शनिवार, ८ ऑक्टोबर, २०११

मनातलं द्वंद्व

उदास सैरभैर मनाला सावरायला, गवतात जरा जाऊन बसले.
कशा प्रकारची माणसं भेटतात, त्याचा विचार करत राहिले. ||
समोर छोटंसं तळ होतं, कानात गुलजारचं गाणं होतं.
मनात द्वन्द्व सुरु होतं, खूप चांगलं असणं काही बरं नव्हतं. ||
मागून इवलेशे दोन कान झाडीतून डोकावत होते.
माझी शांती भंगू नये म्हणून शांतपणे ऐकत होते. ||
त्यांच्या सारखे सगळेच लोक असते तर?
नको तिथे हक्काने लुडबुडणारे नसते तर? ||
काहीना सवय असते, धांदात खोटं बोलायची
काही काम न करता, खूप काही दाखवायची. ||
काहीमध्ये कौशल्य असते, काम करून घेण्याचं.
गोड बोलून दुसऱ्यांना मनासारखं वागायला लावायचं. ||
काही लोक नुसतेच पाहतात, किनाऱ्यावरून अंदाज घेतात.
योग्य वेळ येताच, आपलं सगळं साधवून घेतात. ||
आणि काही माझ्यासारखे, काम करून निव्वळ मरतात.
आणि नंतर त्याच्या श्रेयासाठी खुळचट भांडत बसतात. ||
विश्वास कुणावर ठेवावा, याचाच डोक्यात गोंधळ उडतो.
आपलं आपलं ज्याला म्हणावं, त्यांच्याकडूनच भ्रमनिरास होतो. ||
खरंच! खोटं न बोलणं एवढं अवघड आहे का?
परिस्थितीचा फायदा न घेता जगणं अगदीच अशक्य आहे का? ||
तूच सांग मला त्या लपलेल्या हरिणा?
काय बरोबर आणि काय चुकीचं?
माझं सरळ वागणं की त्यांचं समजून अज्ञान पांघरणं? ||

1 टिप्पणी: