जणू तिला या सगळ्याशी काही घेणंदेणं नव्हतं. स्नेहाला स्वत:चाच राग आला. तिला वाटलं की हे सगळं ती स्वत:साठीच करतेय. काय करायचा आहे तो फोटो आजीला? फोटोतली ती क्षीण, अशक्त आजी! आजीची असली आठवण हवीय तिला? पण तो फोटो डिलीट करायचं धाडस तिला झालं नाही.
त्यानंतरचे चार दिवस खूप घाईत गेले. अमेरिकेला जाण्या आधीची शॉपिंग, मित्र-मैत्रिणींना भेटणं यात आजीसाठी तिला मनासारखा वेळ देता नाही आला. तरीही तिची तिने बरीच सेवा केली. आजीही लहान मुलासारखी तिलाच चिकटून असे. तिच्याकडूनच जेवण घेई. आता आजीनं तिला मीना म्हणायला सुरुवात केली होती. घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. दिवसभर जेव्हा स्नेहा बाहेर असे, तेव्हा आजी सगळ्यांना, माझी मुलगी मीना मला हे आणणार आहे, इथे घेऊन जाणार आहे, ती माझ्यासाठी ते करेल, अशा गोष्टी करत असे. घरातल्या सगळ्यांनी स्नेहाची टिंगल करायला सुरुवात केली होती.
शेवटी ती वेळ आली. ती गेल्यानंतर आजीचं काय होणार याची तिला काळजी वाटू लागली. तिला ते नक्की परत पाठवतील. तिथे तिचा लाड कोण करेल? तिची लहान मुलासारखी एवढी काळजी कोण करेल? आजीला तिचा चांगलाच लळा लागला होता. ऐअर पोर्टवर नेणारी गाडी दारात आली. सगळेजण तिला सोडायला बाहेर आले. तिनं आजीला घट्ट मिठी मारली. ही कदाचित शेवटचीच! तिने आजीला स्वत:ची काळजी घ्यायला सांगितली. त्याचं नंतर तिलाच हसू आलं. आजीला काहीतरी चांगलं होत नाही याची चाहूल लागली होती. घाबरलेल्या सशासारखी ती तिच्याकडे पाहू लागली. स्नेहाने तिच्या तोंडावरून हात फिरवला. तो स्पर्श एखाद्या पाडसाला करावा तसा! आणि ती आजीची नजर विस्मयाची, आदराची, उपकाराची! आयुष्यभर सगळ्यांना भरभरून देऊन, आता रिकामी झालेली आजी; याचकाच्या नजरेनं तिच्याकडे बघत होती.
ती अमेरिकेत पोहचल्यानंतर तिला कळलं की ती गेल्यानंतर आजी घरात आत यायलाच तयार नव्हती. माझी मुलगी मीना मला न्यायला येणार आहे असं म्हणत ती बाहेरच बसून होती बराच वेळ. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी तिला तिच्या घरी पाठवून दिलं होतं. तिथे ती घरभर फिरत तिला शोधत असेल का? का लगेच विसरली असेल, बाकी सगळं विसरली तसं? स्नेहाला हुंदका फुटला. “आजी, आयुष्यभर मृगजळाच्या मागे लागून तुझ्या हाती काहीच लागलं नाही. आता माझी पाळी.” स्वत:शीच ती म्हणाली.
koop chan aahe.....
उत्तर द्याहटवाdhanyawad
khoopach chhaan
उत्तर द्याहटवाखूपच छान.
उत्तर द्याहटवाअल्झायमर असलेल्या व्यक्तीची आणि त्याच्या relative चे वर्णन मनाला चटका देणारे आहे आणि हेच कथेचे यश आहे.